मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे सामूहिक विवाह सोहळ्यात शुभमंगल!

    02-Dec-2025   
Total Views |
 
CM Mohan Yadav’s Son Abhimanyu
 
विवाह हा भारतीयांसाठी एक उत्सवच असतो. प्रत्येक जण विवाह सोहळ्यामध्ये आपापल्या ऐपतीप्रमाणे वारेमाप खर्च करताना दिसतो. उद्योगपती, राजकारण्यांच्या घरचा विवाहसोहळा म्हणजे खर्चाला सीमा नाही, हे गृहितकच! या विवाह सोहळ्यांची चर्चा तर अनेकदा माध्यमांतूनही होते. या गृहितकाला छेद देणारा विवाह सोहळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी त्यांच्या मुलाचा केला आहे. सामूहिक विवाह सोहळ्यामध्येच आपल्या मुलाचा विवाह करुन, समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित करण्याचे काम मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केले आहे.
 
मोठ्या पदांवर असलेले राजकीय नेते, उद्योजक आदिंचे विवाह सोहळे प्रचंड थाटामाटात होत असलेले आपल्या ऐकण्यात-पाहण्यात येत असते. अशा सोहळ्यांमध्ये असे लब्धप्रतिष्ठित आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करीत असतात; पण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मात्र समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे, असे म्हणता येईल. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपला मुलगा अभिमन्यू याचा विवाह, सामूहिक विवाह समारंभात पार पाडला. हा सामूहिक विवाह सोहळा उज्जैन येथे संपन्न झाला. या सामूहिक विवाह समारंभात, इतर २१ जोडप्यांचेही विवाह लावण्यात आले. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाचा विवाह सामूहिक समारंभात? ही कल्पनाच अनेकांच्या पचनी पडू शकत नाही; पण मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ते करून दाखविले. गेल्या दि. ३० नोव्हेंबर रोजी या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांचा मुलगा अभिमन्यू याचा विवाह, डॉ. इशिता यादव हिच्यासमवेत या समारंभात झाला. एकाच मांडवात या २१ वधू-वरांचे विवाह झाले. सर्व वधू-वरांना वाजतगाजत लग्नमंडपात आणण्यात आले. या विवाह समारंभास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, योगगुरू बाबा रामदेव, ‘बागेश्वर धाम’चे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री आदि उपस्थित होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवाह समारंभात अतिखर्च करू नये, असे वारंवार आवाहन केले आहे. त्यापासूनच प्रेरणा घेऊन हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता, असे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपल्या मुलाचा विवाह सोहळा अशाप्रकारे आयोजित केल्याबद्दल, त्यांचे समाजाच्या विविध थरांमधून स्वागत केले जात आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा अभिमन्यू याने, "हा सोहळा कायमचा लक्षात राहील असा होता. हा शाही विवाह सोहळा होता आणि माझ्यासमवेत अनेक नवरदेव होते,” असे सांगितले. असा विवाह सोहळा आयोजित करून एक मोठा संदेश समाजामध्ये गेला आहे, असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. तर योगगुरू बाबा रामदेव यांनी, "या उदाहरणापासून राजकीय नेते आणि उद्योजक यांनी प्रेरणा घ्यावी,” असे आवाहन केले .आमच्या देशातील विविध राजकीय नेते आणि उद्योजक या विवाह सोहळ्यापासून काही बोध घेतील, अशी अपेक्षा करावी का?
 
शेकडो माओवाद्यांची शरणागती!
 
केंद्र सरकारने माओवाद्यांविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली असून, अनेक प्रमुख माओवाद्यांनी सशस्त्र लढा सोडून देऊन, शरणागती पत्करण्याचे पाऊल उचलले आहे. येत्या मार्च २०२६ पर्यंत देशातून माओवाद्यांचे उच्चाटन करण्याचा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार, महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण आदि नक्षलवाद्यांच्या प्रभावक्षेत्रात केंद्र सरकार आणि संबंधित राज्यातील पोलीस दलांनी उघडलेल्या संयुक्त मोहिमेमुळे, शरण जाण्याशिवाय माओवाद्यांकडे अन्य पर्याय राहिला नसल्याचेच दिसून येते आहे. गेल्या दि. ३० नोव्हेंबर रोजी, छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यात ३७ माओवादी पोलिसांना शरण आले. यामध्ये १२ महिलांचाही समावेश होता.
 
