ढाका : बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात कथित ईशनिंदेच्या आरोपांवरुन कट्टरपंथींच्या जमावाने एका हिंदू तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बांगलादेशातील आंदोलनाचा म्होरक्या शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर देशभर अशांतता पसरली होती. य़ाच दरम्यान हा प्रकार घडला. दीपू चंद्र दास, असे या मृत हिंदू तरुणाचे नाव आहे, ज्याचा मृतदेह कट्टरपंथी तरुणांनी झाडाला टांगला. त्यापूर्वी त्याला जबर मारहाणही केली होती. दिपू हा एका कपड्याच्या कारखान्यात काम करत होता. भालुका जिह्यातील दुबालिया भागात तो भाड्याने राहत होता. पोलीसांच्या माहितीनुसार, स्थानिकांनी त्याच्यावर प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप लावला होता. यामुळेच गुरुवारी रात्री नऊ वाजता त्याच्यावर जमावाने हल्ला केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मयमनसिंह वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. धक्कादायक म्हणजे पोलीसांनी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. हिंदू तरुणाच्या कुटूंबियांचा शोध सुरू असून औपचारिक तक्रार झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीसांनी सांगितले. राजकीय कार्यकर्ता शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर बांगलादेशात हिंसाचार माजला आहे. हादीचा उपचारादरम्यान सिंगापूरमध्ये मृत्यू झाला. १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकांच्या प्रचाराची सुरुवात हादीने केली होती. यावेळी त्याच्यावर गोळी झाडण्यात आली होती.
उपचारादरम्यान सहाव्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे. आंदोलकांनी वृत्तपत्राच्या कार्यालयांची तोडफोड आणि जाळपोळही केली. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रेहमान यांचे ३२ धनमंडी हे ऐतिहासिक असलेले निवासस्थान पेटवून दिले. अनेक नेत्यांची घरेही जाळण्यात आली. चट्टोग्राममध्ये आंदोलकांनी भारताच्या सहाय्यक उच्चायुक्तांच्या निवासस्थानावर दगडफेक केली, मात्र कोणतेही नुकसान झाले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर आणि लाठीचार्ज केला असून १२ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. देशाला उद्देशून भाषण करताना बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस म्हणाले, “हादी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही.” मात्र, दीपूच्या हत्येबद्दल त्यांनी एक अक्षरही काढलेले नाही.