ऐतिहासिक काळात सम्राट पृथ्वीराज चौहानने कैदेत असतानाही मोहम्मद घोरीला ठार मारले होते. कुठे तो महान शूरवीर योद्धा आणि कुठे पराभूत आणि नैराश्यग्रस्त मानसिकता असलेला आजचा ‘पृथ्वीराज!’ म्हणूनच त्यांच्या अशा बेताल वक्तव्यांमुळे त्यांच्या नावातच मुळी बदल करण्याची गरज वाटते. एकूणच पृथ्वीराज चव्हाणांच्या वाग्बाणांनी त्यांचा स्वत:चाच वेध घेतला आहे, हेच खरे!
लैला-मजनू यांचे मनोमीलन इतके गहिरे होते की, मजनूला मार लागला, तर वळ लैलाच्या अंगावर उठत असे, असे म्हणतात. पाकिस्तान आणि भारतातील काँग्रेस पक्ष यांच्यातही असेच लैला-मजनूसारखे काही जगावेगळे नाते आहे की काय असे वाटते. कारण, पाकिस्तानला दणका बसला की, भारतातील काँग्रेसच्या नेत्यांच्या पोटात कळ उठते आणि ते भारत सरकारला शिव्याशाप देत सुटतात. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानवर शोककळा पसरली होती. पाकिस्तानी लष्करी अधिकारी व तेथील सरकारने जितकी टीका भारतावर केली नसेल, त्याच्यापेक्षा कैकपट अधिक टीका काँग्रेसने केली. काँग्रेसला लागलेले हे सुतक अजून संपलेले दिसत नाही. कारण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच ‘ऑपरेशन सिंदूर’वर पुन्हा एकदा आगपाखड केली.
काश्मीरच्या पहलगाममध्ये दि. २२ एप्रिल रोजी झालेल्या २५ हिंदू पर्यटकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी दि. ७-१० मे दरम्यान भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले आणि पाकिस्तानची हवाई संरक्षणसिद्धता नष्ट केली. दि. ६ मेच्या मध्यरात्रीनंतर केलेल्या हवाईहल्ल्यांत अवघ्या २५ मिनिटांत पाकिस्तानमध्ये असलेले ११ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यात असंख्य दहशतवादी मारले गेले.
‘ब्रह्मोस’सारख्या अमोघ क्षेपणास्त्राचा आणि शक्तिशाली तोफखान्याचा वापर करून भारताने पाकिस्तानला नामोहरम केले आणि केवळ तीन दिवसांतच पाकिस्तान शस्त्रसंधीची भीक मागत भारताकडे आला. हा सारा घटनाक्रम आणि त्याचा तपशील आता जगाने स्वीकारला आहे. भारताच्या दिव्य लष्करी ताकदीने जगाचे डोळे दिपले आहेत. इतका देदिप्यमान विजय जगातील कोणत्याच लष्कराने वा सशस्त्र दलाने आजवर संपादन केलेला नाही. मात्र, पाकिस्तानी जनता वा लष्करी नेतृत्वावर या पराभवाचा जितका विपरीत परिणाम झाला नसेल, इतका तो भारतातील काँग्रेस नेत्यांच्या मनावर झाला आहे. या युद्धातील भारताच्या पराक्रमावर दोन चांगले शब्दही बोलण्यास काँग्रेसचे नेते तयार नाहीत. आता सहा-सात महिन्यांनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा याचा उल्लेख करून भारतावर टीका केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक विधाने केली. त्यांच्या मते, " ‘ऑपरेशन सिंदूर’ ज्या दिवशी सुरू झाले, त्या पहिल्याच दिवशी भारताचा संपूर्ण पराभव झाला!” हे त्यांचेच शब्द आहेत. भारताची अनेक लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडल्याने भारताला त्या दिवशी एकही लढाऊ विमान उडविता आले नाही. त्यानंतर पृथ्वीराजबाबा वदले, "हे सारे युद्ध केवळ क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांच्या मदतीने केले गेले. त्यात सैन्यदलाचा काहीच सहभाग नव्हता. या स्थितीत भारत १२ लाखांचे खडे सैन्य का बाळगतो आहे? कारण, यापुढील काळातही लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे यांच्याद्वारेच युद्धे खेळली जातील.
