नवसाम्राज्यवादाच्या दिशेने...

02 Dec 2025 10:56:11
Trump vs Venezuela
 
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावर पुन्हा एका नव्या लष्करी संघर्षाचे ढग जमा होऊ लागले आहेत. सध्या अमेरिका व व्हेनेझुएला या दोन देशांतील तणावामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच व्हेनेझुएलाविरुद्ध सैनिकी हस्तक्षेपाचा इशारा देत, या देशातील नेतृत्वाला अमलीपदार्थ तस्करी करणारे म्हणून जाहीरपणे लक्ष्य केले आहे; परंतु हा विषय केवळ गुन्हेगारी अथवा सुरक्षेपुरताच मर्यादित नसून, त्यामागे अमेरिकेचा व्यापक धोरणात्मक आणि आर्थिक स्वार्थ दडल्याचे स्पष्ट होते.
 
व्हेनेझुएला हा जगातील सर्वाधिक तेलसाठा असलेला एक देश. गेल्या दशकात अमेरिकेने या देशावर आर्थिक निर्बंध, राजकीय दबाव आणि आंतरराष्ट्रीय बदनामी असे अनेक प्रयोग सातत्याने करून पाहिले; पण तरीही व्हेनेझुएलामध्ये मर्जीतील माणसे सत्तेत बसवण्यात अमेरिकेला यश मिळालेले नाही. उलट, अमेरिकेच्या या नीतीमुळे लॅटिन अमेरिकेतील त्यांच्या प्रभावामध्ये घट झाल्याचे आढळले. त्यामुळे सत्ताबदलाचा जुनाच डाव, आता व्हेनेझुएलामध्ये नव्या पद्धतीने ट्रम्प खेळताना दिसून येत आहेत. यासाठीच अमली पदार्थांच्या विरोधाचे कारण पुढे करत, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या सत्तेला आव्हान दिले जात आहे.
 
अमेरिका लौकिक अर्थाने लोकशाहीची समर्थक, मानवाधिकारांची संरक्षक आणि जागतिक स्थैर्याची काळजी घेणारे राष्ट्र म्हणून स्वत:ची ओळख जगात मिरवताना दिसते; परंतु याच अमेरिकेने मागील काही दशकांत इराक, अफगाणिस्तान, सीरिया, लिबिया आणि यूबा या राष्ट्रांमध्ये केलेल्या हस्तक्षेपामुळे त्यांच्या या प्रतिमेला केव्हाचेच तडे गेले आहेत. अमेरिकेने आजवर दुसर्‍या देशात केलेल्या सत्ताबदलामध्ये एकसारखीच पद्धत दिसते. प्रथम एखाद्या सरकारला गुन्हेगारी राजवट ठरवणे, नंतर त्यावर आर्थिक निर्बंध लादणे, त्यानंतर देशात गोंधळ निर्माण करणार्‍या गटांना पैसा व समर्थन देणे आणि शेवटी सत्तांतराला लोकशाही रक्षणाचे नाव देत, आपले उद्दिष्ट साध्य करणे. व्हेनेझुएलाच्या बाबतीतही अगदी हेच होत आहे. अमेरिकेतील वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीसाठी अमेरिकेने व्हेनेझुएलाकडे अनेकदा बोट दाखवले आहे. अमली पदार्थांच्या तस्करीमधील प्रमुख संस्था म्हणून ‘कार्टेल डे लॉस सोल्स’वर ठपका ठेवून, या संस्थेच्या प्रमुखपदी स्वत: निकोलस मादुरो असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. या संघटनेवर आंतरराष्ट्रीय बंदीची मागणीही अमेरिकेने लावून धरली आहे.
 
व्हेनेझुएलामधील अमलीपदार्थांचा व्यापार सत्य असला, तरी हे सध्याच्या कारवाईचे कारण निश्चितच नाही. व्हेनेझुएलाचा वाढता ‘तेल व्यापार’ अमेरिकेसाठी एक मोठाच धक्का होता. याशिवाय, कॅरिबियन समुद्रावरील नियंत्रण, अमेरिकेच्या संरक्षण धोरणातील महत्त्वाचा घटक आहे. यामुळे दक्षिण अमेरिका, आफ्रिकेच्या ऊर्जामार्गांवर अमेरिकेला सहज प्रभाव मिळू शकतो. त्यामुळे व्हेनेझुएलावर थेट किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण असणे, हे अमेरिकेसाठी फायद्याचेच ठरणार आहे.
 
मादुरो यांनी अमेरिकेची भूमिका फेटाळत, हा आमच्या सार्वभौमत्वाचा संघर्ष असल्याचे मत व्यक्त केले आहे. हा ताण वाढत गेल्यास, या प्रदेशात नव्या शीतयुद्धाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. मात्र, सध्या अमेरिकेची जनता युद्धासाठीच्या मानसिक तयारीमध्ये नाही. एका वृत्तवाहिनेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये जवळपास ७५ टक्क्यापेक्षा अधिक अमेरिकन लोकांनी ट्रम्प यांच्या या धोरणाचा विरोध केला. खुद्द ट्रम्प यांची अमली पदार्थांविषयीची भूमिकाही संशयास्पद आहे. मध्यंतरीच ट्रम्प यांनी लॅटिन अमेरिकेतील देश असलेल्या डोंडुरास देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना ‘मफ’ करण्याचा विचार असल्याचे विधान केले होते. सध्या हे राष्ट्राध्यक्ष ४५ वर्षांसाठी अमली पदार्थांचा व्यापार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत.
 
जर भविष्यात युद्धजन्य वातावरण निर्माण झाल्यास लॅटिन अमेरिकेतील नागरिकांच्या वाट्याला फक्त अस्थिरता येईल. आजचा प्रश्न हा नाही की, व्हेनेझुएला दोषी आहे की निर्दोष? खरा प्रश्न हा आहे की, जगातील कोणत्याही सार्वभौम राष्ट्राला, महासत्तेने अशा दमननीतीने झुकण्यास भाग पाडावे का? आणि जर जागतिक घडामोडींमध्ये हेच चित्र पुन्हापुन्हा घडताना दिसत असेल, तर आपण त्याला लोकशाहीचा प्रसार म्हणायचे की, नव्याने उभा राहणारा साम्राज्यवाद?
 
- कौेस्तुभ वीरकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0