मराठी माणसा जागा हो, तुझी मुंबई तुझ्यापासून तोडली जात आहे! यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावंच लागेल!’, ‘पायाखालची जमीन एकदा गेली की, ती परत मिळत नसते. मराठी माणसा मुंबई वाचव! ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे. यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावंच लागेल!’ हे संदेश मुंबईच्या रस्त्यांवर येता-जाता जिथे-तिथे चिकटवलेले. काळ्या रंगात अशी पांढरी मोठाली अक्षरे वापरून मुद्दामच या विषयाचे गांभीर्य बिंबवण्याचा केलेला हा बाष्कळ प्रयत्न! या संदेशांवर कोणाचेही फोटो, पक्षचिन्ह अथवा साधे नावही नाही. म्हणजे इतका महत्त्वाचा संदेश मराठी माणसाला द्यायचाय खरा; पण तोही निनावी! असो. एकीकडे ‘त्यांचे’ आडनाव म्हणजे ‘ब्रॅण्ड’; पण दुसरीकडे असे संदेश जाहीर करताना त्यावर मग ते ‘ब्रॅण्डेड आडनाव’ का बरे टाळले असेल, हे ‘मातोश्री’च जाणो!
खरेतर असे कानाकोपर्यात, गल्लीबोळात कशा-कशाचे पॅम्प्लेट्स आणि पोस्टर्स चिकटवले जातात आणि लोक त्यांना किती महत्त्व देतात, ते वेगळे सांगायला नकोच. पण, तरीही मराठी माणसाला उद्देशून हे पोस्टर्स ऐन निवडणूक प्रचाराच्या प्रारंभीच झळकल्यामुळे चर्चेचा विषय तर ठरणारच. आता या पोस्टर्समधील आवाहन हे खरोखर मराठी माणसासाठी आहे की, त्या ‘ब्रॅण्डेड आडनाव’वाल्यांनी त्यांच्याच मनातली भीती भिंतींवर अशी चिकटवून जगजाहीर केली, हाच खरा प्रश्न. म्हणजे ‘मराठीसाठी एकत्र यावं लागेल’, ‘पायाखालची जमीन एकदा गेली की...’, ‘अस्तित्वाची लढाई’, ‘रात्र वैर्याची आहे’ हे सगळे शब्द वाचले की डोळ्यासमोर त्या ‘ब्रॅण्डेड आडनाव’वाल्यांचेच चेहरे उभे राहिले की नाही? त्यामुळे या पोस्टर्सवर झळकलेल्या भावना, त्या ‘ब्रॅण्डेड आडनाव’वाल्यांच्या आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या मनातील पराजयाच्या सुप्त भीतीच्या आहेत. कारण, मुंबई पालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकणारच आहे. शिवाय, पालिकेकडे ‘फॅमिली बिझनेस’ या नजरेतून बघणार्यांचे मनसुबेही जमीनदोस्त होतील. कारण, मराठी माणूस आणि मुंबईकर डोळे उघडे ठेवून जागा आहे. त्या राजकीय ‘ब्रॅण्ड’च्या नादी लागून ना मराठी माणूस कधी ‘ब्रॅण्डेड’ झाला, ना हे मुंबई शहर! त्यामुळे आता मराठीच्या, मुंबईच्या नावाने कितीही भावनिक गळ घातली, तरी उपयोग शून्यच!
मराठीचा भावनिक सापळा
मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी अस्मिता वगैरे मुद्द्यांची चर्चा ही महाराष्ट्रभर नसून मुंबईकेंद्रितच का? तर, त्यामागची संयुक्त महाराष्ट्र चळवळीची पार्श्वभूमी! मुंबई ही महाराष्ट्रातच राहावी, म्हणून १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले. तत्कालीन काँग्रेसच्या केंद्रातील सरकारविरोधात हा तीव्र लढा होता, जो महाराष्ट्रानेच जिंकला. आता या घटनेलाही तब्बल ६५ वर्षे पूर्ण झाली. मागील ६५ वर्षांत केंद्रात, राज्यात, पालिकेतही सर्वपक्षीय सरकारे आली आणि गेली. पण, मुंबई पुन्हा महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, अशी भूमिका कोणत्याही राजकीय पक्षाने कधी घेतली नाही. मात्र, मागील काही वर्षांत मुंबई, मग मुंबई महानगर प्रदेश, ते आता पालघर, डहाणूही महाराष्ट्रापासून तोडून गुजरातमध्ये सामील करण्याचा, मुंबईला केंद्रशासित करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, अशी एक अनाठायी भीती अगदी पद्धतशीरपणे पेरण्यात काही प्रादेशिक पक्ष दुर्दैवाने यशस्वी झालेले दिसतात. यंदाही विशेषकरून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अशीच भावनिक साद मतदारांना अगदी विश्वास बसेस्तोवर घातली जाईल. प्रत्येक भाषणातून मुंबईची जमीन, मराठी माणूस, मराठी भाषा कशी धोक्यात आहे, त्याच्या अस्तित्वावरच कसा घाला घातला जात आहे, याचे ठाकरी शैलीत अतिशयोक्तीपूर्ण सादरीकरणही होईल. काही हिंदीभाषक नेत्यांच्या भूमिका कशा मराठीविरोधी आहेत, त्यांचे वाभाडे काढले जातील. एकूणच, मराठीची महाराष्ट्रात कशी गळचेपी होते, याचाच पाढा पुन्हा-पुन्हा, पुन्हा-पुन्हा वाचला जाईल, जोपर्यंत तो खरा वाटणार नाही.
एकूणच, ‘मराठी एके मराठी’ हाच मुद्दा पुढील महिनाभर अगदी पद्धतशीरपणे रेटला जाणार. शहरांचा विकास असो अथवा सत्ता असताना आपण काय केले, याविषयी विरोधकांकडे मुळी सांगण्यासारखे काहीच नाही. एवढेच काय, तर मराठीसाठी, मराठी माणसासाठीही त्यांनी पालिकेत २५ वर्षे सत्ता उपभोगूनही काहीच केले नाही, हे मुंबईकर जाणतात. पण, म्हणतात ना, खोट्याची दुनिया फार काळ टिकत नाही. तसेच, हा ‘फेक नॅरेटिव्ह’ यंदा मुंबईकरच नाही, तर महाराष्ट्रातील जनताच कायमस्वरूपी उखडून फेकणार आहे. मराठी माणूस या राजकीय संधिसाधूंच्या मराठी अस्मितेच्या भावनिक सापळ्यात यंदा फसणार नाही, हे निश्चित!