आकाशाला भिडणारी शहरे

20 Dec 2025 11:09:52

mumbai 
 
आज मुंबईसारख्या मोठ्या शहरात नव्या माणसाने पाऊल टाकताच, नजर नकळतच आकाशाला भिडणार्‍या गगनचुंबी इमारतींकडे वळते. आज या इमारती केवळ काँक्रीट, स्टील आणि काचेच्या रचना नाहीत, तर त्या आधुनिक मानवाच्या महत्त्वाकांक्षेचे, तंत्रज्ञानाचे आणि बदलत्या शहरी जीवनशैलीचे प्रतिबिंब ठरल्या आहेत. विशेषतः २१व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांनी गगनचुंबी इमारतींच्या विकासाला एक निर्णायक वळण दिले. सन २००० नंतर उभारल्या गेलेल्या इमारतींचा वेग, उंची आणि स्वरूप पाहता, त्याआधीच्या काळाशी तुलना केली तर हा बदल अधिक ठळकपणे जाणवतो.
 
विस्तृत आकडेवारी, संशोधन आणि जागतिक अभ्यासातून असे स्पष्ट होते की, आधुनिक गगनचुंबी इमारती केवळ अधिक उंच झालेल्या नाहीत, तर त्यांच्या उपयोगात, रचनेत आणि शहराच्या दृश्यात्मक ओळखीत आमूलाग्र बदल झाला आहे. आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका आणि आफ्रिका या खंडांतील शहरांचा अभ्यास करताना शांघाय, बीजिंग, शेन्झेन, बँकॉक, लंडन, मॉस्को, न्यूयॉर्क, शिकागो, मेलबर्न, सिडनी, दुबई, दोहा, रियाध, तेल अवीव, साओ पाउलो, पनामा सिटी, मेसिको सिटी आणि नैरोबी यांसारखी शहरे ‘उभ्या शहरीकरणा’ची जागतिक उदाहरणे ठरली आहेत. या शहरांमध्ये गगनचुंबी इमारती म्हणजे, फक्त कार्यालये किंवा घरे नसून, त्या संपूर्ण शहरी जीवनाचे केंद्र बनल्या आहेत. या अभ्यासातून एक गोष्ट ठळकपणे समोर येते की, उंची वाढते तशी कार्यक्षमताही बदलते. आधुनिक गगनचुंबी इमारतींमध्ये कार्यालये, घरे, हॉटेल्स, शॉपिंग झोन, मनोरंजन केंद्रे आणि सार्वजनिक सुविधा एकाच संरचनेत गुंफल्या जात आहेत. परिणामी, शहरातील हालचालींचा वेग, वाहतुकीची दिशा आणि माणसाचे दैनंदिन आयुष्य अधिक केंद्रित; पण तितकेच गतिमान झाले आहे.
 
‘कौन्सिल ऑन टॉल बिल्डिंग अ‍ॅण्ड अर्बन हॅबिटॅट’च्या अहवालानुसार, किमान १५० मीटर उंच असलेली इमारत गगनचुंबी मानली जाते. या व्याख्येनुसार पाहिले तर जगात सर्वाधिक गगनचुंबी इमारती असलेले शहर म्हणजे हाँगकाँग. जवळपास ५६० उंच इमारतींनी सजलेले हे शहर मर्यादित भूभाग, डोंगराळ रचना आणि वाढती लोकसंख्या यामुळे आकाशाच्या दिशेने वाढले. ‘इंटरनॅशनल कॉमर्स सेंटर’, ‘टू इंटरनॅशनल फायनान्स सेंटर’ आणि आय. एम. पेई यांनी डिझाईन केलेला ‘बँक ऑफ चायना टॉवर’ हे केवळ वास्तुशिल्प नाहीत, तर शहराच्या ओळखीची चिन्हे बनले आहेत. शेन्झेन, न्यूयॉर्क, दुबई, शांघाय, क्वालालंपूर आणि मुंबईसारखी शहरेही आज बदलत्या स्कायलाईनमुळे जागतिक नकाशावर उठून दिसतात.
 
या गगनचुंबी इमारतींचा मोठा फायदा म्हणजे मर्यादित जमिनीचा कार्यक्षम वापर आहे. कमी जागेत अधिक लोकांना राहण्याची, काम करण्याची आणि व्यवसाय करण्याची संधी मिळते. आर्थिक व्यवहार वाढतात, रोजगारनिर्मिती होते आणि शहरांचे जागतिक महत्त्व वाढते. आधुनिक इमारतींमध्ये ऊर्जाबचत, सौरऊर्जा, पाणी पुनर्वापर आणि हरित तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने त्या पर्यावरणपूरकतेकडेही वाटचाल करत आहेत.
 
मात्र, या उंच भरारीसोबत काही आव्हानेही येतात. उंच इमारती शहराच्या नैसर्गिक हवामानावर परिणाम करतात. वार्‍याचा वेग, तापमान आणि सूर्यप्रकाशाच्या हालचाली बदलतात. वाढती घनता पाणी, वीज, वाहतूक आणि सार्वजनिक सेवांवर ताण आणते. आलिशान टॉवर्स आणि झोपडपट्ट्यांमधील सामाजिक दरी अधिक ठळक होते; तर आग, भूकंप किंवा आपत्तीच्या वेळी व्यवस्थापन हे मोठे आव्हान ठरते. मागेच हाँगकाँगमध्ये गगनचुंबी इमारतीत लागलेल्या आगीत एकूण१६० जण होरपळून ठार झाले होते. त्यामुळे शहरातील इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला.
 
एकूणच, २१व्या शतकातील गगनचुंबी इमारती म्हणजे मानवी स्वप्नांना उंची देणारी प्रतीके आहेत. मात्र, ही उंची टिकाऊ ठरायची असेल, तर तिच्या पायाशी पर्यावरणीय समतोल, सामाजिक समावेशकता आणि संवेदनशील शहरी नियोजन असणे तितकेच गरजेचे आहे. आकाशाशी संवाद साधणारी शहरे घडवताना जमिनीवर उभ्या असलेल्या माणसाचे जीवनमान समृद्ध करणे, हाच खरा शाश्वत विकास ठरेल.
 
 
Powered By Sangraha 9.0