Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा! जामीन मंजूर झाल्याने अटक टळली

19 Dec 2025 18:36:46

Manikrao Kokate

 
मुंबई : (Manikrao Kokate) नाशिकमधील १९९५ च्या सदनिका वाटप घोटाळा प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने कोकाटे (Manikrao Kokate) यांना मोठा दिलासा देत अटक टळल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने त्यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे कोकाटे यांना तात्काळ तुरुंगात जावे लागणार नाही.
 

मात्र, न्यायालयाने कोकाटे (Manikrao Kokate) यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. शिक्षेला स्थगिती न मिळाल्याने त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे. नियमानुसार दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या प्रकरणात आमदारकी रद्द होऊ शकते आणि याबाबत विधिमंडळाकडून लवकरच अधिसूचना जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
सुनावणीदरम्यान कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या वकिलांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत आणि प्रकृतीबाबत युक्तिवाद केला. दरम्यान, नाशिक पोलीस पथक कोकाटे उपचार घेत असलेल्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपस्थित होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कोकाटे यांची तात्पुरती जेलवारी टळली असली, तरी त्यांच्या राजकीय भवितव्यावर मात्र गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 


Powered By Sangraha 9.0