छत्रपती संभाजीनगर : ( Devendra Fadnavis ) "कायद्याचा चुकीचा अर्थ लावून निवडणुका पुढे ढकलणे अतिशय चुकीचे असून प्रामाणिकपणे मेहनत करणार्या उमेदवारांवर हा अन्याय आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
निवडणूक आयोगाने राज्यातील काही ठिकाणच्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणुका रद्द करणे अत्यंत चुकीचे आहे. अशा प्रकारे प्रत्येक वेळी कुणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलली जाईल. आजपर्यंत असे कधीच झाले नाही. निवडणूक आयोग कुठला कायदा काढत आहे आणि कुणाचा सल्ला घेत आहे, याची मला कल्पना नाही. परंतु, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशीही बोललो, त्यांचेही हेच मत आहे की, अशा प्रकारे एखादी व्यक्ती न्यायालयात गेली, म्हणून निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत.”
भाजप ‘नंबर एक’चा पक्ष असणार
"या निवडणुकीत भाजप ‘नंबर एक’चा पक्ष असेल. आमचे दोन्ही मित्रपक्ष त्याच्या खालोखाल राहतील. एकूणच या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष ७० ते ७५ टक्के जागांवर निवडून येतील,” असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तसाच आमचादेखील तो प्रयत्न आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आपल्या निवडणुकीत कार्यकर्ते इतके श्रम आणि धावपळ करतात. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावे, अशी त्यांचीही अपेक्षा असते आणि आम्ही तो प्रयत्न करत आहोत. पूर्ण प्रचारादरम्यान मी मित्रांवर सोडाच, पण विरोधकांवरही टीका केली नाही. मी कोणत्याही पक्षाच्या किंवा नेत्याच्या विरोधात बोललो नाही. एक सकारात्मक अजेंडा घेऊन आपण जात असून सकारात्मक मत मागत आहोत. त्यामुळे मी कुणाच्याही विरोधात बोलण्याचे कारण नाही,” असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांच्या सांगोल्यातील कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मला याबद्दल कल्पना नाही. परंतु, कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे, यावरून धाड टाकण्याचे ठरत नाही. एखादी तक्रार आल्यास तिथे चौकशी केली जाते. आमच्या कार्यकर्त्यांचीही काही तक्रार आली, तर तिथे चौकशी करतात. अनेकवेळा माझीसुद्धा गाडी तपासली आहे. त्यामुळे यामध्ये सत्ता किंवा विरोधक अशा गोष्टी नसतात.”
कुणीही आमचा शत्रू नाही
"संजय राऊत बरे झाले, ही आनंदाची गोष्ट आहे. ते त्यांचे काम करतात, आम्ही आमचे काम करतो. पण कुणीही आमचा शत्रू नाही. ते आमचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे कुठलाही विरोधक आजारी पडला, तर त्याची तब्येत ठीक व्हावी, हीच आपली अपेक्षा असते. संजय राऊत रोज काय काय बोलतात, याला मी कालही उत्तर दिले नाही, आजही दिले नाही. कारण मी त्यांची वक्तव्ये उत्तर देण्याच्या लायकीची समजत नाही,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘राणे विरुद्ध राणे’ योग्य नाही
"जो चांगला वागेल, त्याच्या पाठीशी मी आहे. कोणी चुकला, तर मी त्याला सांगेन. माझ्या पक्षाची व्यक्ती असली, तरी मी चुकीच्या मागे राहात नाही. जे योग्य असेल, त्याच्यामागे मी असतो. परंतु, सध्या जी परिस्थिती आहे, ते योग्य नाही. ‘राणे विरुद्ध राणे’ असे होणे योग्य नाही. या निवडणुकीनंतर यासंदर्भात आम्ही सर्वांनी आत्मचिंतन केले पाहिजे,” असेही ते म्हणाले.
आयोगाला निवेदन देणार
"उद्या निवडणूक असताना आज ती पुढे ढकलल्याने उमेदवारांचे श्रम, मेहनत सगळे वाया गेले. आम्ही आयोगाला यासंदर्भातील एक निवेदन देऊ. नगरविकास विभागाचा यात संबंध नाही. यामध्ये फक्त आयोगाचा संबंध असून आयोग पूर्णपणे स्वायत्त आहे. निवडणूक आयोगाकडे काल अनेक निवेदने गेली. पण हा त्यांनी घेतलेला निर्णय असून तो मान्य करावा लागेल. हा निर्णय चूक आहे,” असेही ते म्हणाले.