प्रा. राम शिंदे : विधान परिषद सभापतिपदाच्या कार्यकाळाची गौरवास्पद वर्षपूर्ती

19 Dec 2025 11:54:15

Prof. Ram Shinde
 
महाराष्ट्र विधान परिषदेचे माननीय सभापती प्रा. राम शिंदे यांची सभागृहाने सभापतिपदी एकमताने दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी निवड केली. त्यास आज एक वर्ष पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने त्यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांबाबत आणि पीठासीन अधिकारी म्हणून दिलेल्या योगदानासंदर्भात हा एक दृष्टिक्षेप...
 
प्राध्यापक असल्याने शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन, हे सभापती महोदयांचे गुणविशेष सभागृह कामकाजाचे संचालन करताना सर्व सन्माननीय सदस्यांना विशेषत्वाने जाणवतात. मुख्यमंत्री महोदयांनी त्यामुळेच त्यांचा ‘हेडमास्तर’ असा आदराने उल्लेख केला आहे. एकमताने सभापतिपदी निवड झाल्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री महोदय आणि सर्वपक्षीय सन्माननीय सदस्यांनी आपल्या भाषणात त्यांचे अभिनंदन केले आणि काही अपेक्षाही व्यक्त केल्या. त्यावेळी सभापती महोदयांनी ’QBBC’ ही विधान परिषद कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी चतुःसूत्री जाहीर केली.
 
१) Q - म्हणजे ’क्वेश्चन अवर’ अर्थात प्रश्नोत्तराच्या तासाचे महत्त्व लक्षात घेता जास्तीत जास्त प्रश्न पुकारले जातील, एका तासात जास्तीत जास्त प्रश्नांच्या माध्यमातून लोकहिताच्या दृष्टीने न्याय मिळेल, याबाबतच्या कार्यवाहीला प्राधान्य देणे.
 
२) B - म्हणजे ’बिल.’ विधेयक संमत होताना त्यावर विधान परिषदेत परिपूर्ण चर्चा व्हावी. हे सभागृह ज्येष्ठांचे आहे, त्यामुळे विद्वतचर्चा, विचारमंथन याद्वारे कायदानिर्मितीची प्रक्रिया पूर्ण व्हावी. कायदेमंडळाचे मुख्य कार्य कायदे करणे हे असल्याने ’
No bill should be passed without discussion!’
 
३) B- Budgetary Process. अर्थसंकल्पीय प्रक्रियेत महत्त्वाचा भाग असलेल्या सभागृहातील चर्चेप्रसंगी सन्माननीय सदस्यांचा सहभाग आणखी वाढावा, यासाठी विशेष प्रयत्न करणे.
 
४) C - C for ’कमिटी.’ संसदीय लोकशाहीचा समिती पद्धती हा आत्मा आहे, असे म्हटले जाते. विधिमंडळाच्या समित्या या ’मिनी लेजिस्लेटिव्ह’ म्हणून काम करीत असतात, ही पद्धती आणखी प्रभावी करण्यावर भर देणे.
 
सभापती महोदयांनी हाती घेतलेल्या या ’QBBC’चे विधायक दृश्य परिणाम अधिवेशानांत दिसून येत आहेत. सभागृह सुरू होण्याअगोदर सर्वपक्षीय गटनेत्यांची नियमित बैठक घेणे हा शिरस्ता ते राबवत असल्याने सभागृह कामकाजात अधिक समन्वय आणि सौहार्दपूर्ण वातावरण दिसत आहे.
 
’पेपरलेस डेमोक्रसी’, ’वन नेशन वन प्लॅटफॉर्म’, कायदा निर्मिती प्रक्रियेत जनतेचा अधिकाधिक सहभाग, लोकनियुक्त प्रतिनिधींची सभागृहे जनतेप्रति अधिकाधिक उत्तरदायी होणे, याबाबतची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची संकल्पना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधिमंडळाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रकियेद्वारे पुढे नेत आहेत. पाटणा येथे झालेल्या ८५व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी ‘भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे : घटनात्मक मूल्यांच्या बळकटीसाठी संसद आणि राज्य विधानमंडळे यांचे योगदान’ या विषयावर झालेल्या विचारमंथनात सहभाग घेतला.
 
जागतिक स्तरावर भारताने एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे. आपल्या राज्यघटनेने त्या दृष्टीने भक्कम आधारशिला तयार करून दिली असल्यानेच हे शक्य झाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीचा प्रारंभ तेव्हाच्या ’बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काऊन्सिल’ सदस्यत्वापासून झाला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे त्यांनी या परिषदेमध्ये बोलताना नमूद केले.
 
विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त सभापती महोदयांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते, मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान परिषद सभागृहात समारंभपूर्वक करण्यात आले.
 
फेब्रुवारीमध्ये सभापती महोदय आणि अध्यक्ष महोदय यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र विधिमंडळातील दोन्ही सभागृहांच्या नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांसाठी प्राईड संस्था, संसद भवन, नवी दिल्ली येथे संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवसीय अभ्यासवर्गातील मार्गदर्शनाचा सन्माननीय सदस्यांना खूप लाभ झाला.
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च, २०२५ मध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, अभिवादन प्रस्ताव घेण्यात यावा, अशी सूचना सभापती प्रा. राम शिंदे यांनी मांडली आणि त्यानुसार दोन्ही सभागृहांनी या प्रस्तावाच्या अनुषंगाने या थोर, कर्तबगार, लोककल्याणकारी महिला राज्यकर्तीच्या प्रेरणादायी स्मृतीस मानवंदना अर्पित केली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासातील हा आणखी एक गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.
 
सभापती महोदयांच्याच पुढाकाराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे जन्मठिकाण चोंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे दि. ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. अशा प्रकारे राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ कॅबिनेटच्या निमित्ताने छोट्या गावात येण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. जागतिक स्तरावर चोंडी हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र म्हणून लवकरच नावारूपाला आलेले आपल्याला बघायला मिळेल. माननीय सभापती महोदयांच्या पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा.
 
- निलेश मदाने
सभापती यांचे जनसंपर्क अधिकारी
जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय आणि संचालक, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र,
विधान भवन, मुंबई
 
Powered By Sangraha 9.0