ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बाँडी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १६ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली. हल्लेखोर मूळचे पाकिस्तानी होते. दरम्यान, हा हल्ला अचानक घडलेला नसून, त्याची चिन्हे आधीपासूनच दिसू लागली होती, अशी माहिती समोर आली आहे. सिडनीतील ज्यू-बेकर्यांच्या समोर लाल रंगाचा उलटा त्रिकोण काढण्यात आला होता, जो ज्यूविरोधाचे प्रतीक मानला जातो. या चिन्हाची मुळे हिटलरच्या काळातील जर्मनीपर्यंत जातात.
साधारण दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या सीमेजवळ गोळीबार करत हजारो ज्यूंची हत्या केली आणि सुमारे अडीचशे लोकांना बंधक बनवले. यामुळे संतप्त झालेल्या इस्रायलने तातडीने गाझापट्टीवर हल्ला चढवला. युद्ध दीर्घकाळ सुरू राहिले. अलीकडे अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाली. इस्रायलने आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी ‘हमास’वर कारवाई केली. मात्र, यादरम्यान जगातील अनेक देश इस्रायलविरोधी भूमिका घेऊन बोलू लागले. ही लढाई केवळ ‘मुस्लीम विरुद्ध ज्यू’ अशी राहिली नाही, तर पाश्चात्त्य देशांतील मुस्लीम लोकसंख्येतूनही ज्यूंविरोधात आक्रमकता वाढू लागली.
याच आक्रमकतेचे ताजे उदाहरण म्हणजे, सिडनीतील दहशतवादी हल्ला, ज्यात सुमारे १६ जणांचा जीव गेला. सण साजरा करत असलेल्या ज्यूंवर हा थेट हल्ला होता. मात्र, त्याआधीच ऑस्ट्रेलियातील या शहरात ज्यूविरोधी संकेत दिसू लागले होते. सिडनीच्या पूर्व भागात, जिथे ज्यूंची लोकसंख्या जास्त आहे, तेथे भिंतींवर धर्मविरोधी मजकूर झळकू लागला. ज्यू मालमत्तांना आग लावण्यात आली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या धार्मिक स्थळांवरही बॉम्ब फेकण्यात आले. विद्यापीठांमध्येही ज्यू विद्यार्थ्यांवर हिंसाचार सुरू झाला.
या सगळ्याची सुरुवात मात्र एका ज्यू बेकरीसमोर काढलेल्या लाल रंगाच्या उलट्या त्रिकोणापासून झाली होती. गाझा-हल्ल्यानंतर काही दिवसांतच कोणीतरी स्प्रे पेंटने हे चिन्ह काढले होते. हेच पहिले संकेत होते. ‘हमास’च्या लष्करी शाखेनेही अनेकदा हे चिन्ह वापरले आहे. इस्रायली टँकवर हल्ला करण्यापूर्वीही ते असेच निशाण काढत असत. पॅलेस्टाईनच्या झेंड्यातही एक आडवा त्रिकोण दिसतो.
असा हा लाल रंगाचा उलटा त्रिकोण सर्वप्रथम नाझी जर्मनीने प्रतीक म्हणून वापरला होता. दुसर्या महायुद्धाच्या काळात नाझींनी छळ-छावण्यांमध्ये कैद्यांची ओळख पटवण्यासाठी ‘बॅज प्रणाली’ सुरू केली. त्यानुसार, लाल उलटा त्रिकोण राजकीय कैद्यांसाठी वापरला जात असे. यात कम्युनिस्ट, समाजवादी, ट्रेड युनियनचे सदस्य आणि नाझींचे टीकाकार यांचा समावेश होता. अशा कैद्यांना लाल उलट्या त्रिकोणाची पट्टी लावली जात असे, जेणेकरून ते दूरूनच ओळखू येतील. त्यावरून त्यांच्याशी कसा व्यवहार करायचा, हे ठरवले जाई. लाल रंगाला नाझींनी बंडखोरी आणि सत्तेसाठी धोका यांचे प्रतीक मानले होते.
हिटलरच्या काळानंतर जर्मनीने नाझी राजवटीशी संबंधित अनेक चिन्हांवर बंदी घातली. मात्र, लाल त्रिकोणावर तशी ठोस कारवाई झाली नाही. अलीकडे मात्र बर्लिन स्टेट असेंब्लीने या त्रिकोणावरही बंदी घालण्याचा आणि जाणीवपूर्वक वापर केल्यास तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. गाझा युद्धाच्या काळात आणि त्यानंतर हे चिन्ह अधिक प्रमाणात दिसू लागले. ‘हमास’शी संबंधित टेलिग्राम चॅनेल्स, व्हिडिओ आणि पोस्टर्समध्ये उलटा लाल त्रिकोण वारंवार दिसू लागला. इस्रायली ठिकाणे, लष्करी वाहने किंवा सैनिक ओळखण्यासाठीही हे चिन्ह वापरले जाऊ लागले, जेणेकरून त्यांच्यावर हल्ला करता येईल.
एकूणच, सिडनीतील बाँडी बीचवरील दहशतवादी हल्ला हा केवळ एक स्वतंत्र हिंसक प्रकार न राहता, जागतिक पातळीवर वाढत चाललेल्या ज्यूविरोधी कट्टरतेचे आणि प्रतीकात्मक दहशतीचे भयावह प्रतिबिंब ठरत आहे. हिंसाचाराच्या आधी दिसलेली चिन्हे, वापरलेली प्रतीके आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ पाहता, हा हल्ला अचानक घडलेला नसून एका दीर्घकालीन मानसिक आणि वैचारिक आक्रमणाचा भाग असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अशा प्रतीकांमागील अर्थ, त्यांचे राजकीय व ऐतिहासिक संदर्भ आणि त्यातून निर्माण होणार्या धोक्यांकडे दुर्लक्ष न करता, लोकशाही समाजांनी सजग राहणे आणि दहशतवादाच्या प्रत्येक स्वरूपाला वेळेत रोखणे, हीच आजची सर्वात मोठी गरज ठरते.