मुंबई : ( Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १९ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे आयोजित 'ॲन्युअल वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम कॉन्फरन्स 2025' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिंदू ही केवळ पूजा पद्धती नसून एक जीवनदृष्टी, विचारपद्धती आणि व्यवस्थात्मक संस्कृती आहे, ज्यामुळे भारतीय संस्कृती हजारो वर्षे अखंड टिकून आहे. भारताचा सांस्कृतिक अभिमान हा दंतकथांवर नव्हे, तर ऐतिहासिक व वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आहे. मात्र, या अभिमानाला आत्माभिमानाचे बळ देत आधुनिक काळात नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी नमूद केले.
चाणक्य यांच्या 'धर्माचे मूळ ‘अर्थात’ असते' उदबोधनाचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी समृद्ध राष्ट्रे च जगाचे संचालन करतात हे नमूद केले आणि त्यामुळे भारताने स्वतःला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. नवोन्मेष हा भारतीय विचारांचा अविभाज्य भाग असून वैदिक व पूर्ववैदिक काळातील खगोलशास्त्र, गणित व विज्ञान हे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी तुलनात्मक असल्याचेही त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी असेही सांगितले की, जग सध्या पाचव्या औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करत असून ही क्रांती नवोन्मेष, डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. आज गिटहबवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात सर्वाधिक योगदान देणारा वर्ग भारतीय आहे. शेती, उत्पादन आणि सेवा क्षेत्रांमध्ये एआय आणि डेटा मोठे परिवर्तन घडवत असून या संधींचा लाभ घेण्याची क्षमता भारताकडे आहे. तंत्रज्ञान हस्तांतरणाला प्राधान्य देत भारत तंत्रज्ञान क्षेत्रातही आत्मनिर्भर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या नेतृत्वावर आणि भारतीय मूल्यांवर आज जगाचा विश्वास आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस पुढे असेही म्हणाले की, भविष्यात जागतिक लोकसंख्येचे केंद्र आफ्रिकेकडे झुकणार असून, आफ्रिकेसोबत सहनिर्मिती करणारे राष्ट्र जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल. भारत आणि आफ्रिकन राष्ट्रांमधील दृढ संबंध, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित झालेले विश्वासाचे नाते यामुळे भारताला या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावता येईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, हिंदू नीतिमत्तेवर आधारित भारताचा विचार जगाला विश्वास देणारा आहे. भारताने कधीही आक्रमण न करता विचारांच्या बळावर जग जिंकले आहे. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमसारखे व्यासपीठ या सर्व घटकांना एकत्र आणून भारताला जागतिक व्यापारात 20% वाट्यापर्यंत पोहोचवण्याची क्षमता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. भारत पुन्हा एकदा 'विश्वगुरू' म्हणून उभा राहेपर्यंत हा प्रवास थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद, जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.