श्रद्धेचा चमत्कार

21 Dec 2025 12:18:17

Dandakrama Patha
 
अहिल्यानगरमधील १९ वर्षीय देवव्रत महेश रेखे ‘शुक्ल यजुर्वेदा’च्या ‘माध्यंदिन’ शाखेतील दोन हजार मंत्रांचे ‘दण्डक्रम पारायण’ अवघ्या ५० दिवसांत यशस्वीरित्या पूर्ण करून ‘वेदमूर्ती’ ठरले. रेखेंवर कौतुकवर्षाव होत असताना, समाजमाध्यमांवर त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीवरुन नतद्रष्टांकडून हेटाळणीही केली गेली. त्यामागचे कारण म्हणजे, वेदांविषयीचे अज्ञान आणि वेदांकडे बघण्याचा संकुचित, कलुषित दृष्टिकोन! तेव्हा, देवव्रत महेश रेखे यांच्या ‘दण्डक्रम’ पाठाच्या निमित्ताने वेदांच्या पठण परंपरेचा समृद्ध इतिहास, स्वरूप हे समजून घेणे क्रमप्राप्त ठरावे.
 
नुकताच वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे या अहिल्यानगरच्या वेदाभ्यासकाने यजुर्वेदाच्या ‘दण्डक्रमा’चा पाठ करून विश्वविक्रम केला. त्यावरही बर्‍याच उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. वेदमूर्ती रेखे हे तरुण आहेत. तरुण वयात उत्साह असतो. आपण अभ्यासासाठी जी शाखा निवडली आहे, ते चरितार्थाचे साधन होईल का नाही, असा विचार मनात येतोच असे नाही. उलट, जो अभ्यासविषय आपण निवडला आहे, त्यात काहीतरी करून दाखवावे, अशी उत्कट इच्छा मात्र असते. वेदमूर्ती देवव्रत रेखे यांनी आपल्या वडिलांपाशीच, वेदमूर्ती महेश रेखे यांच्यापाशी श्रद्धेने कष्टसाध्य वेदाध्ययन केले आहे.
 
वेदमूर्ती महेश रेखे कैलासवासी वेदमूर्ती श्रीकृष्ण गोडशे गुरुजी यांचे शिष्य आहेत. वेदमूर्ती गोडशे गुरुजींचा शुक्ल यजुर्वेदाचे उत्तम, प्रेमळ आणि विचारी शिक्षक म्हणून नावलौकिक होता. त्यांनी ‘प्रातिशाख्यप्रदीप’ नावाची शुक्ल यजुर्वेदाच्या पठण परंपरेचे नियम सांगणारी एक शिक्षाही लिहिली आहे. सुवर्णा नावाच्या गोव्यातल्या अब्राह्मण मुलीला त्यांनी शुक्ल यजुर्वेद शिकवला. वेदमूर्ती देवव्रत रेखे याच परंपरेतले आहेत. त्यांनी आपल्या घरात चालत आलेली पठण परंपरा जपण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केला, तोही अवघ्या १९व्या वर्षी. याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे. त्यांचे ‘रेखे’ हे आडनावही ‘रेखापाठ म्हणणारे’ याअर्थी पडले असावे. यावरून त्यांच्या घराण्याची वेदपठणाची परंपरा लक्षात येते. त्यांच्या या दण्डक्रमपाठाच्या निमित्ताने वेदांच्या पठण परंपरेचा इतिहास काय असावा, स्वरूप काय असते, असे प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येतात. ते अगदी थोडयात सांगण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात केला आहे.
 
यज्ञसंस्थेशी साक्षात संबंध असल्यामुळे यजुर्वेद खूप महत्त्वाचा. त्याच्या मुख्य दोन शाखा-कृष्ण आणि शुल. कृष्ण यजुर्वेदामध्ये मंत्र आणि मंत्रांचे विवेचन यांची सरमिसळ असते. याज्ञवल्क्य या प्रसिद्ध ऋषींनी यातले विवेचन वगळून फक्त मंत्र संग्रहित केले. हाच तो शुक्ल यजुर्वेद. कालांतराने याच्या दोन शाखा तयार झाल्या-काण्व आणि माध्यंदिन. वेदमूर्ती रेखेंनी माध्यंदिन शाखेचा पाठ केला. वेदाचे जतन करणारी ही पठण परंपरा जगातले एक आश्चर्य आहे, असे म्हटले, तर त्यात अतिशयोक्ती नाही. ही पठणपरंपरा नेमकी कधी सुरू झाली, हे सांगता येत नाही. परंतु, ऋग्वेदाच्या निर्मितीकालातही ही परंपरा काही प्रमाणात अस्तित्वात असावी. देवतांची स्तुती केल्यामुळे पाऊस पडतो, अभीष्ट गोष्टी साध्य होतात, ही धारणा असल्यामुळे देवतांची स्तुती करून त्यांना आवाहन करणार्‍या कवींना ऋग्वेदाच्या निर्मितीकालात महत्त्व होते. सर्वजण कवी नसतात. परंतु, काव्यामुळे मिळणारी भौतिक समृद्धी सर्वांना हवीशी वाटते.
 
