मुंबई : (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इथिओपियाच्या अधिकृत दौऱ्यावर असून, या भेटीदरम्यान इथिओपिया सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रेट ऑनर निशाण’ प्रदान करून गौरवले आहे. विशेष बाब म्हणजे, जुन्या परंपरा मोडत हा सन्मान स्वीकारणारे पंतप्रधान मोदी हे पहिले परदेशी राष्ट्रप्रमुख ठरले आहेत.
इथिओपियाचा हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा भारत जगातील २५ वा देश ठरला असून, आजवर कोणत्याही भारतीय पंतप्रधानांना इतक्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय सर्वोच्च सन्मानांनी गौरवले गेलेले नाही. आदिस आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात झालेल्या विशेष समारंभात पंतप्रधान मोदींना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारत–इथिओपिया द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल तसेच जागतिक पातळीवरील दूरदर्शी नेतृत्वासाठी पंतप्रधान मोदींना हा सन्मान देण्यात आला आहे.
हा सन्मान १४० कोटी भारतीयांचा
सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “हा माझा वैयक्तिक सन्मान नसून १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. मी सर्व भारतीयांच्या वतीने हा सन्मान अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारतो.” हा सन्मान भारत-इथियोपिया भागीदारी घडवून आणणाऱ्या असंख्य भारतीयांचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आज संपूर्ण जगाचे लक्ष ग्लोबल साऊथ (Global South) कडे लागलेले असताना, इथियोपियाची स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि आत्मगौरवाची चिरकालीन परंपरा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्य त्याच भागीदाऱ्यांचे असते, ज्या विश्वास आणि दीर्घकालीन दृष्टीकोनावर आधारित असतात, असेही त्यांनी नमूद केले.
जॉर्डन दौरा पूर्ण केल्यानंतर मंगळवारी दिनांक १६ डिसेंबरला पंतप्रधान मोदी इथिओपियात दाखल झाले. या भेटीत त्यांनी इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्याशी सविस्तर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी अबी अहमद अली यांना “बंधू आणि जिवलग मित्र” असे संबोधले.
इथिओपियाच्या भूमीत असणे एक भाग्य
इथिओपियाच्या या महान भूमीत तुम्हा सर्वांमध्ये असणे हा एक भाग्याचा क्षण आहे. मी दुपारी इथिओपियाला पोहोचलो. आगमनानंतर, मला येथील लोकांमध्ये असलेला उत्साह आणि आपुलकीचा अनुभव आला. पंतप्रधान अली यांनी विमानतळावर माझे स्वागत केले आणि मला फ्रेंडशिप पार्क आणि सायन्स म्युझियममध्ये नेले. या ठिकाणी आमच्यात अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली.
इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, “इथिओपियाला येऊन मला अत्यंत आनंद होत आहे. ही माझी पहिलीच भेट असली तरी येथे पाऊल ठेवताच मला आपलेपणा आणि आत्मीयतेची भावना जाणवली.”