नाशिक : बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सदनिका हडपल्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंबरोबरच त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरुद्ध न्यायालयाने ‘अटक वॉरंट’ जारी केले आहे. त्यामुळे कोकाटे यांच्यापुढील अडचणी वाढल्या असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. १७ डिसेंबर रोजी त्यांच्याकडे असलेले क्रीडामंत्रीपद काढून घेतले आहे. या खात्याचा कार्यभार आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकाटे यांच्याकडे असलेले मंत्रालय काढून घेण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती. याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.
अटक वॉरंट जारी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी वैद्यकीय कारणामुळे शरण येण्यासाठी चार दिवसांची मुदत मागितली होती. परंतु, न्यायालयाकडून ही मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे मंत्री कोकाटे यांची अटक आता अटळ मानली जात आहे. सध्या ते मुंबई येथील रुग्णालयात दाखल असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
मंगळवार, दि. १६ डिसेंबर रोजी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका हडपल्याच्या प्रकरणाचा निकाल लागला होता. मात्र, त्या दिवशी मंत्री कोकाटे व त्यांचे बंधू न्यायालयात उपस्थित नव्हते. निकाल जाहीर झाल्यापासून मंत्री कोकाटे यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने ते कुणाच्याही संपर्कात नव्हते. बुधवार, दि. १७ डिसेंबर रोजी अॅड. मनोज पिंगळे यांनी मंत्री कोकाटे यांना वैद्यकीय कारणास्तव शरण येण्यास चार दिवसांचा अवधी देण्याची विनंती अर्जाद्वारे केली होती. तसेच, उच्च न्यायालयात आम्ही अपील दाखल करीत असल्याचे अॅड. पिंगळे यांनी म्हटले आहे. परंतु, कोकाटे यांचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आणि ‘अटक वॉरंट’ जारी केल्याचे सरकारी वकील अॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी सांगितले.
या प्रकरणात मूळ तक्रार दिवंगत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केली होती. न्यायालयाने ‘अटक वॉरंट’ जारी केल्यानंतर दिघोळे यांची कन्या अॅड. अंजली दिघोळे-राठोड आणि अॅड. आशुतोष राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोकाटे हे कॅबिनेट मंत्री असून, न्यायालयाने काही अवधी द्यावा, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली. त्यावेळी कायद्यापुढे सर्व समान असल्याचे न्यायालयाने नमूद केल्याचे अॅड. राठोड यांनी सांगितले. कोकाटे यांच्याकडून वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात दाखल झाल्याचा कुठलाही पुरावा देण्यात आला नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सिन्नरच्या एकहाती सत्तेला सुरुंग?
सिन्नर विधानसभेचे मैदान मारून नेताना मंत्री कोकाटे यांनी अनेकवेळा वेगवेगळा घरोबा केला. 2014चा अपवाद वगळता, पाच वेळा आमदार राहिलेल्या कोकाटे यांची सिन्नर तालुक्याच्या राजकारणावर चांगलीच पकड आहे. परंतु, दोन महिन्यांपूर्वी शरद पवार गटाकडून गत विधानसभा लढलेले उदय सांगळे भाजपवासी झाले. तसेच, ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि सांगळे कधीकाळी एकाच पक्षात असल्याने मंत्री माणिकराव कोकाटे यांना नक्कीच शह देण्याची दोघेही वाट पाहत होते. आता मंत्री कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने, त्यांच्या सिन्नरच्या एकहाती सत्तेला चांगलाच सुरुंग लागण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.