मुंबई : (Rahul Gandhi) काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी म्युनिक येथे बीएमडब्ल्यू प्लांटला भेट दिली. या दौऱ्यात राहुल गांधींनी (Rahul Gandhi) बीएमडब्ल्यूच्या अत्याधुनिक वाहननिर्मिती प्रक्रियेचा तसेच एम-सीरिज, इलेक्ट्रिक मोटारसायकल, बीएमडब्ल्यू आयएक्स ३, रोल्स-रॉयस, इटालियन डिझाइनवर आधारित जुनी बीएमडब्ल्यू इसेटा आणि मॅक्सी स्कूटर यांसारख्या विविध मॉडेल्सची पाहणी केली.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत राहुल गांधी म्हणाले, भारताला उत्पादन सुरु करण्याची गरज आहे. कोणत्याही देशाच्या यशाची गुरूकिल्ली उत्पादनात दडलेली असते. दुर्दैवाने, आपल्या देशातील मॅन्युफॅक्चरिंग वाढण्याऐवजी घटत आहे.
भारतीय झेंडा फडकताना पाहून अभिमान वाटतो
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टीव्हीएस कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली बीएमडब्ल्यू जी४५०जीएस मोटरसायकलही पाहिली. ही मोटारसायकल तामिळनाडूतील होसूर येथील टीव्हीएस प्रकल्पात विकसित करण्यात आली असून अद्याप भारतात लॉन्च झालेली नाही.
या अनुभवाबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले, अद्भुत अनुभव. विशेष म्हणजे ४५० सीसी मोटारसायकल पाहून मला खूप आनंद झाला. येथे भारतीय झेंडा फडकताना पाहून अभिमान वाटतो.
बीएमडब्ल्यू–टीव्हीएस भागीदारीतून यापूर्वी टीव्हीएस अपाचे आरआर ३१० ही स्पोर्ट्स मोटारसायकल तयार करण्यात आली होती. ही मोटारसायकल बीएमडब्ल्यू मोटोराडच्या सहकार्याने टीव्हीएसने तयार केली आहे. बीएमडब्ल्यू हीच मोटारसायकल बीएमडब्ल्यू जी ३१० आरआर या नावाने बाजारात विकली जाते. दोन्ही मोटारसायकलमध्ये ३१२ सीसी इंजिन प्लॅटफॉर्म समान असून, ट्युनिंग, फीचर्स आणि ब्रँडिंगमध्ये फरक आहे. टीव्हीएसची आवृत्ती किंचित अधिक पॉवर देणारी असून ट्रॅक-केंद्रित रायडिंगसाठी प्रगत किट्ससह उपलब्ध आहे.
भारतीय अभियांत्रिकीचा अभिमान
बीएमडब्ल्यूच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली टीव्हीएसची ४५० सीसी मोटरसायकल पाहणे हा दौऱ्याचा खास क्षण होता. भारतीय अभियांत्रिकीचे जागतिक व्यासपीठावर दर्शन होताना पाहून अभिमान वाटतो,” असे राहुल गांधी यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.
ते पुढे म्हणाले, मॅन्युफॅक्चरिंग हा मजबूत अर्थव्यवस्थेचा कणा आहे. दुर्दैवाने भारतात उत्पादन क्षेत्र घटत आहे. वेगवान आर्थिक वाढीसाठी अधिक उत्पादन करणे, सक्षम मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम उभारणे आणि मोठ्या प्रमाणावर दर्जेदार रोजगार निर्माण करणे गरजेचे आहे.
या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी बीएमडब्ल्यू कार चालवताना आणि तिची वैशिष्ट्ये पाहताना दिसले. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या अनेक भारतीयांशी संवाद साधला, त्यात दुबईहून आलेल्या एका कुटुंबाचाही समावेश होता. तसेच इतर पाहुण्यांसोबत त्यांनी फोटोही काढले.