फकिरीयत : गुरू-शिष्यांच्या आध्यात्मिक परंपरेवरील विश्वास दृढ करणारा चित्रपट

21 Dec 2025 13:44:38
Fakiryat
 
श्री गुरुमाईंच्या आध्यात्मिक प्रवासावर, जीवनावर आधारित ‘फकिरीयत’ या चित्रपटात अध्यात्म, क्रियायोग, गुरुभक्ती आणि श्रद्धा यांचं सुंदर मिश्रण असून, गुरुकार्यासाठीचा त्यांचा संघर्षही पाहायला मिळतो. हा चित्रपट श्री गुरुमाईंनी लिहिलेल्या ‘चिरुट जलती हैं’ आणि ‘अध्यात्म - एक विद्रोह एक क्रांती’ या दोन पुस्तकांवर आधारित आहे.
 
आपल्या देशाला गुरुपरंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. जीवनाच्या प्रवासात गुरू-शिष्य बंधनासारखी परिवर्तनकारी शक्ती फार कमी नातेसंबंधांमध्ये आढळते.आध्यात्मिक गुरू आणि शिष्य यांमधील हे पवित्र नाते एक काळातीत परंपरा आहे, जी सामान्य शिक्षणाच्या मर्यादा ओलांडते. हे नाते इतिहासात आध्यात्मिक परंपरा व पद्धतींचा आधारस्तंभ राहिले आहे. गुरू हे त्यांच्या शिष्यामध्ये असलेल्या दैवीशक्तीला ओळखतात, त्याच्यातील ज्ञानप्राप्तीची क्षमता पाहतात आणि या आंतरिक प्रकाशाचे संगोपन करतात. तसेच, साधकाला आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक जागृतीसाठी मार्गदर्शन करतात.
 
गुरू-शिष्य यांच्यातील संबंध परस्पर आदर, विश्वास आणि भक्तीवर आधारित आहेत. गुरू वैयक्तिक मार्गदर्शन करून शिष्याच्या आध्यात्मिक पातळीवर गहन परिवर्तन घडवून आणतात. गुरू शिष्याचे खरे स्व-रूप शोधण्यासाठी आणि शेवटी जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती, मोक्ष मिळवण्यासाठी प्रेरित करतात. गुरू-शिष्य परंपरा हा श्रेष्ठ आध्यात्मिक वारसाच भारताला जगाचे आध्यात्मिक केंद्र बनवतो आणि भारताचे वेगळेपण सिद्ध करतो.
 
गुरू-शिष्य परंपरेसंदर्भातील हे विचार आठवण्याचे कारण म्हणजे, नुकताच प्रदर्शित झालेला ‘फकिरीयत’ हा गुरू-शिष्य नातेसंबंधांवर भाष्य करणारा आणि आध्यात्मिक परंपरेवरील विश्वास दृढ करणारा सुंदर चित्रपट. गुरू-शिष्य परंपरा, क्रियायोग, सनातन धर्म यावर बहुदा प्रथमच चित्रपट बनवला गेला आहे.
 
डॉ. अनुजा अंकुश जानवलेकर या एका सामान्य गृहिणीचा क्रियायोगाची साधक ते गुरुपद मिळण्यापर्यंत झालेल्या आध्यात्मिक प्रगतीचा किंवा संघर्षाचा प्रवास म्हणजे हा चित्रपट. त्यांनीच त्यांच्या ‘अध्यात्म - एक विद्रोह एक क्रांती’ या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे राजश्री (माहेरचे नाव) ते अनुजा, अनुजा ते माई, माई ते गुरुमाई, गुरुमाई ते श्री गुरुमाई, श्री गुरुमाई ते मां रुद्रात्मिका आणि त्याचबरोबर विश्वगुरू भद्रबाहु बाबांची बुढीया. हा प्रवास म्हणजे एक रहस्य, एक बंड, एक परिवर्तन आणि एक विद्रोह.
अनेक अविस्मरणीय घटनांची श्रृंखलाच आपल्याला या चरित्रपटात पाहायला मिळते. श्री गुरुमाईंच्या आध्यात्मिक प्रवासावर, जीवनावर आधारित या चित्रपटात अध्यात्म, क्रियायोग, गुरुभक्ती आणि श्रद्धा यांचं सुंदर मिश्रण असून, गुरुकार्यासाठीचा त्यांचा संघर्षही यात पाहायला मिळतो. हा चित्रपट श्री गुरुमाईंनी लिहिलेल्या ‘चिरुट जलती हैं’ आणि ‘अध्यात्म - एक विद्रोह एक क्रांती’ या दोन पुस्तकांवर आधारित आहे.
 