यामुळे कदाचित देवतांच्या प्रार्थना संग्रहित करून त्यांचे पठणपरंपरेने जतन करण्याची पद्धत पडली असावी. ऋग्वेदकालातही ही पठणपरंपरा अस्तित्वात असावी. ऋग्वेदामध्ये सातव्या मंडळात वसिष्ठ ऋषींची सुक्ते संग्रहित आहेत. त्यामध्ये ‘मंडूक’ म्हणजे बेडकांचे वर्णन करणारे एक सूक्ते आहे. हे सूक्ते म्हणजे पाऊस पाडण्यासाठी वापरत असलेला एक तोडगा आहे, असा निर्वाळा अभ्यासकांनी दिलेला आहे. या सुक्तामध्ये ऋग्वेदकालीन पठण परंपरेचा पुरावा सापडतो. ‘अख्खलीकृत्य पितरं न पुत्रो अन्यो अन्यमुपवदन्तमेति|’ (ऋ. ७.१०३.३) (ज्याप्रमाणे मुलगा आपल्या वडिलांनी उच्चारलेले अक्षर अन् अक्षर उच्चारतो, त्याप्रमाणे एक बेडूक दुसर्‍या बेडकासारखा आवाज काढतो.) ‘यदेषामन्यो अन्यस्य वाचं शाक्तस्येव वदति शिक्षमाणः|’ (ऋ. ७.१०३.५.) (जसा शिकणारा शिकवणार्‍याचे शब्द उच्चारतो, त्याप्रमाणे यांच्यापैकी एकजण दुसर्‍याचा आवाज काढतो). या ऋचांमधले उल्लेख कदाचित पठणपरंपरेचा निर्देश करत असावेत. एकंदरित, ‘गुरुमुख-उच्चारण-अनु-उच्चारणम् ‘गुरूने सांगितल्याबरहुकूम उच्चारण करणे, हे पठण परंपरेचे मुख्य स्वरूप.
 
कालांतराने शिस्तबद्ध पाठपरंपरा तयार झाली असावी. पाठपरंपरेचा उद्देश वेदाचे जतन करणे हाच असावा. भाषा बदलत जाते, तिच्यावर आसपासच्या भाषांचा परिणाम होतो, याची जाणीव त्याकाळात होती. शिवाय लेखनकला अस्तित्वात नाही. अशा वेळी जर एखादा ग्रंथ समाजाला महत्त्वाचा वाटत असेल, त्यावर दैनंदिन व्यवहार अवलंबून असतील, तर त्याचे जतन कसे करावे, हा प्रश्न तत्कालीन विचारवंतांना पडला होता.
 
नंतर सुमारे इ.स. पू. ७०० पासून वेदाच्या प्रकृतिपाठाचे उल्लेख सापडतात. वेदांचे अक्षरशः संरक्षण व्हावे, या उद्देशाने पाठ तयार झाले. पाठांचे मुख्य दोन प्रकार पडतात १) पहिला गट प्रकृतिपाठांचा आणि २) दुसरा विकृतिपाठांचा. प्रकृतिपाठांमध्ये मंत्रांच्या शब्दाचा क्रम बदलत नाही. याउलट, या मूळ क्रमामध्ये विकृतिपाठात बदल होतो. म्हणून त्याला विकृतिपाठ म्हणतात. विकार किंवा विकृति म्हणजे बदल.
 
प्रकृतिपाठ पुढीलप्रमाणे -
 
१) संहितापाठ - यात मूळ मंत्र संधिसहित असतो. उदा. ‘अग्निमीळे पुरोहितम्’ हा ऋग्वेद संहितेतल्या पहिल्या मंत्राच्या भागाचा संहितापाठ. हा पाठ संधी आणि समाससहित आहे.
 
