आज भारताच्या ग्रामीण भागातही उद्यमी मानसिकता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. परंतु, नवतंत्रज्ञानाच्या अभावी ग्रामीण भागातील उद्योजकांना आपली उत्पादने योग्य ग्राहकांसमोर आणता येत नाही की त्यांना तशी बाजारपेठ उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेता, चिराग पालेशा हा युवक खेडेगावात भटकंती करत, ग्रामीण भागातील व्यावसायिकांना तंत्रज्ञानाचे धडे देत आहे.
‘आयटी’ कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, यासाठी आजकालची तरुणाई प्रयत्नशील असते. परंतु, ग्रामीण भागातील तरुणांना तंत्रज्ञानाचे धडे देणारा चिराग हा एक अवलियाच. चिरागचे शिक्षण पुण्यात झाले. पदव्युत्तर पदवीसाठी चिराग परदेशात गेला. घरात उद्योजकीय वातावरण असल्याने भारतात परतल्यावर चिरागनेही व्यवसायातच नशीब आजमावण्याचे ठरवले. स्वतःची सॉफ्टवेअर कंपनीही सुरू केली. खरं तर परदेशात असताना चिरागने अनेक गोष्टींचे नियोजन करून ठेवले होते. पण, पुण्यात दाखल झाल्यावर सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करताना नेमकी कुठून सुरुवात करायची, असा प्रश्न तरीही त्याला पडला. विचाराअंती उद्योजकांना त्यांच्या उद्योग-व्यवसायात उपयोगी पडेल, अशी सॉफ्टवेअर निर्मिती करायला त्याने सुरुवात केली. हळूहळू व्यवसायातही जम बसू लागला आणि ग्रामीण भागातील उद्योजकांसोबत चिरागचे व्यावसायिक संबंधही प्रस्थापित झाले. यादरम्यान ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक मानसिकता असल्याचे चिरागच्या लक्षात आले. पण, या उद्योजकांना तांत्रिक कौशल्याची आणि व्यवस्थापनाची जोड दिल्यास व्यवसायवृद्धी शक्य होईल, हे चिरागच्या लक्षात आले. म्हणूनच मग ग्रामीण भागातील व्यावसायिकांसाठी काम करण्याची तयारी चिराग आणि त्याच्या मित्रांनी सुरू केली.
सर्वप्रथम या व्यावसायिकांचे प्रश्न समजून घेण्यापासून या प्रक्रियेचा प्रारंभ झाला. ग्रामीण भागातील उत्पादने ही सर्वांत शुद्ध स्वरूपाची असतात. परंतु, या उत्पादनांना मागणी असणार्या प्रत्येक ठिकाणी पोहोचविता येईलच, असे नाही, हे चिरागच्या लक्षात आले. मग त्यादृष्टीने या समस्येवर समाधान शोधण्याचे काम सुरू झाले. ग्रामीण भागातील युवकांना तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयोग सुरू झाला. प्रारंभी चिराग यांच्या आवाहनाला ग्रामीण भागातील नागरिक फार दादही देत नव्हते. परंतु, हळूहळू तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात आल्यावर, चिरागला ते स्वत:हूनच संपर्क करु लागले. फोन आला की, चिराग आणि टीम त्या गावात डेरेदाखल व्हायची. गावातील व्यवसाय करू इच्छिणार्या युवकांना एकत्र करत, त्यांचा व्यवसाय आणि त्याला तंत्रज्ञानाची नेमकी जोड कशी देता येईल, यासंबंधी मार्गदर्शन करुन प्रकल्प प्रत्यक्षात सुरु करण्यासाठी पूर्ण पाठबळ दिले जाई. यातून ग्रामीण भागातील तरुणांना सुप्त व्यावसायिक गुणांना संधी मिळण्यास सुरुवात झाली.
ग्रामीण भाग म्हणजे व्यावसायिकतेची जणू खाणच. परंतु, योग्य मार्गदर्शनाअभावी बरेचदा तरुणांना या संधीचे आकलन होत नाही. ग्रामीण भागात तंत्रज्ञान अजूनही म्हणावे तसे न पोहोचल्यामुळे या तरुणांचे व्यावसायिक गुण जगासमोर येत नाहीत, असे चिराग मानतात. म्हणूनच पुढाकार घेऊन चिराग गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील विविध गावांमध्ये भटकंती करत आहेत. या भटकंतीमुळे त्यांचे अनेक व्यावसायिकांशी अगदी आपुलकीचे संबंध निर्माण झाले. या व्यावसायिकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा चिरागचा प्रयत्न आहे. एका व्यावसायिकाने दुसर्या व्यावसायिकाला मदत करण्यासाठी एखादे अॅप विकसित करावे, यासाठी चिराग प्रयत्नशील आहेत. खेळ, वाचन, बिलिंग असे व्यावसायिकांना उपयुक्त विविध सॉफ्टवेअर्स चिरागने तयार केले आहेत. अनेक नामांकित कंपन्यांनी त्याच्या या कार्याला गौरवान्वितही केले आहे. अनेक संस्थांमध्ये आज चिरागला तरुण उद्योजकांच्या मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले जाते.
केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर ग्रामीण भागातील युवकांना सॉफ्टवेअर तयार करण्याचे प्रशिक्षण, शालेय विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनही चिराग करतो. विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन करताना त्यांच्या क्षमता आणि आवडीचे क्षेत्र याची सुयोग्य सांगड कशी घालायची, याचा कानमंत्र चिराग देतो. शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवनच चांगले असे मानून, अधिकाधिक वेळ ग्रामीण युवकांच्या मार्गदर्शनासाठी देण्यासाठी सदैव चिराग प्रयत्नशील असतो. म्हणूनच आता त्याने ग्रामीण भागासाठी सुसज्ज अशी आधुनिक लॅब तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील व्यावसायिक जगाच्या पाठीवर अगदी कोणत्याही देशात व्यवसाय करू शकतील. ग्रामीण जीवनाशी एकरूप होऊन व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करणार्या चिरागला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
- शशांक तांबे