चित्रपटनिर्मितीचा कोणताही अनुभव नसताना, वर्ष २०२४ मध्ये त्यांना हा चित्रपट बनविण्याचा आदेश मिळाला. प्राथमिक कामे सुरू झाल्यानंतर अनेक अडचणी आल्या.परंतु, महावतार बाबाजींच्या कृपेने या क्षेत्राशी संबंधित अनेकजण जोडले गेले. त्यांचे अनेक साधकही हा जगन्नाथाचा रथ ओढण्यास सिद्ध झाले आणि सर्वांच्या अथक परिश्रमातून एक सुंदर आध्यात्मिक कलाकृती निर्माण झाली.
 
श्री गुरुमाईंच्या घरी आध्यात्मिक वातावरण होतेच. त्यांचे वडील देवीउपासक आणि तासन्तास पूजेमध्ये रमणारे. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच वडिलांचे अचानक निधन झाले आणि त्यानंतर गुरुमाईंचे सहज ध्यान लागू लागले. लहानपणी दीक्षा घेतली ती गुरुदेव, काली मंदिराचे पुजारी श्री रामकृष्ण परमहंस यांच्याकडून, म्हणजे ठाकूरजींकडून.
 
वर्ष २००६ मध्ये ठाणे येथे डॉ. प्रेमजी निर्मल यांच्या दोन दिवसांच्या शिबिरामध्ये क्रियायोगाशी संबंध आला. वर्ष २००७ मध्ये एका ‘ट्रान्स’च्या अवस्थेत त्यांना गुरुदेवांचे दर्शन झाले आणि त्यांच्या पुढील जीवनाचा मार्ग निश्चित झाला. तेव्हापासून ध्यानधारणेबरोबरच त्या क्रियायोगही शिकवू लागल्या. वर्ष २०१० मध्ये त्यांना स्वप्नात महावतार बाबाजींचे दर्शन झाले आणि त्यांना आत्मबोध झाला. पुढे सतत माध्यमाच्या आधारे महावतार बाबाजी आणि त्यांचे गुरू जगद्गुरू भद्रबाहु यांच्यासोबत संपर्क होत राहिला. श्रीस्वामी समर्थ, पूज्य शंकर महाराज यांचेही मार्गदर्शन श्री गुरुमाईंना वेळोवेळी होत असते.
 
महावतार बाबाजींचे कार्य जगासमोर आणले, ते परमहंस योगानंद यांनी वर्ष १९४५ मध्ये त्यांच्या ’An autobiography of a yogi’ अर्थात ‘योगी कथामृत’ या पुस्तकामधून. महावतार बाबाजींकडून लाहिरी महाशयांना, त्यांच्याकडून स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांना आणि त्यांच्याकडून परमहंस योगानंद यांना क्रियायोगाची दीक्षा मिळाली. ‘क्रियायोग’ ही अतिप्राचीन योगविद्या असून, याचा उल्लेख ‘वेद’, ‘उपनिषदे’, ‘श्रीमद्भगवद्गीता’ यामध्ये आढळतो. क्रियायोगात योगी प्राण व अपान या दोन्ही वायूंच्या गती अवरुद्ध करून प्राणायाम सिद्ध करतात. योगी आपल्या हृदयातून प्राणशक्ती बाहेर काढून आपल्या ताब्यात आणतात.आपल्या शरीरातील घटक-अवयवांचा जो अहर्निश नाश होत असतो, तो नाश त्यांना प्राणवायूचा अधिकतम पुरवठा करून वाचवू शकतो. तसेच, अपानवायूचा निरोध करून पेशींची वाढ होण्यामधील बदलही थांबवू शकतो. प्राणायाम, ध्यान आणि मुद्रा यांचा संगम म्हणजे क्रियायोग.
 
अनेक वर्षांची निरंतर कठोर साधना आणि त्या तपश्चर्येतून मिळालेले गुरुपद हा श्री गुरुमाईंचा प्रवास-संघर्ष चित्रपटात प्रभावीपणे मांडला आहे. कमी कालावधीत आणि मर्यादित साधने असतानाही ‘क्रियायोग मिशन फाऊंडेशन’च्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यानगरमधील भंडारदरा परिसरात उभे राहात असलेले नियोजित रुद्रधाम, उत्तराखंडमधील कुकुछिना येथे उभा राहिलेला गुंफा आश्रम किंवा वाराणसी येथील केंद्र ही कार्ये प्रशंसनीय अशीच आहेत.
 