त्यामुळे इतके सैन्य बाळगण्याचे कारण नाही. त्यांचा वापर अन्य कामांसाठी करण्यात यावा.” पृथ्वीराज चव्हाण यांनी ही विधाने १६ डिसेंबर रोजी केली होती. हा दिवस भारतीय लष्करी इतिहासात अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण, १९७१मध्ये याच दिवशी भारताने बांगलादेश युद्धात पाकिस्तानचा पूर्ण पराभव करून बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र केले होते. इतकेच नव्हे, तर पाकिस्तानच्या तब्बल ९४ हजार सैनिकांनी आपल्या शस्त्रास्त्रांसह भारतासमोर बिनशर्त शरणागती पत्करली होती. हा दिवस भारतीय सैन्यासाठी एक गौरवशाली दिवस. त्याच दिवशी भारतीय लष्कराच्या नामुष्कीबद्दल तद्दन खोटारडी विधाने करून पृथ्वीराज यांनी औचित्यभंग केला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी दौर्यावर असताना त्यांनी ही विधाने केली आहेत. त्यामागील त्यांचा उद्देश काय? त्यांचा बोलविता धनी कोण, हे देखील तपासले पाहिजे.
मुळात पृथ्वीराज चव्हाण यांचा लष्करी डावपेच आणि युद्धनीती वगैरे विषयांशी काहीएक संबंध नाही. त्यांना त्या विषयांतले काही कळत नाही. तरीही, त्यांनी जी विधाने केली, ती कशाच्या आधारावर केली त्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला, यांसारखे विधान पाकिस्ताननेही आजवर केलेले नाही. मग, पृथ्वीराज ते कशाच्या आधारावर करीत आहेत?
दुसरे असे की, याच परिषदेत त्यांनी येत्या १९ डिसेंबर रोजी देशाला पहिला मराठी पंतप्रधान मिळेल, असेही विधान केले आहे. तसेच, अमेरिकेतील एक आरोपी एपस्टिन याने केलेल्या लैंगिक घोटाळ्यात जगातील काही बड्या लोकांचा संबंध दिसून आला होता. त्यात भारतातीलही काही बड्या नेत्यांचा समावेश असून, ही नावे १९ डिसेंबर रोजी जाहीर होतील आणि मग भारताला पहिला मराठी पंतप्रधान मिळेल, असा भलताच दावा त्यांनी केला आहे. यावर कोणतीही टिप्पणी करणे, हे आम्ही आवश्यक मानीत नाही.
खरी गोष्ट अशी आहे की, पृथ्वीराज चव्हाण यांचे आता वय झाले आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन काहीसे ढासळले असावे. काँग्रेस पक्षात त्यांना कोणी विचारीत नाही. गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत दणकून झालेल्या पराभवामुळे राज्यातील काँग्रेस पक्ष अजूनही सावरलेला नाही. पृथ्वीराज चव्हाण हे सध्या कोणत्याही पदाविना आहेत. त्यांचे पुनर्वसन करणे काँग्रेसला शक्य नाही, इतकी त्या पक्षाची दयनीय अवस्था. त्यामुळे आलेल्या तीव्र नैराश्याच्या झटयातून पृथ्वीराजबाबा यांनी ही विधाने केली असावीत. कसेही करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न म्हणावा लागेल.
एक उच्चशिक्षित आणि सौम्य व्यक्तिमत्त्वाचा नेता अशी पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा होती. पण, गेल्या काही महिन्यांपासून मानसिक संतुलन ढळल्यासारखी विधाने ते करीत आहेत. राहुल गांधी यांची हुजरेगिरी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्यावरून ते आता खर्या अर्थाने काँग्रेसवासी नेते झाले आहेत, असे म्हणावे लागते. ऐतिहासिकसंदर्भात ‘पृथ्वीराज’ या नावाला शौर्य आणि अभिमानाचे वलय आहे. पृथ्वीराज चौहान या सम्राटाने मोहम्मद घोरी या परया आक्रमकाला तब्बल १७ वेळा पराभूत करून सोडून दिले होते. मात्र, १८व्या लढाईत फितुरीमुळे त्याला घोरीने अटक केली आणि त्याचे डोळे फोडून त्याला कारावासात टाकले. त्याही स्थितीत पृथ्वीराज चौहानने घोरीचा आपल्या बाणाने वध केला. ‘पृथ्वीराज’ हे नाव सोडल्यास त्यांच्यात आणि त्या महान सम्राटात कसलेच साम्य नाही. उलट, यासारखी पराभूत मनोवृत्तीची व चुकीची विधाने करून पृथ्वीराज चव्हाण हे या नावाचा अपमानच करीत आहेत!