माणसात देव पाहिलेले संत गाडगे महाराज

18 Dec 2025 11:47:33

Sant Gadge Maharaj
 
‘माणसाले देव म्हणा’ असा केवळ हितोपदेश न करता, प्रत्यक्षात माणसांत देव पाहिलेले, आपले अवघे आयुष्य गोरगरिबांच्या सेवार्थ समर्पित केलेले, स्वच्छता अभियानाचे जनक, थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने या ‘आधुनिक संता’च्या विचारकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
 
श्री संत गाडगेबाबांचा जन्म दि. २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील अमरावती जिल्हा शेणगाव येथे महाशिवरात्रीच्या दिवशी झाला व ‘महानिर्वाण‘ दि. २० डिसेंबर १९५६ रोजी वलगाव, जि. अमरावती येथील पेढी नदीच्या पुलावर महाराष्ट्र शासनाने बाबांना दिलेल्या गाडीमध्ये झाले. लहानपणीच बाबांना भजनाची गोडी असल्याने गावातील मुलांना आपले घरून जेवण घेऊन यायला सांगणे व सर्वांनी एका पंगतीत बसून भजन करायचे व एकत्रपणे जेवण करायचे. त्यामध्ये महार, मांग, चांभार, धोबी, कुंभार, पाटील व सर्व समाजाची मुले असायची; म्हणजे जातिभेद, पंगतीभेदाला बाबांनी लहानपणापासूनच विरोध केला. जाती समाजामध्ये दोनच आहेत, एक स्त्री व दोन पुरुष. बाकीच्या जाती या माणसांनी निर्माण केल्या आहेत, असे ते म्हणायचे.
 
बाबा अंधश्रद्धेच्या खूप विरोधात होते. "देव आहे; पण तो कोणाले दिसत नाही. तो कोणाले दिसला नाही व तो दिसणारच नाही. पण, देवाचे भजन केल्याने माणूसच देव होतो.” संत तुकाराम महाराज म्हणतात, "देव देव करतां शिणले माझे मन, पण देव नाही दिसला. पाणी आणि पाषाण जेथे तेथे देव नाही दिसला. दरिद्री नारायणाच्या रूपाने तुमच्या समोर उभा आहे. त्याची सेवा करा. भुकेल्यांना जेवण द्या. तहानलेल्यांना पाणी द्या. उघड्यानागड्यांना वस्त्र द्या. गोरगरिबांची सेवा करा, हीच खरी देवाची पूजा आहे, हाच खरा रोकडा धर्म आहे.”
 
शिक्षणाच्या बाबतीत बाबा कीर्तनात पोटतिडकीने सांगत, "बापहो, आपल्या मुलाले शाळेत घाला. पैसे नाही म्हणाल तर जेवणाचे ताट मोडा. हातावर भाकरी खा. बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या. पण, आपल्या मुलाले शाळेत घाला. विद्या मोठं धन आहे, बापही मोठं धन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांना सुबुद्धी सुचली. बाबासाहेबांना शाळेत घातलं. ते पण खूप शिकले. बापहो, बाबासाहेबांनी लहानसहान कमाई नाही केली. त्यांनी हिंदुस्थानची घटना केली.”
 
बाबांनी नुसते सांगितले नाही, तर करून दाखवले. गरीब, आदिवासी मुलांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून ‘श्री गाडगे महाराज मिशन’ची स्थापना केली व आश्रमशाळा काढल्या. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आज ५० आश्रमशाळांच्या माध्यमातून शिक्षणाचे कार्य सुरू आहे.
 
बाबा अंधश्रद्धेच्या खूप विरोधात होते. आपल्या कीर्तनातून लोकांनाच प्रश्न विचारून त्यांना समजून सांगत होते, "देवापुढे जाता की नाही, हा देव तुम्हाले विचारते काय, कुठून आले, जेवले की नाही? बरं तुमच्या देवाले आंघोळ घालता येते का नाही, देवाले धोतर नेसता येते का? तुमच्या देवापुढे नैवेद्य ठेवला, कुत्रं आलं त्याला हाकलता येते का? देवळातला दिवा विझला, तुमच्या देवाले लावता येते? मग, दिवा कोण लावते माणूस. हे सर्व माणूस करतो, मग माणसाले देव म्हणा.” बाबांनी माणसांत देव पाहिला.
 
गरिबांची सेवा करा. तीर्थक्षेत्री दर्शनाला लोकांची व्यवस्था करण्याच्या यादृष्टीने बाबांना शासनाने नाममात्र दराने दिलेल्या जागेवर धनिक-दाते यांच्या सहकार्याने नाशिक, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी या ठिकाणी मोठ-मोठ्या धर्मशाळा बांधल्या. मुंबईत संपूर्ण भारतातून उपचारासाठी गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून १९५५ साली महाराष्ट्र शासनाने जे. जे. हॉस्पिटलच्या आवरात नाममात्र दराने दिलेल्या जागेवर धर्मशाळा बांधली. बाबांच्या नंतर दादर, परळ, खारघर या ठिकाणी बाबांच्या धर्मशाळेत गेल्या ५०-६० वर्षांपासून अगदी अल्पदराने राहण्याची व भोजनाची सेवा होत आहे. बाबांनी, "माझे कोणी नातेवाईक व शिष्य नाहीत. यांचा काही संबंध नाही. हे सर्व जनतेचे आहे,” असे जाहीरपणे सांगितले.
 
