हंगेरीमध्ये विदेशी खेळ?

19 Dec 2025 10:52:25
Hungary
 
बालकांवरील अत्याचार थांबवा’ म्हणत, हजारो लोक हंगेरीच्या राजधानीमध्ये बुडापेस्टमध्ये रस्त्यावर उतरले. त्यात विरोधी पक्ष ‘टित्झा’चे नेते पीटर मॅग्यार यांनी एक अहवाल जाहीर केला. त्यानंतर तर लोकांनी ‘व्हिक्टर अरबान राजीनामा द्या म्हणत,’ एकच गदारोळ केला. येत्या एप्रिलमध्ये तिथे निवडणूक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा जनआक्रोश, त्याचे परिणाम आणि त्याचा संबंध पाहणे गरजेचे आहे.
 
नुकताच हंगेरीमध्ये समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित झाला. त्यामध्ये सरकारी बालसुधारगृह दिसते. तिथे बालगृहाचा अधिकारी एका बालकाच्या डोक्यावर चार-पाच वेळा लाथा मारत आहे. तो मुलगा हतबल, दयनीय, लाचार अवस्थेत आहे. अधिकारी अत्यंत मग्रूर आणि क्रूरपणे त्याच्याशी वर्तन करत आहे. या व्हिडिओमुळे हंगेरीमधले वातावरण तापले.
 
कारण, मागे २०२३ साली हंगेरीच्या राष्ट्राध्यक्षा कॅटालिन नोव्हाक यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्याचे कारणही बालसुधारगृहाशी संबंधित होते. बालसुधारगृहातील मुलांवर अत्याचार झाल्यानंतर ती घटना बालसुधारगृहाच्या अधीक्षक महिलेने दडपली. मात्र, घटना उघड झाली आणि अधीक्षक महिलेला कायदेशीर शिक्षा झाली. या गुन्हेगार महिलेने माफीचा अर्ज राष्ट्राध्यक्षा कॅटालिनकडे सादर केला. तेव्हा कॅटालिन यांनी दयाभाव कारण दाखवत, या गुन्हेगार महिलेची शिक्षा माफ केली होती. बालकांचे शोषण होणार्‍या घटनेला लपवून ठेवण्याचे कटकारस्थान करणार्‍या महिलेची शिक्षा का माफ केली, म्हणून त्यावेळीही हंगेरीची जनता रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर राष्ट्राध्यक्षा कॅटालिन यांना राजीनामा द्यावा लागला होता. आताही बालसुधारगृहात एका किशोरवयीन मुलाला मारहाण करण्यात आल्याचे व्हिडिओमधून उघड झाले. बालसुधारगृहात मुलांना सुधारण्यासाठी पाठवले जाते की, अत्याचारित होऊन गुन्हेगारी मानसिकतेसाठी निर्ढावलेले होण्यासाठी पाठवतो? असा प्रश्न जनता विचारत आहे. त्यामुळेच इथली जनता रस्त्यावर उतरली.
 
अर्थात, दहा हजार लोक एकत्रितपणे रस्त्यावर स्वयंप्रेरणेने उतरली असतील का? तर अर्थातच तसे नाही. या आंदोलनाला राजकीय वळण लागले. विरोधी पक्षनेता पीटर मॅग्यार हे आंदोलनात सामील झाले. त्यांनी सरकारचा एक अहवाल लोकांसमोर सादर केला. हा अहवाल सरकारने प्रकाशित केला नव्हता. या अहवालात म्हटले गेले होते की, जवळजवळ तीन हजार मुलांवर सरकारी बालसुधारगृहामध्ये अत्याचार झालेले आहेत. हा अहवाल स्फोटक असल्याने सरकारने तो प्रकाशित केला नाही. मात्र, विरोधी पक्षनेत्याने तो अहवाल मिळवला. भडकलेल्या लोकांसमोर सादर केला. एका मुलावर अत्याचार झाला म्हणून रस्त्यावर उतरलेले नागरिक तीन हजार मुलांवर अत्याचार झाला; पण तो दडवला गेला, दडपला गेला हे कळून हिंसक तर होणारच. त्यामुळेच या लोकांनी आक्रमकपणे पवित्रा घेतला की, विद्यमान पंतप्रधान व्हिक्टर अरबान यांनी राजीनामा द्यावा.
 
वरवर हे सगळे असे दिसते. पण, जागतिक घडामोडींचा मागोवा घेतला तर जाणवते की, अरबान यांचा राजीनामा मागण्यामागे इतर कोणी जागतिक शक्ती तर कार्यरत नाहीत ना? जगभरातील अनेक देशांमध्ये सत्तांतरण झाले. बांगलादेशमध्ये तर सत्तांतरणासाठी भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. हंगेरीमध्येही असेच तर नाही ना? कारण, हंगेरी हा युरोपियन महासंघामध्ये समाविष्ट असलेला देश आहे. युरोपियन महासंघातील इतर २६ देश हे अमेरिकेचे म्हणणे टाळत नाहीत. पण, काही महिन्यांपूर्वीच हंगेरीने रशियाचे समर्थन केले. इतकेच नाही, तर रशियाकडून ऊर्जा खरेदी करण्याची प्रक्रिया कायम ठेवली. युरोपीय देशांमध्ये असलेली रशियाची संपत्ती गोठवण्यावरही हंगेरीने आक्षेप घेतला. हंगेरीने युरोप महासंघाला न्यायालयात खेचण्याचे सूतोवाच केले. एकंदर, हंगेरीने अमेरिकेचे म्हणणे धुडकावून लावले. रशियासोबत, तसेच चीनसोबत हंगेरीने अनेक आर्थिक प्रोजेक्ट सुरू केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हे सारे अपमानास्पद होते. हे सगळे घडून गेल्यानंतर मग हंगेरीमध्ये पंतप्रधान अरबान यांच्याविरोधात जनआंदोलन सुरू झाले. त्यामुळेच हंगेरीचे आंदोलन जनआक्रोश की, सत्तांतरणाचा विदेशी खेळ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0