क्रियायोग शिकण्याची आणि शिकवण्याची झालेली सुरुवात, गुरुदेवांचं मार्गदर्शन, क्रियायोगाच्या शिबिरांना मिळणारं वाढतं समर्थन, रुद्रधाम निर्माणाचे आदेश आणि त्यासंदर्भातील कार्य, तसेच याचसंदर्भात झालेले काही तात्त्विक मतभेद, वाराणसीमध्ये सुरू केलेले कार्य आणि तेथील वाढत्या प्रतिसादामुळे स्थानिक तथाकथित आध्यात्मिक व्यक्तींसोबतचा संघर्ष, तेथील साधकांकडून झालेला गुरुद्रोह, सततच्या कार्यमग्नतेमुळे आणि दगदगीमुळे प्रकृतीवर झालेले दुष्परिणाम, उत्तराखंडमधील कुकुछिना येथील गुंफा आश्रमाची निर्मिती आणि ‘कोरोना’ काळानंतर गुरू बाबा भद्रबाहु यांच्या आदेशानुसार सुरू केलेले नवनवीन उपक्रम अशा श्री गुरुमाईंच्या जीवनातील विविध घटना व प्रसंग वास्तव स्वरूपात; परंतु अतिशय संयतपणे, कुठेही अनावश्यक नाट्यपूर्णता न आणता चित्रपटात मांडण्यात आले आहेत.
 
चित्रपटाची निर्मिती ‘भद्रबाहू डिव्हाईन क्रिएशन्स एलएलपी’ यांनी केली आहे, तर दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांचे आहे. मांजरेकर यांनी यानिमित्ताने हिंदी सिनेमात पदार्पण केले आहे. १५० मिनिटांचा हा चित्रपट कुठेही नीरस किंवा कंटाळवाणा न होता, उत्कंठावर्धक राहील याची पुरेपूर काळजी दिग्दर्शकाने घेतल्याचे जाणवते.चित्रपटासाठी समृद्धी पवार यांनी गीते लिहिली आहेत. सुरुवातीचे ‘चलो चले हम बाबाजी के देस’ किंवा ‘गुरू मैं तेरे शरण’ किंवा वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असताना चित्रित केलेले ‘इतना गुरूर मत कर, सच जाने तू ऐ अभिमानी, पानी का बुलबुला हैं, पगले तेरी ये जिंदगानी’ हे गीत असो, सर्व गीते ही अर्थवाही झाली असून, शब्दरचना चित्रकथेला अनुरूप अशीच आहे.
 
संगीत प्रवीण कुंवर यांनी दिले आहे. काहीवेळा चित्रपटात टेन्शन रिलीज करायला गाणी आवश्यक असतात. इथे ती गाणी घुसडल्यासारखी वाटत नाहीत, तर ती प्रसंगानुरूप येतात. हे संगीतकाराचे यश मानावे लागेल. गायक मनीष राजगिरे, मनोज मिश्रा, जसराज जोशी आणि नेहा राजपाल यांनी गीतांना योग्य न्याय दिल्याचे जाणवते. संपादन निलेश गावंड यांचे आहे, तर छायांकन अजित रेड्डी यांनी केले आहे.पटकथा अनिल पवार यांची असून, संवाद श्री गुरुमाईंसोबतच अनिल पवार यांनीही लिहिले आहेत.
 
चित्रपटाची सर्वात जमेची बाजू अभिनयाची मानावी लागेल. ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर, संदेश जाधव, अक्षय वर्तक, नयन जाधव, अनिषा सबनीस या सर्वांनी वास्तव वाटावीत, अशी कामे केली आहेत. पाहुणे कलाकार म्हणून ‘चलो चले हम बाबाजी के देस’ या गीतामधील संतोष जुवेकर आणि ‘इतना गुरूर मत कर’ या गीतामधील विनीत शर्मा यांनी त्यांच्या छोट्या भूमिकांमध्ये जीव ओतल्याचे दिसून येते. विशेषत: चित्रपट किंवा मालिकांमधून प्रामुख्याने पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणारे विनीत शर्मा यांना साधुवेशात पाहणे, हा सुखद धक्का म्हणता येईल.
 
