सयाजीराव, तुमचे चुकलेच!

02 Dec 2025 10:50:53
 
Sayaji Shinde
 
सध्या नाशिकमध्ये साधुग्राममधील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. नाशिकबरोबरच राज्य आणि देश पातळीवरील साधू-महंतांनीही शक्य असल्यास ही वृक्षतोड करू नये, असेच सांगितले. त्यानंतर नाशिक महापालिका प्रशासनाने फेरविचार करत, पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. आता अगदीच गरज असेल तरच वृक्षतोड केली जाईल; या निर्णयापर्यंत प्रशासन पोहोचले आहे. पण, या़दरम्यानच्या काळात काही पर्यावरणवाद्यांनी तपोवनात ‘चिपको’ आंदोलन केले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने सुनावणी घेत, नाशिककरांचे म्हणणे जाणून घेतले. या सगळ्या घडामोडी काल-परवापर्यंत अगदीच सुरळीत सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकतीच तपोवनाला भेटही दिली. या भेटीदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, समाजाकडून आक्षेप घेतले जातील अशी काही विधाने केली.
 
विशेषकरून दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा, साधू-संत, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन आणि प्रशासनावर अविवेकी टिप्पणी केली. त्यांच्या विधानांनी साधू-महंत चांगलेच दुखावले गेले आहेत. आपण वृक्षतोडीच्या विरोधातच असून, संतांनीच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे‘ म्हटल्याची आठवण सयाजी शिंदे यांना सर्व महतांनी यावेळी करून दिली. सयाजी शिंदे यांच्या अशा बेताल वक्तव्यांमुळे नाशिकचे पर्यावरण आणि वृक्षतोडीचा विषय बाजूला राहिला असून, सिंहस्थावर केलेल्या विधानांवरच नाशिकमध्ये चर्चा झडायला लागल्या आहेत. सयाजी शिंदे महाराष्ट्रातील जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांच्या शब्दाला एकप्रकारचे वजन आहे. तसेच, पर्यावरणाच्या बाबतीत त्यांनी केलेले आजवरचे कामही वाखाणण्याजोगेच आहे. त्यामुळे त्यांनी कोणतेही विधान करताना कोणत्याही धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही, याची आपल्यापुरती तरी काळजी घेण्याची गरज आहे. सयाजीराव तुमचेही आडनाव शिंदे आहे; पण आपण असे केलेले बेताल वक्तव्य नक्कीच भूषणावह ठरणारे नाही. त्यामुळे भाषणबाजीच्या नादामध्ये संत-महतांविषयी अविवेकी भाष्य करुन सयाजीराव तुमचे चुकलेच, इतकेच म्हणावे लागेल.
 
रोहित पवारांचीही उडी
 
थोर पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांच्या विधानांनी नाशिकमध्ये उडालेली राळ खाली बसते न बसते, तोच शरद पवार यांच्या राजकारणात आलेल्या तिसर्‍या पिढीने म्हणजेच, रोहित पवार यांनी पुन्हा एकदा ‘शिमगा’ खेळण्याचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. तपोवनातील झाडे तोडून कुंभमेळा आटोपल्यानंतर, ती जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याची मुक्ताफळे रोहित पवार यांनी उधळली आहेत. त्यांनी थेट त्या जागेचा नकाशा सोशल मीडियावर शेअर करत, वाटेल तसे आरोप केले आहेत. तसेच, नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात सिंहस्थासाठी राखीव असलेल्या तपोवनाच्या जागेवर डोळा ठेवून असलेल्या संधीसाधूंना, कुंभमेळ्याच्या निमित्ताने जागा घशात घालण्याची संधी दिसत आहे. म्हणूनच, जनतेचा प्रचंड विरोध असतानाही तपोवनातील जागेसाठी सरकारचा अट्टाहास सुरू असल्याचे आरोपही रोहित पवार यांनी केले आहेत; पण सध्याची वृक्षाच्छादित जागा, ‘वैष्णव आखाड्या’च्या मालकीची असल्याची बाब समोर आली.
 
या आखाड्याचे म्हणणे नेमके काय आहे, हे जाणून घेण्यात रोहित पवारांसह कोणालाही स्वारस्य नाही. त्यात राज्यातील प्रत्येक प्रश्नावर मत मांडणारे राज आणि उद्धव ठाकरे यांनीही विरोधाचा सूर लावला आहे. यावरून असेच दिसून येत आहे की, प्रत्येक जण आपल्या सोयीने तपोवनातील प्रश्नावर आपली पोळी भाजून घेत, हा प्रश्न अधिक कसा चिघळेल आणि महायुती सरकार कसे बदनाम होईल, या प्रयत्नात आहे. पण, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी विरोेधकांच्या आंदोलनाची हवाच काढून घेतली आहे. खत्री यांनी साधुग्राममधील कोणतेही देशी वृक्ष तोडणार नसल्याचे स्पष्ट करत, फक्त विदेशी वृक्ष तोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर संपूर्ण शहरात एक लाख झाडे तोडणार असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे आता २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे सुरळीत कसा पार पडेल, यासाठी प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. सिंहस्थात देश-विदेशातील करोडो भाविक नाशिक नगरीत येतील. त्यांच्यासमोर नाशिककरांची एकी आणि एकदिलाने काम करण्याची प्रवृत्ती समोर यावी, इतकीच यानिमित्ताने अपेक्षा.
 
- विराम गांगुर्डे
 
 
 
Powered By Sangraha 9.0