उस्मान हादीची अंत्ययात्रा पूर्ण; ढाका विद्यापीठात दफन

20 Dec 2025 16:16:49
 
Usman Hadi
 
मुंबई : ( Usman Hadi ) बांगलादेशचा विद्यार्थी नेता आणि इन्कलाब मंचचा संयोजक शरीफ उस्मान हादी याला शनिवारी अंतिम निरोप देण्यात आला. ढाका येथे अंत्ययात्रेनंतर त्याच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार ढाका विद्यापीठ परिसरातील कवी काझी नजरुल इस्लाम यांच्या कबरीजवळ त्याच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले.
 
हादीचे पार्थिव आणण्यात येणार असल्याचे कळाल्यानंतर सकाळपासूनच अनेक लोक संसद भवनासमोर लहान लहान गटात जमू लागले होते. त्याच्या अंत्ययात्रेत लोकांनी त्याला न्याय मिळवून देण्याची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या. अनेक लोक बांगलादेशी राष्ट्रध्वजात लपेटून आले होते.
 
दरम्यान सिंगापूरमधील त्याच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर बांगलादेशमधील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती. गेल्या दोन दिवसांपासून देशाच्या अनेक भागांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि निदर्शने सुरू झाली आहेत, ज्यामध्ये दोन माध्यमांची कार्यालये जाळण्यात आली. तसेच अनेक सरकारी कार्यालये देखील पेटवली गेली.
 
हेही वाचा : शरीफ उस्मान हादीच्या अंत्यसंस्कारावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ढाकामध्ये सीमा रक्षक तैनात
 
सुरक्षा एजन्सी सतर्क
 
अंत्यसंस्कारापूर्वी राजधानी ढाका येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. संसद भवनात आणि आजूबाजूला पोलिस, सीमा रक्षक आणि इतर सुरक्षा एजन्सी तैनात करण्यात आल्या होत्या. दोन दिवसांच्या हिंसक निदर्शनांनंतर शनिवारी ढाकामध्ये तुलनेने शांतता होती. हादीच्या मृत्यूबद्दल देशभरात राष्ट्रीय शोक पाळण्यात आला. राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला आणि विविध धार्मिक स्थळांवर विशेष प्रार्थना करण्यात आल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0