क्रोध, अतिसंताप या मानसिक भावनेबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत. आजच्या भागात क्रोधाचे शरीरावर, मनावर होणारे परिणाम आणि एकूणच मानवी प्रतिक्रिया यांविषयी माहिती करुन घेऊया...
ति संताप आणि राग यात फरक आहे. राग बरेचदा क्षणिक असतो. राग छोटी ठिणगी असते व रागाचे रूपांतर अति संताप/क्रोधात होऊ शकते. संताप दीर्घकालीन टिकतो. संताप असतेवेळी इतरांचे अहित सर्वाधिक कसे साधता येईल, अशा नकारात्मक आणि विद्ध्वंसक विचारांची श्रृंखला मनात/विचारांत सुरू होऊ शकते, असे रागामध्ये होत नाही. तत्कालीन प्रतिक्रिया ही रागाच्या भरत दिली जाते. मग त्यात स्वतःचे हित आहे का, असा विचार मनाला शिवत नाही. क्रोधामध्ये मात्र ज्वालामुखीसारखे भडकण्याची, विद्ध्वंस करण्याची क्षमता असते. क्रोधामुळे केवळ त्या व्यक्तीलाच नव्हे, तर गर्भिणी असतेवेळी चौथ्या महिन्यात जर त्या गर्भवती महिलेने अति क्रोध केला, तर रक्तस्राव होऊन गर्भपात होऊ शकतो, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे. तसेच गर्भिणी अवस्थेत जर ती गर्भवती क्रोधी असेल, तर गर्भाची वाढ हळू होताना दिसते. ( slow / reterded growth ) गर्भाचा गर्भात मृत्यू होण्याचे एक कारण क्रोध हादेखील असू शकतो, असे ‘चरक संहिते’त सांगितले आहे.
क्रोध हा वणव्यासारखा आहे. त्याच्या मार्गात जे जे येते, त्या सर्वांचा विनाश होतो. ‘सुश्रुत संहिते’मध्ये असे सांगितले आहे की, क्रोधामुळे पूर्वीपासून असलेल्या व्याधींनी तीव्रता वाढते. ( worsening of existing health problem ) त्याचबरोबर नवीन व्याधी उत्पन्न होण्यात हातभारही लागतो. या व्याधी लगेच उत्पन्न होतील, असे नाही. पण, त्या व्याधींची बीजे शरीरात रोवली जातात. क्रोधामुळे आणि त्याला पूरक असे वातावरण (शारीरिक असंतुलन-त्रिदोषांचे वैषम्य) शरीरात उत्पन्न झाले की विविध व्याधी उत्पन्न होतात. क्रोधाला ज्वालामुखीची उपमा दिली आहे. कारण, क्रोध मनुष्याला जाळतो (म्हणजे कृश करतो.) स्वास्थ्य, सुदृढता, व्याधिक्षमता इ. सर्व गोष्टींवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.
क्रोधामुळे still birth ही होऊ शकते, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे. क्रोधामुळे शरीरात पित्ताची आणि त्यामुळे रक्त धातूची दुष्टी होते आणि या दोन्ही दुष्टींमुळे (कुपित झाल्यामुळे) विविध व्याधींचे पित्तज/रक्तज उपप्रकारांचा शरीरात प्रवेश होतो. जसे पित्ताच्या दुष्टीमुळे येणारा ताप, प्रमेह, खोकला इ. उत्पन्न होतात. तसेच पाईल्सचा त्रास सुरू होतो. शरीरात रक्ताची कमतरता, अपचन, अजीर्ण-सर्दी, जुलाब, विविध वातव्याधी, विसर्प (नागीण-harpes), क्षया/राजयश्मा आणि विविध शुद्र रोग उत्पन्न होतात. त्याचबरोबर रुग्णाने त्या रोगासाठी सांगितलेले पथ्य पाळले, पण क्रोध करत राहिला, तर त्या व्याधीला बरे होण्यास अधिक काळ लागू शकतो. तसेच, अजीर्णदेखील उत्पन्न होऊ शकते.
काही वेळेस विकृत पित्तामुळे क्रोधाची उत्पत्ती होते. अशा वेळेस शारीरिक दोषांच्या विपरिततेमुळेदेखील मानसभाव असंतुलित होतात. पित्ताच्या विकृतीमुळे क्रोधाची उत्पत्ती होताना दिसते. क्रोध अशा वेळेस सौम्य ते तीव्र अशा कुठल्याही स्वरूपाचा असू शकतो. सतत चिडचिड, रागविणे, धुसपूस करणे इ. सौम्य स्वरूपातील मानसिक भावनांमधील बदल होतो, तर आदळआपट, मारहाण, शिव्याशाप, तोडमोड इ. सगळ्या गोष्टी तीव्र स्वरूपाच्या असंतुलनाकडे दर्शवितात. क्रोधावस्थेत रुग्णास विशिष्ट पंचकर्म निषिद्घ सांगितली आहेत. जसे पंचकर्मापूर्वी पूर्वकर्मामध्ये (पूर्वतयारीसाठी) स्नेहपान करावे लागते. स्नेहपान म्हणजे स्निग्ध पदार्थांचे विशिष्ट मात्रेत सेवन. यात औषधांनी सिद्ध केलेल्या विविध घृतांचा प्रामुख्याने वापर केला जातो. क्रोधावस्थेतील व्यक्तींमध्ये स्नेहपान निषिद्घ आहे. स्नेहपान न करता वमन-विरेचन ही कर्मे करता येत नाहीत. तसेच स्नेहपान सुरू केल्यावर क्रोधावस्था वारंवार येऊ लागल्यास वमन निषिद्ध सांगितले आहे.
