संस्कृतीचं वैभव जपण्यासाठी...

20 Dec 2025 11:19:12
Archaeology
 
काळाच्या पटावर, विविधतेसह आपलं स्वतंत्र अस्तित्व जपणारा भारत बहुधा जगातील एकमेव देश असावा. भारतीय ज्ञानपरंपरेचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी अनेक लोक कार्यरत असतात. अशातच आता मुंबईच्या साठये महाविद्यालयात वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या सहयोगाने ‘पुरातत्त्व महा-प्रदर्शन २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. पुरातत्त्व पंधरवड्याअंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन, भारतीय पुरातत्त्वशास्त्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व डॉ. एच. डी. सांकळिया यांच्या ११७व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले आहे. दि. १८ ते २१ डिसेंबर या कालावधीमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. या प्रदर्शनाचे नेमकेपण आणि वेगळेपण कशात आहे, याचा वेध घेणारा हा लेख...
 
इतिहासाच्या पानांमध्ये दडलेला इतिहास हा वस्तुसंग्रहालयांमध्ये जिवंत होतो. एखाद्या भग्नावस्थेत असलेले शिल्प, धुळीने माखलेले ताम्रपट, सोने-चांदीचे नाणे, तांब्या-पितळ्याच्या वस्तू, इतकेच काय, तर दगड-धोंडेसुद्धा एका विशिष्ट काळाचे साक्षीदार असतात. हा काळ म्हणजे केवळ गेलेला भूतकाळ नसतो, तर यातून प्रत्येक समाजाला, राष्ट्राला आपल्या संस्कृतीचा विचार शोधायचा असतो. वर्तमानामध्ये आपल्याला आपल्या भोवताली अनेक विषय, अनेक प्रश्न पडतात. व्यक्तीचा स्वभाव असो किंवा समूहजीवनाचे मानस, या सार्‍यांची मूळं इतिहासामध्ये दडलेली असतात. भारतासारख्या देशामध्ये जिथे १२ मैलांवर भाषा बदलते, तिथे या विविधतेला सीमा राहात नाही. आपल्या देशाच्या संस्कृतीची हीच विविधता आणि या विविधतेमध्ये दडलेले सामर्थ्य, याचाच प्रामुख्याने साठये महाविद्यालयातील प्रदर्शनामध्ये विचार करण्यात आला आहे. अतिप्राचीन काळापासून ते मध्ययुगीन कालखंडातील वेगवेगळ्या साम्राज्यांपर्यंत इतिहासातील अनेक कवडसे आपल्यासमोर मुक्त संचार करत असल्याचे आपल्याला जाणवते.
 
प्राचीन काळातील शिलालेखांची माहिती देणारी आकर्षक भित्तिचित्रे आपल्याला या प्रदर्शनात बहुमोल मार्गदर्शन करतात. आदि युगातील माणसाने आपल्या कौशल्यातून स्वसंरक्षणासाठी हत्यारे तयार केली. दगडापासून तयार केलेल्या अशा अनेक वस्तूंच्या प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. प्राचीन काळापासूनच भारत व्यापारासाठी ओळखला जात असे. वापरात असलेल्या चलनाच्या माध्यमातून, तत्कालीन समाजाच्या संस्कृतीची माहिती आपल्याला होते. ‘पुरा संस्कृती’ या संस्थेच्या माध्यमातून या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या काळातील नाणी दशकांसाठी प्रदर्शित केली गेली आहेत.
 
या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जैन धर्मातील तीर्थंकर यांचे विचार मांडणारे एक स्वतंत्र दालन. अगाशी, सोपारा ही महाराष्ट्रातलीच ठिकाणे आहेत, जिथे जैन धर्माचा विचार एके काळी फुलला होता. इतिहासाचे प्रदर्शन आणि मराठ्यांची युद्ध सामग्री हे विशेषण जणू एकमेकांना पूरक असेच झाले आहे. किंबहुना, शस्त्रप्रदर्शनाशिवाय इतिहासाचे प्रदर्शन अधुरेच वाटते. परकीय चित्रकारांनी साकारलेली छत्रपतींची छायाचित्रे असो किंवा शिवकालीन शस्त्रास्त्रे, या दालनाच्या माध्यमातून शिवकालीन विचार पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचत आहे. हे प्रदर्शन बघण्यासाठी केवळ युवकांनीच गर्दी केलेली आहे, असे नाही, तर वेगवेगळ्या शाळांच्या माध्यमातून बालकुमारांचा ओघही या प्रदर्शनाकडे ओसंडून वाहत आहे.
 
या बालकुमारांना महाविद्यालयातील युवक इतिहासातील अनेक गमतीजमती उलगडून सांगताना दिसतात. शिक्षणाच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने असा संवाद घडणे आवश्यक असते. हा संवाद आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. या प्रदर्शनामध्ये एकूण १२ दालनं आहेत, ज्यांच्या माध्यमातून इतिहासाचा हा वारसा मुलांपर्यंत पोहोचत आहे. डिसेंबरचा महिना म्हटल्यावर एका बाजूला महाविद्यालयांमध्ये मोठमोठ्या ‘फेस्ट’ची चलती असते. तरुणांमध्ये उत्सवाची लाट निर्माण करणारे असंख्य कार्यक्रम अशा सोहळ्यांमधून साकारले जातात. अभ्यासाच्या एकसुरी वातावरणातून विसावा म्हणून हे उत्सव तितकेच गरजेचेदेखील असतात. मात्र, याच काळात इतिहासाचा विचार पुढच्या पिढीला पटवून द्यावा, या हेतूने साकारलेले हे प्रदर्शन वेगळे म्हणावे लागेल. खोटी कथनं निर्माण करून, युवा पिढीची दिशाभूल करणारे अनेक लोक आजही कार्यरत आहेत, ज्यांच्यामुळे आपल्या इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल मुलामुलींच्या मनात गैरसमज खोलवर रुजलेले आहेत. अशा वातावरणात, सत्य सांगण्याची जबाबदारी घेणार्‍या संस्थांचे, व्यक्तींचे कौतुक करावे तितके थोडे. इतिहासाचे सम्यक् आकलन करून घ्यावे व कुठल्याही दिशाभूल करणार्‍या तंत्राला बळी न पडता, सत्य सांगावे हाच विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा, हे जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य!
 
 
Powered By Sangraha 9.0