मुंबई : ( Devendra Fadnavis ) लोकहितांच्या योजनांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिकाधिक सुलभ आणि सहज सुविधा उपलब्ध होतील यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्येक विभागामध्ये वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी प्रलंबित विषायांची आढावा बैठक पार पडली. यावेळी अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी तसेच संबधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचा विस्तार करतांना त्यामध्ये आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा समावेश करावा. शंभर दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी येणाऱ्या तांत्रिक, प्रशासकीय अथवा इतर कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी तत्काळ सोडविण्यात याव्यात. सर्व विभागांनी लोकहिताशी संबंधित कामांना अधिक गती द्यावी आणि गुणवत्तापूर्ण कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत."
हेही वाचा : Manikrao Kokate : अटकेची टांगती तलवार; माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल, नेमकं झालंय काय?
अल्प कालावधीत लक्षणीय प्रगती
राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमांतर्गत विविध विभागांमधील प्रलंबित कामांचा आढाव्यानुसार दि. १६ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या धोरणात्मक बाबींमध्ये ८८३ मुद्द्यांपैकी ८०७ मुद्द्यांवरील कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून ९१ टक्के पूर्णत्वाचे प्रमाण साध्य झाले आहे. १ मे २०२५ रोजी हे प्रमाण ७८ टक्के होते, त्यामुळे अल्प कालावधीत लक्षणीय प्रगती झाल्याचे स्पष्ट होते.
राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागास निश्चित उद्दिष्टे व कालमर्यादा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक प्रलंबित विषयांवरील कार्यवाही पूर्ण झाली असून उर्वरित मुद्द्यांवर काम सुरू आहे. विभागनिहाय कामकाजाची सद्यस्थिती, अंमलबजावणीतील अडचणी तसेच आवश्यक सुधारणा यांचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला.