Begum Khaleda Zia : कोण आहेत बेगम खालिदा झिया? ज्यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता?

02 Dec 2025 19:17:00
Begum Khaleda Zia
 
 
मुंबई : (Begum Khaleda Zia) बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि राजकीय नेत्या बेगम खालिदा झिया यांची प्रकृती खालावल्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अनेक दशकांपासून बांगलादेशच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या खालिदा झिया यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करत भारताकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
पंतप्रधानांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सोमवारी १ डिसेंबरला एक पोस्ट करत झिया यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली. त्यांनी लिहिले की, “बेगम खालिदा झिया यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेतल्याने मला खूप काळजी वाटते. त्यांनी अनेक वर्षांपासून बांगलादेशच्या सार्वजनिक जीवनात योगदान दिले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.”
८० वर्षीय खालिदा झिया यांना २३ नोव्हेंबर रोजी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना छातीत संसर्ग झाला होता, त्यामुळे त्यांच्या हृदय आणि फुप्फुसांवर परिणाम झाला होता. त्यांची प्रकृती बिघडल्याने, चार दिवसांनी त्यांना कोरोनरी केअर युनिटमध्ये हलवण्यात आले होते. खालिदा झिया यांची प्रकृती खूपच गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, असे त्यांच्या पक्षाच्या म्हणजेच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) नेत्यांनी म्हटले आहे.
खालिदा झिया कोण आहेत?
बेगम खालिदा झिया या बांगलादेशचे माजी राष्ट्रपती झियाऊर रहमान यांच्या पत्नी आहेत. १९९१मध्ये बांगलादेशात २० वर्षांनंतर प्रथमच लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या खालिदा झिया यांच्या पक्षानं विजय मिळवला होता. या विजयामुळेच खालिदा झिया या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. २००१ मध्ये त्या पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या आणि २००६ मधल्या निवडणुकीनंतर त्यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे २०१४ सालची निवडणूक त्यांना लढवता आली नव्हती. त्यावेळी बांगलादेशात त्यांच्या समर्थकांनी मोठे आंदोलन केले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0