चंदेरी पडद्यावरील काळे वास्तव!

18 Dec 2025 10:36:18
 Dhurandhar
 
गंगा-जमनी तहजीब, भाईचारा यांचा सतत उद्घोष करणार्‍या बॉलीवूडमध्येच भारतीय, विशेषत: सनातन संस्कृतीला हीन लेखणारे आणि हिंदू धर्माची खिल्ली उडविणारे सर्वाधिक चित्रपट बनविण्यात आले. आता मात्र आजवर हेतुत: दुर्लक्षित आणि राजकीय गैरसोयीमुळे बाजूला टाकलेल्या काही वास्तव घटनांवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे राजकीय आणि चित्रपट क्षेत्रात अस्वस्थता माजली आहे. याच मालिकेतील ‘धुरंधर’ चित्रपटाने तर भारतातच नव्हे, तर पाकिस्तानातही वादळ निर्माण केले आहे. त्याविषयी...
 
भारतात चित्रपट आणि राजकारण यांचा घनिष्ट संबंध, विशेषत: दक्षिण भारतात. तेथील अनेक लोकप्रिय चित्रपट कलाकार हे राजकारणात उतरले आणि नेते बनले. त्यापैकी काही तर अनेक वर्षे मुख्यमंत्रीही बनले. संयुक्त आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. टी. रामाराव असोत की, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन व जयललिता असोत, ते मूळचे अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. अमेरिकेतही रोनाल्ड रेगन यांच्यासारखे सामान्य अभिनेते दोनदा अध्यक्षपदी निवडून आले होते. चित्रपटांमध्ये कपोलकल्पित कथा असल्याने चित्रपटांमधून वास्तवाचे दर्शन घडत नाही, असा समज होता. मात्र, गेल्या काही वर्षांत प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनी आजवर बंदी (टाबू) असलेल्या विषयांना हात घालून अनेक घटनांमागील सत्य शोधण्याचा प्रयत्न चालविल्याने राजकीय क्षेत्रात हडकंप माजला आहे. भारतात घडलेल्या अनेक दहशतवादी घटनांमध्ये भारताची बाजू जोरकसपणे आणि पुराव्यांसह मांडणारे चित्रपट आजकाल बनू लागले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने तर भारतीय राजकारणातच नव्हे, तर पाकिस्तानमध्येही वादळ निर्माण केले आहे.
 
चित्रपट हे प्रामुख्याने मनोरंजनाचे साधन असले, तरी त्यातून आपल्याला सोयीचा असलेला राजकीय संदेश सूचकपणे देता येतो, त्याची सुरुवात ७०च्या दशकात झाली. त्या व पुढील काही दशकांतील चित्रपटांमध्ये नेहमीच एखादी मुस्लीम व्यक्तिरेखा ही सज्जन व देशप्रेमी दाखविण्यात येत असे. उलट लोभी, बलात्कारी व खुनशी खलनायक हे नेहमीच हिंदू व्यक्ती असत. त्याचप्रमाणे मंदिरातील पुजारी हा वासनांध असे; पण मुल्ला-मौलवी आणि पाद्री हे नेहमीच आदर्श चारित्र्याचे पुतळे असत. हिंदूंचे सण, प्रथा या कशा अंधश्रद्धाळू आणि निरर्थक आहेत आणि नमाज पढल्यावर लगेच फळ मिळते, तेही हळूच दाखविले जात असे.
या सर्व छुप्या संदेशांचे कर्ते-करविते होते, सलीम-जावेद.
 
हे बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी कथा-पटकथा लेखक. त्यांनी शेकडो चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. मात्र, त्यांच्या एकाही चित्रपटात मुस्लीम व्यक्तीला कधीच खलनायक वा देशद्रोही दाखविण्यात आलेले नाही. उलट, ‘दीवार’सारख्या चित्रपटात तर नायक अमिताभ बच्चन हा लहानपणापासून देवावर श्रद्धा नसलेला दाखविला आहे. तो कधीच मंदिरात जात नाही. मात्र, आपला ‘७८६’ क्रमांकाचा बिल्ला अगदी भक्तिभावाने डोळ्याला लावत सदैव आपल्याजवळ ठेवतो. पुढे आमीर खाननेही हिंदू देवतांची खिल्ली उडविणारा ‘पीके’ हा चित्रपट काढला. या सर्वांना बॉलीवूडमध्ये भरपूर मान-सन्मान देण्यात आला. पण, भारतीय असल्याचा अभिमान दाखविणारे चित्रपट काढणारे ज्येष्ठ अभिनेते-निर्माते मनोजकुमार यांची ‘भारतकुमार’ म्हणून चेष्टा केली जात असे. शाहरूख खानच्या एका चित्रपटात त्यांच्या एका लकबीचीही चेष्टा करण्यात आली होती.
 
