CM Devendra Fadnavis : दक्षिणगंगा गोदावरीच्या स्वच्छतेसाठी एनएमसी क्लिन गोदावरी बॉण्ड्सद्वारे निधी उभारणी

02 Dec 2025 19:32:32
CM Devendra Fadnavis
 
मुंबई : (CM Devendra Fadnavis) सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी आपली दक्षिणगंगा गोदावरीच्या स्वच्छतेसाठी विक्रमी काळात नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या नेतृत्वात ‘एनएमसी क्लिन गोदावरी बॉण्ड्स’द्वारे उभारणी केल्याबद्दल नाशिक महापालिकेचे मनःपूर्वक अभिनंदन आता सर्वांनी मिळून गोदावरी स्वच्छतेच्या कामाला लागून येत्या काळात हा प्रकल्पही पूर्ण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. मंगळवारी दि. २ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई), मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 
यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मित्राचे सीईओ प्रविणसिंह परदेशी, नॅशनल स्टॉक्स एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिष कुमार चौहान, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव नवीन सोना, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री म्हणाले की, “नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘विकास भी और विरासत भी’, हा मंत्र आपल्याला दिला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरातील पायाभूत सुविधांसह, गोदावरी स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे. या परिसराला रामायणात विशेष महत्त्व आहे, त्यामुळे इथे होणारा पवित्र कुंभमेळाही महत्वाचा आहे. विकास होत असताना कल्पकता ही महत्वाची हे पंतप्रधानांचे ब्रीद समोर ठेवून आपण कार्य करत आहोत.”(CM Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : केंद्र सरकारचा नवा नियम! मेसेजिंग अँप्ससाठी आता सिम कार्ड अनिवार्य 
 
“अशा प्रकारच्या बॉण्डच्या उभारणीसाठी लागणाऱ्या प्रक्रियेचा विचार आपण करतो त्यात नाशिक महापालिकेनेही महत्वाची भूमिका बजावली. जेव्हा बॉण्ड उभारणीसाठी संस्था ज्या प्रक्रियेतून जाते, ज्यात पतमानांकन करावे लागते, अर्थात महापालिकेने हे कमी कालात पूर्ण केले. आपल्याकडे अशा १५ महापालिका आहेत, ज्यांनी आपला ताळेबंद व्यवस्थित केला तर त्यांना बॉण्ड्स मार्केट खुले होईल. ही सवय जर महापालिकांच्या अंगवळणी पडली तर निधी उभारण्याचा प्रश्न सुटू शकतो.”, असेही ते म्हणाले.(CM Devendra Fadnavis)
 
येत्या काळात विजनिर्मिती क्षेत्रात संभाव्य लिस्टींग!
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी कार्यक्रमात दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात तीन टप्प्प्यांत विजनिर्मिती क्षेत्रातील पारेषण, वितरण आणि निर्मिती क्षेत्रातील महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती कंपन्यांचे लिस्टींग करण्यात येणार आहे. सुलभता आणि गतीमानता आणण्यासाठी या प्रक्रियेतून जावे लागेल, असे सूचक विधान त्यांनी केले.(CM Devendra Fadnavis)
 
गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी आम्ही पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे सूत्र समोर ठेवले. हा बॉण्ड आपल्यासाठी फक्त आर्थिक निधी उभारणे इतकाच विषय नसून गोदावरीला नवचैतन्य देण्याचा संकल्प आहे
- मनीषा खत्री, आयुक्त तथा प्रशासक, नाशिक महापालिका
 
भारताच्या सांस्कृतिक वारशात नाशिकचा मोलाचा वाटा आहे, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलू जपणाऱ्या नाशिकसारख्या पवित्र शहराने आता ‘बॉण्ड्स मार्केट’द्वारे निधी उभारण्याचे कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. आगामी पवित्र कुंभमेळ्यासाठी ‘एनएसई’द्वारे आमचे योगदान देऊ शकलो याचा आम्हाला अभिमान आहे.
- आशिषकुमार चौहान, ‘एमडी’ आणि ‘सीईओ’, ‘एनएसई’
 
 
Powered By Sangraha 9.0