२) पदपाठ - यामध्ये मूळ मंत्रातली पदे (शब्द) एका मात्रेच्या विरामाने (लिखित परंपरेमध्ये दंडाने) संधी सोडवून दाखवली जातात. समासाचे शब्द अर्ध्या मात्रेच्या विरामाने (लिखित परंपरेमध्ये अवग्रहाच्या साहाय्याने) सोडवून दाखवले जातात. उदा. अग्निम्| ईळे| पुरः ऽ हितम्| ऋग्वेदाचा पदपाठ शाकल्य या व्याकरणकारांनी केला. यामध्ये पाणिनिपूर्व व्याकरणाचे नियम आहेत. ते शोधून काढण्याचे काम ‘संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रा’चे भूतपूर्व संचालक आणि माझे मार्गदर्शक प्रा. वसिष्ठ नारायण झा यांनी केले आहे. तैत्तिरीय संहितेचा पदपाठ आत्रेयाने रचला आहे. यामधले ऋग्वेदाच्या तुलनेत व्याकरणाच्या नियमांचा विकास झालेला दिसून येतो. शिवाय, या दोन परंपरा भिन्न असाव्यात, असे प्रतिपादन मी माझ्या प्रबंधात केले आहे.
 
३) क्रमपाठ - यामध्ये संहिता पाठ आणि पदपाठ दोन्हींचे जतन केले जाते. ‘अग्निमीळे| ईळे पुरोहितम्| पुरोहितमिति पुरः ऽ हितम्|’ याप्रमाणे १२| २३| असे शब्दांचे गट केले जातात आणि सामासिक शब्दात संहितेचा भाग म्हणून त्याला ‘इति’ जोडून समास सोडवून दाखवतात. पुरोहितम् हा समास संहितापाठाचा भाग आहे, त्याला ‘इति’ जोडला आणि नंतर पुरः आणि हितम् हे सामासिक घटक पदपाठाप्रमाणे वेगळे करून दाखवले.
 
या तीनही प्रकारच्या पाठामध्ये मंत्राच्या शब्दांचा क्रम बदलला जात नाही; म्हणून त्यांना क्रमपाठ म्हणतात. यानंतर येतात अष्टविकृति, आठ विकृति पाठ. यामध्ये मंत्राच्या शब्दांच्या क्रमामध्ये बदल होतो, म्हणून यांना विकृतिपाठ म्हणतात.
 
अष्टविकृति
 
 
१) जटा - यामध्ये पदांची रचना १२२११२| २३३२२३| इ. अशी होते. ‘अग्निमीळे ईळेऽग्निमग्निमीळे|’ या पाठात वेणीचे पेड घालताना त्यांची जागा जशी बदलली जाते, तशा शब्दांच्या जागा बदलल्या जातात. म्हणून याला जटापाठ हे नाव मिळाले.
 
२) माला - यामध्ये जटापाठाप्रमाणेच शब्दांचा क्रम असतो, फक्त दोन पदांनंतर विराम घेतला जातो. उदा. ’अग्निमीळे| ईळेऽग्निम्| अग्निमीळे|’
 
३) शिखा - यामध्ये १२२११२३| हा शब्दक्रम असतो. उदा. ‘अग्निमीळेऽळेऽग्निमग्निमीळे पुरोहितम्|’ यात सुलट, उलट म्हणून झाल्यावर पुढचा एकेक शब्द जोडत जातात.
 
४) रेखा - १२|२१|१२| २३४| ४५६७| ३४| ‘अग्निमीळे| ईळेऽग्निम्| अग्निमीळे| ईळे पुरोहितम् यज्ञस्य| पुरोहितमिति पुरःऽहितम्| यज्ञस्य देवमृत्विजम् होतारम्| पुरोहितं यज्ञस्य|’ इ. यामध्ये सुलट, उलट, सुलट असे विरामासहित म्हटल्यावर पुढची दोन पदे म्हणतात. पुन्हा शेवटच्या शब्दाला त्या पुढची दोन पदे जोडून घेतली जातात. तीन, चार, पाच शब्दांचे दोन गट म्हटल्यावर पुन्हा दोन दोन शब्दांच्या जोड्या म्हटल्या जातात. संपूर्ण मंत्र संपेपर्यंत असे उच्चारण केले जाते.
 