चित्रपटातील सर्वात आव्हानात्मक काम आहे, ते श्री गुरुमाईंची भूमिका करणार्‍या अभिनेत्री दीपा परब यांचे. सुमारे २५-२६ वर्षांपासून अनेक चित्रपट व हिंदी-मराठी दूरदर्शन मालिकांमध्ये काम करणार्‍या गुणी अभिनेत्री दीपा परब हिने पूर्णक्षमतेने काम केल्याचे नव्हे, तर भूमिका जगल्याचे जाणवते. अतिशय मोजक्या आणि निवडक कलाकृतींमध्ये काम करताना प्रेक्षकांनी तिला पाहिले आहे. चेहर्‍यावरील भाव, शारीरिक हालचाली आणि देहबोलीतून तिने श्री गुरुमाईंची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. ‘श्री गुरुमाई’ या पात्राच्या आनंद, दु:ख, राग, आत्मविश्वासातून आलेला धीटपणा अशा भावना छान व्यक्त झाल्या आहेत. उच्चार आणि संवाद योग्य भावनांसह आल्याचे जाणवते. तिचा लूक एकूण भूमिकेला साजेसा झाला आहेच. शिवाय, इतर कलाकारांसोबत जुळवून घेण्याची क्षमता किंवा केमिस्ट्री चांगली जुळून आली आहे.
 
श्री गुरुमाईंच्या जीवनात घडलेल्या त्या-त्या ठिकाणी प्रत्यक्ष झालेले चित्रीकरण आणि श्री गुरुमाईंकडून क्रियायोगाची दीक्षा घेतलेल्या साधकांनी केलेल्या छोट्या-छोट्या भूमिका हेही चित्रपटाचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. चित्रपट संपताना उत्तराखंडमधील कुकुछिना येथील महावतार बाबाजींच्या गुहेच्या पार्श्वभूमीवर (याच गुहेमध्ये महावतार बाबाजींनी लाहिरी महाशयांना क्रियायोगाची दीक्षा देऊन उर्वरित आयुष्य क्रियायोगाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी व्यतित करण्याचा आदेश दिला होता.) श्री गुरुमाईंचे प्रत्यक्ष दर्शन व त्यांचे संक्षिप्त संबोधन चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते.
 
हिंदी चित्रपटाचे प्रथमच दिग्दर्शन करणे असो किंवा प्रथमच चित्रपटनिर्मिती म्हणून असणार्‍या मर्यादा समजूनही संवाद, संपादन, दृश्यात्मक कथा किंवा संगीत अशा विविध पातळ्यांवर चित्रपट यशस्वी ठरला आहे, हे निश्चित. बॉलीवूडच्या सतत प्रदर्शित होणार्‍या मारधाड किंवा प्रेमकथांच्या गर्दीमध्ये या चित्रपटाला थिएटर्स उपलब्ध होणे हे आव्हान निर्मात्यांना पेलावे लागणार आहे. कारण, वितरकांना आणि थिएटर मालक-चालकांना त्यांची आर्थिक बाजू लक्षात घेऊन अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रतिसाद मिळेल किंवा कसे, अशी शंका असते. परंतु, अनेक साधकांनी, तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक गटांनी हा चित्रपट स्वत:च्या हिमतीवर चालविला आहे. साधना व आत्मज्ञान यांचा अद्भुत संगम असलेल्या आणि गुरू म्हणजे अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी व आध्यात्मिक मार्गदर्शन करणारी अधिकारी व्यक्ती, ही भावना दृढ करणारा; गुरू-शिष्य परंपरेवरील विश्वास अधिक बळकट करणारा हा चरित्रपट मोठ्या प्रमाणावर सर्व ठिकाणी प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल आणि यानिमित्ताने मानवी जीवनाला वरदान ठरलेल्या क्रियायोगासारख्या योगप्रणालीचा अंगीकार करून आपले जीवनमान, शारीरिक-मानसिक आरोग्य उंचावण्यासाठी सर्वसाधारण जनता अधिकाधिक उद्युक्त होईल, या अपेक्षा आणि शुभेच्छांसह...!
 
दिग्दर्शक : संतोष मांजरेकर
 
निर्माते : भद्रबाहू डिव्हाईन क्रिएशन्स एलएलपी
 
कलाकार : उदय टिकेकर, संदेश जाधव, अक्षय वर्तक, नयन जाधव, अनिषा सबनीस
 
पाहुणे कलाकार : संतोष जुवेकर आणि विनित शर्मा
 
संगीत : प्रवीण कुंवर
 
पटकथा : अनिल पवार
 
संवाद : श्री गुरूमाई आणि
अनिल पवार
 
गीतकार : समृद्धी पवार
 
संपादन : नीलेश गावंड
 
छायांकन : अजित रेड्डी
 
 
 - प्रकाश बापट
 
 
Powered By Sangraha 9.0