जोपर्यंत काँग्रेसी इकोसिस्टमला सोयीचे असलेल्या संकल्पनांवर आधारित चित्रपट निर्माण होत होते, तोपर्यंत सर्वकाही आलबेल होते. पण, या इकोसिस्टममधील काळे वास्तव जेव्हा चंदेरी पडद्यावर येऊ लागले, तेव्हा त्याची संभावना प्रचारकी, बनावट वगैरे विशेषणांनी करण्यात आली. ‘द ताश्कंद फाईल्स’ चित्रपटाने लालबहादूर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूचे रहस्य भेदण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने शास्त्रीजींची हत्या कशी दडपून टाकली, त्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर आलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ने मात्र काश्मीरमधील नेत्यांनी फुटीरतावाद कसा जोपासला होता आणि काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाला व नंतरच्या त्यांच्या पलायनाला कसा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता, ते अत्यंत ठळकपणे दाखवून दिले.
 
या चित्रपटाला फारशी जाहिरात न करताही देशभर आणि परदेशातही प्रचंड प्रतिसाद लाभला. ‘द केरळ स्टोरी’नेही देशातील ‘लव्ह जिहाद’चे हृदयद्रावक वास्तव समोर आणले. ‘हक’ या चित्रपटाने शाहबानो खटल्यातील काँग्रेसचा दुटप्पीपणा उघड केला. तेव्हा काँग्रेस आणि तिची इकोसिस्टम हादरली. पंडितांचे हत्याकांड घडलेच नाही, हा खोटा प्रचार आहे वगैरे दावे केले गेले. पण, या चित्रपटात सारेकाही पुराव्यांनिशी सादर केल्याने काँग्रेसच्या काळ्या कृत्यांवर झगझगीत प्रकाश पडला.
 
त्यानंतर देशात प्रदर्शित झालेल्या ‘आर्टिकल ३७०’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’, ‘द केरळ स्टोरी’, ‘द बंगाल फाईल्स’ यांसारख्या चित्रपटांनी भारतातील दहशतवादाला पाकिस्तानने कसा पाठिंबा दिला आणि भारतातील काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स यांसारख्या पक्षांच्या नेत्यांनी त्याचा आपल्या राजकीय सोयीनुसार कसा वापर केला, त्यावर झगझगीत प्रकाश टाकला. आता त्याच मालिकेतील ‘धुरंधर’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने तर पाकिस्तानचा दहशतवादाशी किती जवळचा संबंध आहे, ते तर दाखविलेच; पण २००४-१४ या काळात केंद्रात सत्तेत असलेल्या सरकारमधील काही अधिकारी व मंत्री हेही भारताच्या हिताच्या विरोधात कसे निर्णय घेत होते, त्याचे दर्शन घडविले.
 
एकीकडे पाकिस्तानात गुप्तपणे राहून आणि आपल्या प्राणांची जोखीम पत्करून तेथील माफिया टोळ्या आणि ‘आयएसआय’ या दहशतवादी गुप्तहेर संघटनेने भारतविरोधी आखलेल्या कटांची माहिती देणारे भारतीय गुप्तहेर आणि दुसरीकडे सत्तेचा दुरुपयोग करून आपला वैयक्तिक फायदा करण्यात मग्न असलेले उच्च सरकारी अधिकारी आणि मंत्री यांची कृत्ये पाहताना एकाच वेळी संताप आणि खेद या भावना मनात उद्भवतात. ‘धुरंधर’मध्ये ‘संन्याल’ हा गुप्तचर अधिकारी म्हणतो तेच खरे. तो म्हणतो, "पाकिस्तान हा भारताचा शत्रू क्रमांक २ आहे; पण पहिला क्रमांक भारतीयांचाच आहे.”
 
काँग्रेसविरोधी पक्षांतील नेत्यांना आजवर जे उघडपणे सांगता आले नाही, ते देशाच्या राजकारणाचे काळे वास्तव या चित्रपटांमधून प्रभावीपणे सादर करण्यात आले आहे. चित्रपट या माध्यमाचा प्रभाव व्यापक आणि दूरगामी असतो, हे लक्षात आल्यामुळे काँग्रेस आणि तत्सम कथित सेयुलर पक्षांमध्ये विलक्षण अस्वस्थता पसरली आहे. आजकाल चित्रपट हे केवळ थिएटरमध्येच दिसतात असे नव्हे, तर इंटरनेट, टीव्ही आणि मोबाईलमध्येही दिसत असल्याने त्यातील कथन सतत मतदारांपुढे दिसत राहते. त्यामुळे हे विषय मतदारांच्या स्मृतीत जिवंत राहतात. काँग्रेसला त्याचीच भीती वाटते. ये डर अच्छा हैं!
 
 - राहुल बोरगांवकर
 
 
Powered By Sangraha 9.0