५) ध्वज - हा पाठ अधिक किचकट आहे. पहिले दोन शब्द मग त्या मंत्राचे शेवटचे दोन शब्द. १-२| ९९- १००|३-४| ९८-९७| अशा रितीने संपूर्ण मंत्र किंवा ५० - १०० शब्दांचा गट म्हटला जातो.
 
६) दण्ड - यामध्ये १२| २१| २३| ३२१| ३४| ४३२१ अशी रचना मंत्र संपेपर्यंत असते.
 
७) रथ - यामध्ये मंत्राच्या प्रथम पादातली दोन पदे दुसर्‍या पादातली दोन पदे सुलट आणि उलट अशा रितीने म्हटली जातात.
 
८) घन - हा पाठ सर्वांत कठीण मानला गेला आहे. घनपाठी ब्राह्मणांना पूर्वी खूप सन्मानाचे स्थान असे. या प्रकारच्या पाठामध्ये पहिली पाच पदे, मग तीन पदे सुलट, तीन पदे उलट अशा प्रकारे संपूर्ण ग्रंथ म्हटला जातो.
 
या अष्टविकृति समजायला आणि लक्षात ठेवायला निश्चितच कठीण आहेत. यात कालांतराने ‘दण्डक्रम’ नावाची आणखी एक पठण पद्धती अस्तित्वात आली. हीच पठणाची रीत वेदमूर्ती देवव्रत रेखे यांनी अनुसरली. पाठांतराच्या या पद्धतीमध्ये पहिले काही शब्द सुलट आणि नंतर तेच शब्द उलट उच्चारतात. वेदमूर्ती रेखे यांनी पाच शब्दांचा घटक मुख्य मानला होता, असे दिसते. म्हणजे १२३४५| ५४३२१| २३४५६| ६५४३२| वरचा ऋग्वेदातला मंत्र उदाहरण म्हणून घेऊ. ‘अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवम्| देवं यज्ञस्य पुरोहितमीळेऽग्निम्| पुरोहितमिति पुरः ऽ हितम्| ईळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्| ऋत्विजं देवं यज्ञस्य पुरोहितमीळे| पुरोहितमिति पुरःऽहितम्|’
 
अशा प्रकारे दोन हजार मंत्रांचे (सुमारे २५ हजार शब्द) ५० दिवसांत पठण केले. असे स्वतंत्र पठण सुमारे १०० वर्षांपूर्वी वेदमूर्ती देव यांनी नाशिक येथे केले होते, अशी ऐकीव माहिती आहे. म्हणून वेदमूर्ती रेखे यांनी विश्वविक्रम केला, असे म्हटले जाते. श्रद्धा असली, एकाग्रता असली, ध्येय असले की मानवी बुद्धी चमत्कार करू शकते, ती अशी. हा चमत्कार जसा स्मरणशक्तीच्या क्षेत्रात घडला, तसा निर्मितीक्षेत्रातही होऊ शकतो.
 
आता वरच्या कोणत्याही प्रकृतीचे अथवा विकृतीचे पठण करणे ही सामान्य बाब नाही. भारतीय लोक स्मरणशक्तीच्या बाबतीत जगात अव्वल मानले जातात. अशा प्रकारची पठण पद्धती त्याला कारणीभूत असेल का माहीत नाही. तथापि, प्राचीन विचारवंतांनी विचारपूर्वक ही पद्धत तयार केली, या नियमांमुळेच वैदिक वाङ्मयात पाठभेद नाहीत. मॅक्स म्यूलरनी ऋग्वेदाची पहिली संपादित आवृत्ती छापली. या आवृत्तीच्या प्रस्तावनेत त्यांनी ही गोष्ट विशेषत्वाने नमूद केली आहे. दुसरे म्हणजे, पठण पद्धतीमध्ये स्वरांचे बारकावे दाखवले जातात. शुक्ल यजुर्वेदामध्ये तर स्वरांचा निर्देश करण्यासाठी हस्तमुद्रांचाही उपयोग केला जातो.
 