राज्य पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकार्‍यांपुढे, या माओवाद्यांनी शरणागती पत्करली. शरण आलेले माओवादी अनेक बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होते. सुरक्षा दलासमवेत त्यांच्या सातत्याने चकमकी उडाल्या होत्या. मुख्य प्रवाहात जे माओवादी सहभागी झाले, त्यातील २७ जणांना पकडण्यासाठी ६५ लाखांचे बक्षीसही शासनाने घोषित केले होते. माओवाद्यांचे पुनर्वसन करण्याची जी योजना सरकारने आखली आहे, त्याअंतर्गत जे माओवादी शरण आले; त्यांना लगेचच ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच, त्यांना शासनाच्या विविध योजनांच्या खाली दिले जाणारे लाभही देण्यात येणार आहेत. माओवाद्यांच्या विरुद्ध हाती घेण्यात आलेल्या मोहिमांमध्ये, गेल्या २० महिन्यांत ५०० माओवादी शरण आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. गेल्या आठवड्याच्या प्रारंभीस २७ जहाल माओवादी, छत्तीसगढमधील बस्तर आणि महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात शरण आले.
 
गेल्या दि. २८ नोव्हेंबर रोजी जहाल माओवादी नेता ‘चैतू ऊर्फ श्यामदादा’ बस्तर जिल्ह्यात शरण आला. झीराम खोर्‍यामध्ये २०१३ मध्ये जे नृशंस हत्याकांड झाले होते, त्यामध्ये काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला होता. त्या हत्याकांडाचा सूत्रधार चैतू हा होता. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य असलेला विकास नागपुरे आणि अन्य ११ जहाल माओवादी शरण आले. जे शरण आले, त्यांच्यावर ८९ लाख रुपयांचे बक्षीस सरकारने घोषित केले होते. तर दि. २६ नोव्हेंबर रोजी छत्तीसगढमधील बिजापूर आणि राजनंदगाव जिल्ह्यात ४३ माओवाद्यांनी शरणागती पत्करली, तर याच दिवशी एक माओवादी जोडपेही शरण आले. त्यांना पकडण्यासाठी २० लाखांचे इनाम घोषित करण्यात आले होते. दि. २५ नोव्हेंबर या दिवशी २८ माओवादी शरण आले, त्यामध्ये १९ महिलांचा समावेश होता. दि. २४ नोव्हेंबर रोजी १५ माओवाद्यांचा गट सुकमा जिल्ह्यात शरण आला. माओवाद्यांविरुद्ध पोलिसांनी छत्तीसगढमध्ये २०२३ पासून जी मोहीम हाती घेतली होती, त्याअंतर्गत आतापर्यंत दोन हजार २०० माओवादी पोलिसांना शरण आले आहेत. माओवाद्यांच्या विरुद्ध हाती घेतलेल्या या मोहिमांमुळे, संबधित प्रदेश माओवाद्यांपासून मुक्त होत असल्याचेच दिसून येत आहे.
 
दत्त जयंती : चिकमंगळुरूमध्ये तणाव
 
कर्नाटकातील चिकमंगळुरू येथे असलेले दत्तपीठ प्रसिद्ध असून, या ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दत्त जयंतीचा हा उत्सव अगदी तोंडावर आला असतानाच, त्या भागातील काही समाजकंटकांनी या उत्सवात विघ्न आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. दत्त जयंतीनिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी फलक लावण्यात आले होते; पण समाजकंटकांनी ते फाडल्याचे किंवा विद्रूप केल्याचे दिसून आले. विविध हिंदू संघटनांनी शहरामध्ये हे फलक लावले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तणाव निर्माण झाला. संवेदनशील अशा आय. जी. रोड परिसरातील जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आल्याबद्दल, हिंदू समाजाच्या विविध गटांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
 
चिकमंगळुरू शहरामध्ये दि.२ डिसेंबर ते दि.४ डिसेंबर या काळात, दत्त जयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने शहरामध्ये विविध ठिकाणी फलक लावण्यात आले होते. या फलकांवर दत्तात्रयांचेही छायाचित्र होते. ते विद्रूप करण्याचा प्रयत्न या समाजकंटकांनी केला. हे फलक विद्रूप करण्यात आल्याचे किंवा फाडण्यात आल्याचे लक्षात येताच, शहरात तणाव निर्माण झाला. धार्मिक भावना भडकविण्यासाठी मुद्दामच असे कृत्य करण्यात आल्याचा, हिंदू संघटनांचा आरोप आहे. दत्त जयंती मिरवणुकीस अवघे काही दिवस राहिले असतानाच हे कृत्य करण्यात आल्याकडेही, या संघटनांनी लक्ष वेधले.
 
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्वत:हून या प्रकरणी गुन्हा नोंदविला. चिकमंगळुरू येथील दत्तपीठात, दत्त जयंतीचा उत्सव दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत असतो; पण हा उत्सव अगदी तोंडावर आला असतानाच, त्यामध्ये विघ्न आणण्याचा आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला. सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. हिंदू समाजाच्या उत्सवांमध्ये बाधा आणणार्‍या समाजकंटकांचा बंदोबस्त कधी केला जाणार? हा हिंदू समाजापुढील प्रश्न आहे. वेळीच हा सर्व प्रकार उघडकीस आल्याने, दत्त जयंती उत्सव नेहमीच्याच थाटात संपन्न होईल, यात शंका नाही!
 
 

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.