संत गाडगेबाबांसारखे संत झाले नाहीत व होणारही नाहीत. सन १९०५ साली बाबांनी आपले घर व कुटुंबाचा त्याग केला. घर सोडले, ते पुन्हा घरी गेले नाहीत. "हे विश्वची माझे घर. यामधे राहणारे सर्व माझे नातेवाईक,” असे म्हणून ८० वर्षे जनतेची अहोरात्र सेवा केली. बाबांचा एकुलता एक मुलगा गोविंदा याचे दुःखद निधन झाले. बाबांचे कीर्तन पुणे जिल्ह्यातील खारपाटण या गावी सुरू होते. सेवकांनी "बाबा, तार आली आहे, गोविंदा गेला.” बाबा दोन मिनिटे स्तब्ध झाले व पुन्हा कीर्तन सुरू केले. "ऐसे गेले कोटयानु कोटी काय केले. रडु एकासाठी,” असे म्हणून ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ कीर्तन सुरू केले. दि. ९ नोव्हेंबर रोजी बाबांचे अखेरचे कीर्तन झाले. त्यामध्ये बाबांनी, "हे माझे शेवटचे कीर्तन. मी आजारी पढुन होतो; परंतु पोलीस बंधूंनी बोलावले म्हणून मी तब्येत बरी नसतांनाही आलो. गाडगे बुवा, गोधडे बुवा, मडके बुवा कोणी पाहिले नसेल तर पाहून घ्या. आता मला जावं लागेल. माझं मरण माझ्या समोर उभं आहे. बांद्रा पोलिसांचे मी उपकार मानतो. त्यांनी मला तुमचे दर्शन घडविले. मी त्यांचा आभारी आहे,” असे बाबांनी जाहीरपणे सांगितले.
 
अखेरच्या क्षणी बाबा मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये भरती होते. दि. २० डिसेंबरला अमरावती येथे गेले. तेथे राठोड यांच्या घरी त्यांना भेटावयास भक्तमंडळी आली असता, या महात्म्याने पहिल्यांदा स्वतःसाठी वर्गणी गोळा केली. २५० रु. जमा झाले. "या पैशांनी माझा अंत्यविधी करा,” असे म्हणून नागरवाडी येथे अखेरचा श्वास घेण्यासाठी सोबतच्या सेवकमंडळींना घेऊन निघाले; परंतु तब्येत जास्त बिघडल्याने परत अमरावतीला आणावे लागले. परंतु, वलगाव येथील पेढी नदीवरील पुलावर त्यांची प्राणज्योत मालवली व गोरगरिबांचा, जनताजनादर्नाची अखंडपणे सेवा करणारा महात्मा अनंतात विलीन झाला. परंतु, त्यांचे सेवाकार्य, रुग्णसेवेचे कार्य, अंध-पंगू-निराधार लोकांना आधार देण्याचे कार्य, भुकेलेल्यांना भोजन, तहानलेल्यांना पाणी देण्याचे कार्य, वृद्धांचे वृद्धाश्रमाचे कार्य, म्हातार्‍या गायी- बैलांच्या गोरक्षणाचे कार्य व अनेक सेवापयोगी कार्य बाबा जाऊन आज ७० वर्षे होत आहेत, तरी ते अखंडपणे सुरू आहे. त्यांची सेवकमंडळी चालवत आहेत.
 
मी त्यांचा एक छोटा सेवक. माझे वडील जगन्नाथ आत्माराम ठाकूर लहानपणीच बाबांच्या सहवासात आले व नाशिकच्या धर्मशाळेत बाबांनी त्यांना कामाला ठेवले. त्यावेळेस सन १९५६ साली मी दोन वर्षांचा असताना बाबांनी मला जवळ घेतले व त्या महात्म्याचा ‘दिव्य स्पर्श’ मला झाला व माझ्या जीवनाचे सोने झाले. मी सन १९८२ पासून जे. जे. हॉस्पिटलमधील बाबांनी सन १९५५ साली बाहेर गावांहून आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी बांधलेल्या धर्मशाळेत सेवेचे काम करीत आहे व जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत करीत राहणार आहे. संत गाडगेबाबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. जय सद्गुरू श्री गाडगेबाबा...
 
- एकनाथ ठाकुर 
(लेखक श्री गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट, भायखळा, मुंबईचे विश्वस्त आहेत.)
 
 
 
Powered By Sangraha 9.0