सामाजिक, आर्थिक स्थिती बेताचीच, मात्र त्यामध्येही स्वतःसोबत समाजातील असंख्य महिलांचे अस्तित्व निर्माण करणार्या पनवेलच्या कमला एकनाथ देशेकर यांच्याविषयी...
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी ‘हाजीमलंग’च्या नावाने उरूस सुरू होता. १४ वर्षांची मुलगी कमला विहिरीतून पाणी भरे आणि ५० पैशांना एक हंडा पाणी विके. हे कष्टाचे आणि जिकिरीचे काम. कमला पाणी भरायला विहिरीवर गेली आणि तिथे घोळक्यात उभ्या असलेल्या मुस्लिमांचे लक्ष तिच्याकडे गेले. ते लोक आरडाओरडा करू लागले. "ए लडकी, इथल्या विहिरीचं पाणी घ्यायचं नाय. ही विहीर आमची आहे. हात नको लावूस!” कमला तिथून निघून गेली. विरोध करणे किंवा ‘हे असे का,’ असा प्रश्न विचारावासा वाटला; पण वय लहान. त्यातही आर्थिक सामाजिक गरिबी. त्यामुळे तो प्रश्न तिथेच विरून गेला.
आज त्याच कमला एकनाथ देशेकर यांची स्वतःची जे. एस. स्कूल नावाची नामांकित शिक्षणसंस्था आहे. त्यांचा निस्वार्थी सामाजिक कार्यकर्ता म्हणून लौकिक आहे. ‘जागृती स्वयंरोजगार सेवाभावी संस्था’, ‘प्रणव महिला मंडळ’ या दोन संस्थांच्या त्या अध्यक्षा. त्यांच्या प्रयत्नांनी २५० महिलांनी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी ४० बचतगट निर्माण केले. तसेच दोन ग्रामसंघही तयार केले. मसाले बनवणे, पापड बनवणे, शिलाईकामाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमला यांनी गावातील महिलांना सर्वतोपरि मदतही केली. दोन महिलांना तर विटभट्टीचा व्यवसाय करण्यासाठीची उमेद आणि आर्थिक सहकार्यही मिळवून दिले.
आताच्या कमला देशेकर म्हणजे माहेरच्या कमला अनंत भगत. भगत कुटुंंब आगरी समाजाचे आणि मूळचे पनवेलच्या मोहदर गावचे. अनंत आणि राघुबाई यांना तीन अपत्ये. त्यांपैकीच एक कमला. अनंत खूप कष्ट करत. भाजीपाला पिकवत, तो विकत, रानातून लाकडं तोडून आणत, ते विकत. त्यावरच घरची भाकरी भाजली जात असे. त्यांच्या या कामात पत्नी राघुबाई आणि त्यांची तीन मुलं आपआपल्या परीने मदत करत. त्यांची कन्या कमला.
किशोरवयीन कमला नेहमी भाजी विकायला, लाकूडफाटा विकायला डोक्यावर मोळी घेऊन कल्याणच्या श्रीमलंगगड परिसरात यायच्या. पनवेलच्या मोहदर गावातून दोन-तीन तास चालतचालत डोंगर पार करून पलीकडे कल्याणमध्ये भाजी, लाकूडफाटा विकायच्या. कष्टाशिवाय नशिबात तसं काही नव्हतंच. गरिबी, अशिक्षितपणा आणि सामाजिक मर्यादा या सगळ्यांमध्ये बालपण आणि किशोरवय बांधून गेले होते. त्यामुळे कमला यांना जेमतेम सातवीपर्यंतच शिक्षण घेता आले.
पुढे त्यांचा विवाह एकनाथ देशेकर यांच्याशी झाला. एकनाथ यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कमला यांना साथ दिली. दोघांनी अत्यंत गरिबीतून कष्टाने संसार उभा केला आणि स्वतःचे अस्तित्वही निर्माण केले. भाजीपाला पिकवून विकणे असू दे की कंपनीतून भंगार आणून त्याचे वर्गीकरण करून विकणे असू दे, या व्यवसायातही दोघांनी मेहनत केली. याच काळात कमला यांचा संपर्क पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय परिवाराशी झाला.
आपल्यातले चांगले समाजापर्यंत पोहोचवायचे हाच धर्म, ही शिकवण त्यांच्या मनात घट्ट झाली. पुढे त्या एका स्वयंरोजगार शिबिराला गेल्या. तिथे बचतगटाची संकल्पना समजली. त्यांनी बचतगट बांधला. बचतगटातून व्यवसाय उभा केला. आपल्याप्रमाणे गावातल्या महिलांचाही उत्कर्ष व्हायला हवा, म्हणून त्यांनी परिसरात ४० बचतगट उभारले. समाजभगिनींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, व्यवसायासाठी त्यांना शासनाची मदत उपलब्ध करून देणे, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि राबवणे, यासाठी त्या काम करू लागल्या.
कामामुळेच कमला पुढे गावच्या सरपंच झाल्या. त्यांच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीला अडीच वर्षे झाली; पण काही कारणामुळे गावात पुन्हा नव्याने सरपंचपदाची निवडणूक व्हावी, असा ठराव ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांनी केला. कमला यांच्या समर्थनार्थ एकच सदस्या होत्या. कमला केवळ ग्रामस्थांना इतकेच म्हणाल्या, "मला जे अधिकार आहेत, त्यांतून मला गावाचं चांगलंच करायचं आहे. आजपर्यंत मी जे काम केलं, ते तुम्हाला विचारून तुमच्या भल्यासाठीच.” सरपंच कमला यांच्याविरोधात आठ सदस्य असल्याने सरपंच हरणार, असेच वातावरण होते. मात्र, निवडणुकीमध्ये कमलाच पुन्हा सरपंचपदी विराजमान झाल्या. तो गाववाल्यांचा त्यांच्यावर विश्वास होता.
त्यांचा कार्यकाळ मागेच संपला आहे; पण कमला यांचे सेवाभावी जागृती कार्य संपलेले नाही.
त्या म्हणतात, "बालविवाह आणि मुलींना उच्चशिक्षण न देणे, या कुप्रथा हद्दपार झाल्या पाहिजेत. मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढावा आणि त्यांनी त्यांच्या पायावर उभे राहावे, यासाठी मी कार्य करणार आहे. त्यासाठी प्रत्येक वेळी मला माझे पती एकनाथ आणि आमच्या समाजाची साथ आहे. आमचा समाज धार्मिक आणि तितकाच भोळा. समाजात मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढावा आणि तसेच समाजातून उद्योजक निर्माण व्हावे, यासाठी कार्य करणार आहे.” त्यामुळेच वाटते की, पनवलेची भूमिकन्या कमला देशेकर म्हणजे समाजाच्या दीपस्तंभच आहेत!