बुद्धांनी कृपा करावी!

18 Dec 2025 10:59:46
Prakash Ambedkar
 
देशात, महाराष्ट्रात, अगदी स्वतःच्या जिल्ह्यातही प्रकाश बापू आंबेडकर यांचे कुणी-कुणी जिंकले नाही म्हणून काय झाले? नसेल त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेचे मत आणि मन कळत, म्हणून काय झाले? त्यांना पाकिस्तानचे मत आणि मन तर कळते! पाकिस्तान दोन महिन्यांत काय करणार आहे, याबाबत त्यांना सगळे माहिती. त्यामुळेच तर त्यांनी कालपरवा म्हटले की, पाकिस्तानला अमेरिकेसह चीन, इंग्लंड, रशिया शस्त्रसाठा पुरवत असल्याने येत्या दोन महिन्यांत भारत-पाकिस्तान युद्धाचे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगर येथील सभेत वर्तवले. हे युद्ध देशातील जनतेवर नसून मोदींच्या ध्येय-धोरणांवर असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
 
काय म्हणावे? पाकिस्तान युद्ध करेल आणि ते भारताविरोधात नाही, तर फक्त मोदींच्या ध्येय-धोरणांविरोधात? हे प्रकाश आंबेडकरांच्या कानात कुणी पाकड्याने येऊन सांगितले का? पाकिस्तान युद्ध करणार आहे, हे मुळातच भारतीय संरक्षण खात्याला किंवा संबंधितांना कळले नाही, माहिती नाही आणि यांना कळले? मोदींच्या विरोधात पाकिस्तान युद्ध करणार असे सांगून, प्रकाश यांना काय साध्य करायचे आहे? खरेतर या त्यांच्या विधानाचा विचार गांभीर्याने करू नये असे असले तरीसुद्धा वाटते की, समजा उद्या पाकिस्तानने नेहमीप्रमाणे आगाऊपणा आणि मूर्खपणा करत, आपलेच नाक कापून घेण्यासाठी भारतावर हल्ला केला तर? तर तो हल्ला आपल्या देशावर नाही, आपल्या भारतीयांवर नाही, तर मोदींच्या ध्येय-धोरणांवर आहे; करू द्या पाकिस्तानला हल्ला, असे म्हणायचे का? या देशात भ्रष्ट आणि कट्टर धर्मांध, तसेच दहशतवादी, नक्षलवादी असे अनेक घटक मोदींच्या विरोधात आहेत. काही लोक राजकीय विचारधारेनुसारही विरोधक असतील. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर या लोकांनी पाकिस्तानला मदत करायची का? कारण, प्रकाश आंबेडकरांच्या मते, पाकिस्तान जे युद्ध करणार आहे, ते युद्ध मोदींच्या ध्येय-धोरणांविरोधात आहे. काय म्हणावे? प्रकाश यांच्या पाठीमागे बाबासाहेब आंबेडकरांचे फक्त नाव आहे. बाबासाहेबांच्या विचारकार्याचा अंश जरी असता, तर ते असे बोलले नसते. तथागतांनी यांच्यावर कृपा करावी!
  
विरोधक ‘आदत से मजबूर’
 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत हे कोणत्या तरी तंद्रीत म्हणाले की, दि. १९ डिसेंबर रोजी देशात मोठे काहीतरी घडणार. देशाच्या पंतप्रधानपदी दुसरे कोणीतरी येणार. ते असे म्हणत आहेत, तो त्यांचा नाईलाजच. कारण, मोदींचे पंतप्रधान होणे, हे काही लोकांसाठी आयुष्यभराचे दुःख. त्यामुळे मोदींनी पंतप्रधान होऊ नये किंवा त्या पदावरून त्यांनी हटावे, यासाठी काही ठरावीक लोक रात्रंदिवस कटकारस्थान रचत असतात. ते सगळे मोदीविरोधक इतके सैरभैर झाले की, त्यांना झोप येतच नाही. त्यामुळे उघड्या डोळ्यांनीही ते सतत दिवास्वप्न पाहतात की, मोदी पंतप्रधानपदावर नाहीत. त्यामुळे आपल्याला सत्तेत येऊन देशाला लुटायचा मार्ग मोकळा!
 
बरे, नरेंद्र मोदी म्हणजे देशातल्या बहुसंख्य लोकांनी निवडून दिलेले आणि पंतप्रधानपद बहाल केलेले नेते आहेत. तरीही, या काही ठरावीक लोकांना मोदी नकोतच, असे का वाटत असेल? मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर भारत म्हणून भारताचा जो गौरव झाला, जगभरात जी अस्मिता निर्माण झाली, ती शब्दातीतच. पण, भारताचा गौरव करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हे लोक विरोध करतात. कारण सोप आहे, जे आपण करूच शकत नाही, त्याबाबत दुसर्‍याने काही भव्य-दिव्य केले की, विकृत माणसांना राग येतो. यशस्वी माणसाचा ते मत्सर करू लागतात. स्वतःची रेषा मोठी न करता, मोठी रेषा पुसण्याचा विचार करतात. पण, हे लोक विसरतात की, मोठी रेष पुसताना त्यांची पूर्ण ऊर्जा संपून जाते आणि त्यांचे दुष्ट रूप जगासमोर उघडे होते. मोदींचा रागराग का? मोदींनी हिंदूंच्या श्रद्धेचा, हिंदू संस्कृती आणि धर्माचा आदर केला म्हणून? शांततेच्या नावाखाली धर्मा-कर्माच्या बाबत अक्षरशः नाकर्ते झालेल्या हिंदूंना अयोध्येच्या रामललाच्या कर्तृत्वाची प्रेरणा दिली म्हणून? की, भारतीय नागरिकांना भारतीयत्वाचा अभिमान वाटावा, असे आश्वासक वातावरण देशात निर्माण केले म्हणून? मोदी विरोधकांना मोदींचा राग का? वैयक्तिक क्षुद्र सत्तास्वार्थासाठी हे लोक मोदींचा विरोध करत आहेत, तर त्यांच्यासारखे मूर्ख तेच आहेत. कारण, मोदी आता केवळ देशाचे पंतप्रधानच नाहीत, तर करोडो भारतीयांचे विश्वासस्थान बनले आहेत. त्यामुळे ‘मोदींना हटवा, मोदींना हटवा’ असे म्हणणार्‍यांना जनतेने वेगाने सत्तास्थानातून हटवले आहे. पण, तरीही मोदीविरोधक सुधारत नाहीत. ‘आदत से मजबूर!’
 
Powered By Sangraha 9.0