सेवाव्रती सुहास

18 Dec 2025 10:46:09
Suhas Godse
 
२४५ हून अधिक वृद्ध, अंथरुणाला खिळलेल्या आणि दिव्यांग व्यक्तींना निवासी आरोग्यसेवा आणि भावनिक आधार देणार्‍या सुहास गोडसे या सेवाव्रतीचा कार्यपरिचय करुन देणारा हा लेख...
 
सुहास यांचा जन्म सातार्‍याच्या वडूजचा. घरची परिस्थिती सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासारखीच. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कराडला त्यांच्या भावाकडे झाले. पण, ते दहावीला असताना पितृछत्र हरपले. वडिलांच्या निधनामुळे सावरण्याची संधी मिळण्याआधीच त्यांच्या अंगावर स्वत:च्या शिक्षणाची जबाबदारी पडली. दहावीनंतर त्यांच्या एका मित्राने त्यांना सातार्‍यात रात्रपाळीने वॉचमन हवे असल्याची माहिती दिली. इथून पुढे आईवर आणि भावावर आपल्या खर्चाचा भार नको, म्हणून त्यांनी सातारा गाठले. तिथे एका महाविद्यालयात विज्ञान विभागात प्रवेश मिळवला आणि त्याचबरोबर सातार्‍याच्या पाटबंधारे विभागात रात्रपाळीने वॉचमनची नोकरी पत्करली. पण, त्यांच्या वडिलांसमान असणार्‍या डोंबिवलीतील चुलत्यांना मेंदूतून रक्तस्राव सुरु झाला.
 
या आजारपणामुळे त्यांना त्यांची कामे स्वत: करणे जमत नव्हते. विज्ञान शाखेतले शिक्षण घेतल्यामुळे सुहास त्यांच्या मदतीला डोंबिवलीत धावून आले. साधारण वर्षभर त्यांनी काकांची मनोभावे सेवा केली. सुहास ज्याप्रकारे काकांची काळजी घेत होते, ते बघून रुग्णालयातल्या सर्व कर्मचार्‍यांनाही त्यांचे कौतुक वाटे. त्यांचे हे काम तिथे सेवेत असणारे डॉ. व्ही. एस. खटकूळदेखील पाहत होते. त्यांनी सुहास यांना त्यांचे काम बघून नर्सिंग करण्याचे सुचवले. तसेच, प्रवेशासाठी लागणारी मदतही केली. त्यांच्यामुळेच सुहास यांनी डोंबिवलीत एका सेवाभावी संस्थेकडून चालवले जाणार्‍या नर्सिंग विभागात प्रवेश घेतला. तीन वर्षांनी त्यातील शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पुण्याला नोकरीसाठी गेले. पुण्यात त्यांनी नामांकित रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा केली.
 
सह्याद्री हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना अतिदक्षता विभागाचे प्रमुख म्हणूनसुद्धा नेमण्यात आले. या रुग्णालयात काम करत असतानाच, ते पुण्यातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्येदेखील वृद्धांच्या देखभालीसाठी जात होते. अशी घरोघरी सेवा देत असताना त्यांना जाणवले की, नोकरीच्या निमित्ताने दिवसरात्र बाहेर असणारी मुले आई-वडिलांना एक ओझे समजतात. याशिवाय, समाजात असे कित्येक गरीब वृद्ध आहेत, ज्यांचा मुलांकडून सांभाळही केला जात नाही आणि गरिबीसुद्धा जगू देत नाही. तिथेच त्यांनी ठरवले की, आता इथून पुढचे आपले आयुष्य अशीच वयोवृद्ध नागरिकांची सेवा करण्यात घालवायचे. याचदरम्यान, त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नीदेखील तितक्याच सेवाभावीपणे त्यांच्या या निर्णयात सहभागी झाली. त्यानंतर त्यांनी पिंपळे निलख इथे तीन खोल्यांचे एक घर यासाठी भाड्याने घेतले. तिथेच त्यांनी ‘मातृसेवा सेवाभावी संस्था’ सुरु केली.
 
सुरुवातीला यामध्ये पुण्यातील एका कुटुंबातील दोन वयस्कर नवरा-बायको आणि दोन अन्य वृद्धांना त्यांनी सांभाळण्यास सुरुवात केली. यावेळी सुहास त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींसह अक्षरश: स्वयंपाक घरात झोपत असत. यामध्ये त्यांची मोठी मुलगी दिव्यांग असूनही वडिलांच्या कामाचा आदर करत, सर्वप्रकारची मदत त्यांना करत होती. हळूहळू त्यांच्याकडे पिंपळे निलख परिसरातील काही नोकरदार असणार्‍या, बायको आणि मुलांबरोबरच आई-वडिलांना पण सांभाळणार्‍या व्यक्तींनी त्यांच्या आई-वडिलांना सुहास यांच्याकडे आणून सोडले. जागेची अडचण निर्माण व्हायला लागल्यामुळे त्यांनी चिंचवडला भाड्याने जागा घेतली. चिंचवड येथे साधारण १५ वयस्क असताना त्यांना पैशाची चणचण भासायला लागली. कारण, काही वृद्धांचे नातेवाईक मदत करायचे. मात्र, काहीजणांना सेवेतून सांभाळावे लागत होते. त्यातच भाड्याने घेतलेल्या जागा असल्यामुळे पैशाची गरज भासत होतीच.
 
यावर सुहास यांनी आकुर्डी येथे सरकारची पडीक इमारत सरकारला याकामी देण्याचा विनंती अर्ज केला. त्यांच्या कामाची माहिती घेत आणि त्यांची तळमळ पाहता, त्यांना ती पडीक इमारत वापरण्यासाठी देण्यात आली. आज त्या इमारतीत सुमारे ४८ वृद्धांना निरपेक्षपणे सांभाळण्यात येत आहे. अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी ‘एनएसएस’च्या माध्यमातून इथे सेवा देण्यासाठी येतात. याच मुलांनी सुहास यांच्या कामाची माहिती सर्वदूर पसरावी, यासाठी त्यांचे संकेतस्थळही तयार केले, ‘इन्टाग्राम’वर अकाऊंट काढले. त्यांच्या कार्याची माहिती पसरल्याने अनेक संस्थांनी त्यांचे कार्य पाहून त्यांना पुरस्काराचे मानकरी बनवले. यामध्ये ‘लायन्स क्लब’कडून त्यांना ‘भरारी’ पुरस्कार देण्यात आला. चिंचवडच्या गणपती मंदिराकडून ‘मोरया गोसावी’ पुरस्कार, गोव्याच्या दलित महासंघाचा पुरस्कार, ‘कोल्हापूर जनकल्याण’तर्फे पुरस्कार, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा या सेवाव्रतीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0