अशा अनेक बाबींचा विचार करता, वैदिक पठण आजच्या काळातही कालबाह्य म्हणता येणार नाही. निर्जीव ध्वनिफितींपेक्षा सजीव ध्वनिफिती केव्हाही श्रेष्ठ. आमच्या एका ज्येष्ठ मित्राने सामवेदाच्या केरळमधल्या जैमिनीय सामगानाच्या चित्रफिती तयार केल्या. तथापि, त्यातल्या काही फिती खराब झाल्या आहेत; जर वैदिक पठण नष्ट झाले, तर भारतीय इतिहासाचा एक कोपराच नष्ट होईल, अशा सजीव ध्वनिफितींमुळे विस्तृत वेदवाङ्मय बरेचसे टिकून राहिले आहे. त्याची पठण परंपरा नष्ट झाली, तर ते गमावल्यानंतर मात्र आपण काय गमावले, याची जाणीव समाजाला होईल, तेही परदेशी अभ्यासकांनी सांगितल्यानंतर.
 
वैदिक गुरुकुलामधला दिनक्रम पाहिला, तर आपल्या शाळांमधल्या मुलांपेक्षा अधिक कष्टप्रद आहे. पहाटे उठून व्यायाम, मग स्नानानंतर संथा सुमारे दोन-तीन तास. मग विश्रांती, मग पुन्हा संथा. त्यानंतर खेळ, मनोरंजन इ. शिवाय अभ्यासक्रम पूर्ण आत्मसात झाल्यावरच समावर्तन (समारंभपूर्वक स्नातक होण्याचा विधी) होते. परीक्षा न देता उत्तीर्ण होत नाहीत. या गुरुकुलामध्ये दाखल होणारे विद्यार्थी बरेचसे परिस्थितीच्या रेट्याने येतात, तर काही वेदांवर श्रद्धा असल्यामुळे अध्ययन करतात. जे बुद्धिमान असतात, ते या क्षेत्रातही काही करून दाखवतात. ‘नास्ति खलु धीमतां कश्चिदविषयो नाम’ हे वचन खरे ठरते. (जे बुद्धिमान असतात, त्यांना कोणत्याच विषयाचे वावडे नसते, विषय कोणताही असो त्यांना समजतोच, आवडतोच.)
 
सध्याच्या काळात गुरुकुलात जाऊन वेदाध्ययन करणार्‍यांची संख्या तुरळक आहे. गुरुकुलात दोन प्रकारचे विद्यार्थी येतात. काहीजण पौरोहित्य शिकतात. त्यांना उपजीविका करणे सध्याच्या काळात फारसे अवघड नाही. परंतु, वेदाध्ययन करणार्‍या विद्यार्थ्याला काही ठिकाणी सन्मान मिळाला, तरी भाजी-भाकरीची विवंचना असतेच. एकतर बरीच वर्षे अध्ययन करावे लागते. वैदिक भाषा सस्वर जपून ठेवली आहे. त्यामुळे पाठांतर करताना उदात्तादि स्वर ध्यानात घेऊन पाठांतर करावे लागते. आणि ते सोपे नाही, हे आपण पाहिलेच. तथापि, वेदाध्ययन करणार्‍याला मिळणारे पठण पद्धतीचे ज्ञान वादातीत आहे.
 
भारतात आणि परदेशातल्या ग्रंथालयांमध्ये पाठांतराशी संबंधित अनेक हस्तलिखिते आहेत. त्यांना ‘लक्षणग्रंथ’ म्हणतात. त्यांपैकी अगदी काही ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांचे महत्त्वाचे कारण म्हणजे, पाठांतराची पद्धत समजल्याखेरीज हे ग्रंथ समजणे कठीण आहे. हे ग्रंथ समजण्यासाठी पठण पद्धतीचा अनुभव आवश्यक असतो. के. परमेश्वर ऐथळ यांनी अशा हस्तलिखितांची आणि प्रकाशित ग्रंथांची सूची प्रसिद्ध केली आहे. वेदमूर्ती रेखे आणि त्यांच्यासारख्या गुरुकुल पद्धतीने अध्ययन करणार्‍यांनी जर अशा हस्तलिखितांचा अनुवाद भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध केला, त्यातल्या पारिभाषिक संज्ञा समजावून सांगितल्या, तर आधुनिक पद्धतीने अध्ययन करणार्‍यांना खूप उपयोग होईल. अशा गुरुकुलांनी आधुनिक अभ्यासकांशी सहयोग (कोलॅबरेशन) करून असे उपक्रम राबविणे शक्य आहे.
- प्रा. निर्मला कुलकर्णी
(लेखिका संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.)
 
 
 
Powered By Sangraha 9.0