काही व्याधींमध्ये क्रोध अपथ्यकर सिद्घ होते. म्हणजे, क्रोधामुळे विविध व्याधींचे बळ वाढते. उदा. विसर्प (harpes) हा पित्ताच्या आधिक्यामुळे होणारा व्याधी आहे. क्रोधामुळेदेखील शरीरात पित्त वाढते. यामुळे विसर्पाची तीव्रता वाढते. तसेच विषबाधेमुळे होणार्या विविध लक्षणांमध्ये आणि व्याधींमध्ये क्रोधामुळे त्या त्या लक्षणांची तीव्रता वाढते. क्रोध असतेवेळी काही गोष्टी नक्की कराव्यात आणि काही गोष्टी टाळाव्यात. जसे, अति निद्रित अवस्था (अति झोप) असताना क्रोधी असल्यास अति झोप उडून जाते. तसेच, अतिक्रोधी असताना व्यायाम वर्ज्य सांगितला आहे आणि गर्भिणीने क्रोध टाळावा, असेही आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे. तसेच, उचकी बरी करण्यासाठीदेखील क्रोधाचा फायदा होतो.
क्रोधाचा विचार एक नकारात्मक भावना म्हणून केवळ आयुर्वेदात केला गेला नाही. तो counter productive देखील सिद्ध होतो. पण, वारंवार क्रोध येणे, क्रोधी राहणे दीर्घ कालावधीत अपायकारक-घातक ठरते. असे बघितले जाते की, विशिष्ट व्यक्तिमत्त्व
( personality ) असलेल्या व्यक्तींमध्ये विशिष्ट व्याधींचे आधिक्य असते. म्हणजे त्यांना ठराविक व्याधी होण्याची शक्यता अधिक असते. उदा. तापट, रागीट व्यक्तींमध्ये पित्ताचे विविध ५० व्याधी होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच, insomnia, anxiety यांचे प्रमाणही अधिक असते. उच्च रक्तदाब ( high bp )ची शक्यता रागीट/तापट व्यक्तींमध्ये अधिक असते. रक्तस्राव लवकर आटोक्यात न येणे, हेदेखील अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये अधिक दिसते.
रागावर-क्रोधावर नियंत्रण अतिशय गरजेचे आहे. क्रोध दरवेळेस फक्त संताप-चिडचिड यांमुळे उत्पन्न होत नाही. काही वेळेस भीती लपविण्यासाठी, चूक लपविण्यासाठी किंवा अपयश लपविण्यासाठीदेखील क्रोधाचा आधार घेतला जातो. यासाठीच क्रोधावर नियंत्रण आणण्यासाठी त्याचे उगम, नेमके कारण शोधणे गरजेचे आहे. र्ीपवशीश्रूळपस शोींळेप यावर सर्वप्रथम काम करणे गरजेचे आहे. राग झाल्यावर शरीरात सर्वांत पहिला जो बदल होतो, तो म्हणजे restlessness. मनुष्य एका जागी संथ, शांत बसू शकत नाही. दुसरे म्हणजे, श्वसनगती वाढते. त्याचबरोबर श्वासोच्छ्वास दीर्घ नसून डहरश्रश्रेु इीशरींहळपस सुरू होेते. सदसद्विवेकबुद्धीचे कार्य नीट होत नाही. तो मनुष्य rational thinking करू शकत नाही. एखादी कृती केली, तर त्याचा चांगला का वाईट परिणाम होईल, हादेखील विचार तो करू शकत नाही. एखाद्या पिसाळलेल्या बैलासमोर लाल कापड हलविल्यावर जसा तो चेकाळतो आणि धाव घेतो, रागामध्ये माणसाचेही असेच होते. रागामध्ये आपण काय करतोय, काय बोलतोय, याची शुद्ध राहात नाही. मनुष्याचे व्यक्तिमत्त्व, चरित्र संपूर्णपणे बदलते आणि त्याचा परिणाम स्वतःला आणि इतरांना भोगावा लागतो.
रागाला, क्रोधाला आवरणे, कंट्रोल करणे खूप गरजेचे आहे. राग जो उत्पन्न होतो, तो आधी मनात होतो. तो बुद्धीला आपली उपस्थिती अवगत करतो आणि मग ज्ञानेन्द्रिय व कर्मेन्द्रियांमार्फत त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. वाचिक-शाब्दिक किंवा हिंस्र प्रकारची प्रतिक्रिया सहसा बघायला मिळते. यावर नियंत्रण करण्याचे काही साधे-सोपे उपाय पुढील लेखातून बघूया.
- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत)