संत नामदेवांच्या विचारांचे चैतन्यमयी स्वरूप : संत नामदेव अध्यासन

17 Dec 2025 11:25:59

Sant Namdev
 
भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन ‘ज्ञानदीप लावू जगी’ या उद्देशाने देशाच्या दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत भ्रमण करणारे संत नामदेव हे वारकरी संप्रदायातले असामान्य संतमणी. भाषेच्या व प्रांतांच्या सीमा ओलांडून ही ज्ञानज्योत अखेरी पंजाबला पोहोचली. पवित्र गुरुवाणीत नामदेवांच्या हिंदी रचना समाविष्ट झाल्या. पंजाब आणि महाराष्ट्र एका धाग्यात बांधले गेले. त्याचा परिणाम म्हणून पंजाबात नामदेवांचे भक्त निर्माण झाले. नामदेव रायांची ७५७वी जयंती हा हृद्य सोहळा मान्यवरांच्या उपस्थित विद्यापीठात नुकताच साजरा झाला. हेच औचित्य साधून नामदेव आध्यासनाच्या चैतन्यमयी कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 

नाचू कीर्तनाचे रंगी’ असे म्हणणारे संत नामदेव स्वतः इतके रसाळ कीर्तन करीत असत की, प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या कीर्तनात येऊन नाचत असे, याचे वर्णन करणारा संत जनाबाईंचा अभंग प्रसिद्ध आहे.
 
नामदेव कीर्तन करी|
पुढें नाचे सखा पांडुरंग|
जनी म्हणे बोला आता|
ज्ञानदेवा अभंग॥
अभंग बोलतां|
रंग कीर्तनीं भरिला|
प्रेमाचेनि छंदें|
विठ्ठल नाचु लागला॥
 
पांडुरंगाशी तादात्म्य पावलेल्या नामदेवांची भक्ती किती निर्व्याज होती, याच्या अनेक कथा आहेत. नामदेवांच्या आयुष्याचा पूर्वार्ध जितका विलक्षण, त्याहीपेक्षा त्यांच्या जीवनाचा उत्तरार्ध अलौकिक म्हणावा लागेल! प्रिय ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर नामदेव व्याकूळ-उदास झाले. मन कुठेच रमेना, म्हणून ते भारतभ्रमणाला निघाले. या भ्रमंतीत त्यांनी केलेला भागवत धर्माचा प्रसार आणि त्यास मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. या सार्‍या व्यापक कार्याच्या पार्श्वभूमीवर संत नामदेवांच्या नावे स्वतंत्र आध्यासन स्थापन होणे ही घटना फारच मोलाची आहे. पुणे विद्यापीठात सुरू झालेले ‘नामदेव अध्यासन’ हे संपूर्ण देशात सरकारने अधिकृत जी. आर. काढून स्थापन झालेले एकमेव आध्यासन आहे. मराठी भाषेतील एक विद्वान, नामदेव वंशातील एक व्यक्ती, अनुसूचित जाती-जमातीमधील एक व्यक्ती अशी कमिटी गठित करण्यात आली.
 
पहिले अध्यासन प्रमुख म्हणून संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांची नेमणूक झाली. मराठीसोबत हिंदीतही संशोधन होत असल्याने अध्यासनाचा विस्तार होत गेला. देशभरातल्या अभ्यासकांसोबत विदेशी अभ्यासकही मोठ्या औत्सुक्याने इथे ज्ञानोपासना करू लागले. यातून प्राचीन आणि आधुनिक संत, त्यांचे कार्य व चरित्र, विविध धर्म-पंथ, संप्रदाय यांचे सांगोपांग संशोधन प्रबंधांच्या रूपात सिद्ध झाले. यात संतकाव्याचे वाङ्मयीन मूल्य उलगडतानाच तत्कालीन सामाजिक वास्तवही तपासले जाते. काही ऐतिहासिक पैलू समोर येतात. काही संशोधक समाजशास्त्रीय अंगाने अभ्यास करतात. हा सगळा ज्ञानयज्ञ बघितल्यावर लक्षात येते, एकूणच संतवाङ्मय हा विषय अथांग सागर आहे.
 
यातून संशोधकांच्या ओंजळीत जेव्हा चिंतनाचे चमकदार निष्कर्ष मोती होऊन हाती येतात, तेव्हा हे ज्ञानपीठ त्या प्रभावळीत झळाळून उठते. वेळोवेळी आयोजित होणारे अभ्यासकांचे मेळावे आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने संतवाङ्मयाचे अभ्यासक आणि संप्रदायातील उपासक प्रेमाने एकत्र येतात, तेव्हा आध्यासनाचा उद्देश खर्‍या अर्थाने सफल होतो. भक्तिमार्गे समाजाची वैचारिक जडणघडण करणार्‍या संतांच्या नावे अध्यासने स्थापन होण्याचे महत्त्व मोठे आहे, याची प्रचिती येते. याआनुषंगानेच पुणे विद्यापीठात १९८५ साली स्थापन झालेल्या ‘संत नामदेव अध्यासना’ची ४० वर्षांची ही वाटचाल वाङ्मयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगी आहे.
 
ज्ञान आणि भक्तीचे संचित जपणारे विशेषतः संतवाङ्मयाबद्दल कमालीची आस्था असलेले डॉ. कामत यांनी आपल्या कार्यकाळात इथे खरोखर एक सुवर्णयुगच निर्माण केले. आध्यासनाची कार्यपद्धती कशी असावी, त्याची नियमावली कशी आचरणात आणावी, विद्यार्थी आणि अभ्यासक यांच्या मदतीसाठी पूरक साहित्य कसे उपलब्ध करावे, संशोधनाला दिशा व उंची कशी द्यावी, याचा आदर्श स्थापन करणारे संत नामदेव अध्यासन देशभरातील अध्यासनांसाठी पथदर्शी दीपस्तंभ आहे. विविध स्तरांतील अभ्यासक, संशोधक यांना संत-साहित्याकडे आकर्षित करण्यात डॉ. कामत कमालीचे यशस्वी ठरले. मध्ययुगीन संतांबरोबरच आधुनिक संतांचे जीवनकार्य, त्यांचे प्रभाव क्षेत्र, विविध पंथ, संप्रदाय यांची ज्ञानपरंपरा असे बहुमुखी संशोधन इथे ८०० प्रबंधांत संग्रहित झाले आहे.
 
विषयांची निवड, त्यानुसार अभ्यासकांनी केलेल्या क्षेत्रभेटी, संबंधित पूरक सामग्री, विषयांचा पाठपुरावा, संदर्भशोध, छायाचित्रे अशी भरीव जोड देण्याची शिस्त यामुळे नामदेव आध्यासनात एक बहुमोल ‘अभ्यास पर्व’ उदयाला आले. यात तन्मयतेने सखोल संशोधन करणारे डॉ. हे. वि. इनामदार, सुमती देशपांडे, ॐ. गो. दत्तोपासक, डॉ. पद्मावती श्रोत्रीय असे कितीतरी नामवंत आहेत. हिंदी प्रबंधातही विषयांचे वैविध्य असून मराठी संतपरंपरा आणि शीख गुरुपंरपरा यांच्यातील अनुबंध शोधणारा प्रा. वीणा मनचंदा यांचा प्रबंध महत्त्वपूर्ण आहे. प्रा. मनचंदा व सतीश बडवे यांना अनुदान आयोगाची फेलोशिप मिळाली होती.
 
अशाच विलक्षण अभ्यासकांची परंपरा आता डॉ. श्यामा घोणसे यांच्या कुशल मार्गदर्शनात पुन्हा झळाळून उठत आहे. त्यांनी अनेक संस्थांवर त्यांनी महत्त्वपूर्ण पदे भूषविली आहेत. संशोधनात्मक कामाचा भरपूर अनुभव आहे. म्हणूनच त्या अध्यासनाच्या उपक्रमांचे उत्तम संयोजन करतात. वैचारिक उपक्रमांच्या निमित्ताने विद्यापीठात अनेक अभ्यासक आणि नामवंतांची उठ-बस आता वाढली आहे. नामदेव समाज, शीख समाज, संत तुकाराम आध्यासन, विद्यापीठातील इतर अध्यासने, तत्त्वज्ञान विभाग, हिंदी-मराठी-संस्कृत भाषा विभाग या सार्‍यांना सोबत घेऊन समन्वयाने कार्यक्रमांची आखणी होते. यातील प्रत्येक अभ्यासकाचा सहभाग कार्यक्रमाची व्याप्ती वाढवतो.
 
काही महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प आध्यासनाची अभ्यास दिशा आधोरेखित करीत आहेत. यांपैकी मनीषा बाठे यांचा ‘विठ्ठलनामाचा भारत संचार-गुजरात’, अनिल स्वामी यांचा ‘संत नामदेवरायांच्या मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील पाऊलखूणा’, डॉ. तनप्रीत कौर मेहता यांचे ‘गुरू ग्रंथसाहिब और संत नामदेव अनुबंध’ हे प्रदीर्घ हिंदी संशोधन आणि डॉ. अंजली जोशी यांचा ‘भारतीय अभिजात संगीत व नामदेवांच्या हिंदी रचना’ असे काही महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत. यात संशोधकांची मेहनत, विषयाचा घेतलेला धांडोळा आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटी यातून उलगडणारे सत्याचे कवडसे आध्यसनाचे व्यासपीठ नक्कीच प्रकाशमान करतील.
 
स्वामी सावरूपानंद पुरस्कार हा नामदेव अध्यासनाच्यावतीने प्रदान करण्यात येणारा संत वाङ्मयात अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या या पुरस्काराने आजवर वि. रा. करंदीकर, राम शेवाळकर अशा अनेक थोर अभ्यासकांना गौरवण्यात आले आहे. यंदा डॉ. अशोक कामत यांना हा पुरस्कार मरणोत्तर समर्पित करण्यात आला.

डॉ. अशोक कामत यांनी लावलेला संशोधन कार्याचा मोगर्‍याचा ‘वेलू’ आता डॉ. श्यामाताईंनी प्रेमाची शिंपण घालून मांडवावर चढवला आहे. त्याचा ‘बहरू’ सुखावतो आहे; तथापि डॉ. कामत यांनी पदभार सोडल्यानंतर मधली काही वर्षे आध्यासनाला एक कुलूपबंद अवस्था बघावी लागली. अंधार्‍या बोगद्यातून काही काळ झालेला हा प्रवास फार वेदनादायी होता.
 
मौलिक संशोधन, महत्त्वाची कागदपत्रे, फायली, संदर्भग्रंथ, प्रवंध संग्रह हा सारा सोन्यासारखा ठेवा अडगळीत पडला. ‘कोरोना’ काळात सर्वच जग थांबले होते; पण नामदेव आध्यासनावर या सावल्या जरा जास्त काळ रेंगाळल्या. हा अंधारहा अंधार थोडाफार दूर करणार्‍या काही चांगल्या व्यक्तींचा पायरव इथे अधून मधून उमटला. दूर करणार्‍या काही चांगल्या व्यक्तींचा पाऊलखुणा इथे अधून मधून उमटला. पण वाईट गोष्टी दूर ठेवण्यासाठी सामर्थ्य आणि बळ जरा जास्तच वापरावं लागतं. आता संत नामदेवांच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाच्या कृपेने ते घसरलेलं गाडं पुन्हा रूळावर आलं. डॉ. श्यामा घोणसे म्हणतात, "आध्यासन प्रमुख होण्याचा हा भाग्ययोग माझ्या भाळावर आधीच लिहिला असावा. एवढी मोठी जबाबदारी घ्यावी की नाही, याबद्दल मी साशंक असताना माझे अत्यंत आदरणीय गुरू, ‘पीएचडी’चे गाईड आणि नामदेव आध्यासनाचे अर्ध्वयू डॉ. अशोक कामत यांनी मला तशी आज्ञाच केली. हे आध्यासन उभारताना त्यांनी घेतलेले कष्ट आणि झपाटून केलेले काम मी स्वतः पाहिले आहे. एखादे भरीव कार्य विधायक मार्गाने कसे विस्तारत जाते, त्याचीही मी साक्षीदार आहे. विद्यार्थी दशेतच मी आध्यासनाशी जोडली गेले. तेव्हाचा बांधलेला हा अनुबंध आज प्रमुख पदाच्या जबाबदारीपर्यंत येऊन पोहोचला.
 
हे काम पुढे नेण्यासाठी अनेक संकल्पना आहेत. त्यांपैकी ८०० संशोधन प्रबंधाचे डिजिटायझेशन प्राधान्याने करण्याचा संकल्प आहे. कारण अलीकडे आपल्या समाजात मतभेद पराकोटीला पोहोचलेले दिसतात. पण हे वेळीच थांबून निदान मनभेद तरी वाढू नयेत, म्हणून राष्ट्रऐक्य आणि समरसता यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेले नामदेवराय यांचे कार्य समाजासमोर आले पाहिजे. त्यांच्यावर झालेले बहुविध संशोधन देशाच्या विविध प्रांतात नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असून अभ्यासकांसाठी सोयी-सुविधा यांची व्यवस्था उभारणे, संशोधन साहाय्यक नेमणे, ‘संत नामदेव अध्ययन व संशोधन केंद्र’ कार्यान्वित करणे असे आणखी काही संकल्प त्यांनी आवर्जून सांगितले. ‘संत नामदेव अध्ययन व संशोधन केंद्रा’चे कार्य पाहिले की वाटते, पाश्चात्य प्रबोधन युगाच्याही आधी आपल्याकडची ज्ञानपरंपरा समृद्ध होती. मध्ययुगीन कालखंडात हे वेद-उपनिषदातील ज्ञान संतांनी साध्या सोप्या अभंगरचनेतून सामान्यांपर्यंत आणले. वाङ्मयाचा हा सगळा इतिहास अतिशय गौरवशाली आणि समाजाभिमुख आहे. हाच देदीप्यमान वारसा संशोधन, संवाद, सहवास आणि समन्वय यातून अधोरेखित करणारे संत नामदेव अध्यासन हे ज्योतिर्मयी स्थान अनेकांसाठी दिशादर्शक आहे. राम, कृष्ण, शिव या तीन शक्तिशाली तत्त्वांना जोडणारे संत नामदेव, जणू या शक्तीचा चौथा स्तंभ होऊन जीवनभर कार्यरत राहिले. तसेच हे अध्यासनही अखंड कार्यरत राहो, हीच श्रद्धा मनोमन जागी झाली.
 
 - अमृता खाकुर्डीकर


Powered By Sangraha 9.0