बाईपण... माणूसपण भारी देवा!

16 Dec 2025 10:45:37

Vimal Kasbe
 
निरक्षर; पण, माणसाचे दुःख वाचता येणार्‍या समाजाचे भान असलेल्या लातूरच्या विमल कसबे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष आणि त्यातून उभे राहिलेले त्यांचे समाजकार्य यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
हातपाय गाळून बसू नकोस. उठ, कर्म कर. त्याचे फळ मिळेल याची आशा करू नकोस. वेळ वाया घालवू नकोस.” नरेंद्र महाराजांचे प्रवचन विमल कसबे यांनी ऐकले आणि आजाराने निराश झालेल्या त्यांच्या मनात प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. हा संदेश आपल्यासाठीच आहे, असे त्यांना वाटले. त्या आजारी होत्या. आजारामुळे गर्भाशयाची पिशवी काढण्यात आली होती. पुढे काही उपचार चुकल्यामुळे त्यांच्या मनावर आणि शरीरावरही परिणाम झाला होता. प्रचंड नैराश्य आणि शरीरही खूप शक्तिहीन झाले होते. पण, नरेंद्र महाराजांचे प्रवचन ऐकून त्यांच्यात पुन्हा काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. पुढे त्या नाणीजला गेल्या. तिथे नरेंद्र महाराजांचे प्रवचन ऐकले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश मिळाला. त्या गावात आल्या आणि आयाबायांना घेऊन त्यांनी गावात पाणी अडवण्यासाठी बांध घातले. तसेच, सामाजिक मागास गटातील विद्यार्थ्यांनी शिकावे म्हणून विमल अशा मुलांना शोधून काढतात. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांचे शिक्षण सुरू होईल, यासाठी प्रयत्न करतात.
 
लातूरच्या विमल लिंबाराम कसबे म्हणजे लातूरच्या ईमलताई. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर जगणार्‍या आणि त्यासाठी कार्य करणार्‍या एक धडाडीच्या कार्यकर्त्या. त्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून लैंगिक आजारासंदर्भात समाजात जागृती करण्याचे मोठे काम केले आहे. त्याशिवाय फसलेल्या आणि त्यातूनच एड्सचे भक्ष्य बनलेल्या दुर्दैवी स्त्रियांना मानसिक आधार देणे, त्यांना उपचार मिळवून देणे, त्यांच्यामुळे इतर पुरुषांना एड्स होऊ नये, यासाठी त्या महिलांचे समुपदेशन करणे, ही सगळी कामे विमल करू लागल्या. गावातल्या इच्छुक, गरजू महिलांना त्यांनी व्यवसाय उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले. त्या बालविवाहांच्या विरोधातही जनजागृती करत असतात. भांडण-तंटा न करता, कुटुंब म्हणून आपण सगळ्यांनी एकीने राहावे, कुटुंबाचे, समाजाचे भले करावे, अशी शिकवण त्या आयाबायांना आणि प्रत्येकालाच देत असतात. घरातली भांडणे मिटवण्यासाठी लोक त्यांच्याकडे येतात. त्याही निष्पक्षपणे भांडणे मिटवतात. अशाप्रकारे अनेक घरांत शांती प्रस्थापित केल्याने, अनेकजणींना स्वावलंबनाचा मार्ग दाखवल्याने गावात त्या ‘ईमलताई’ म्हणून सन्मानाचे स्थान मिळवून आहेत. प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता महिला ही सगळी कामे करतच असते, त्यात काय नवीन? असे मत अनेकजण मांडतील. पण, सामाजिक कार्य आणि वैयक्तिक आयुष्याचा संघर्ष यांची कसरत करतच विमल यांचे कार्य उभे राहिले. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ.
 
अंबाजोगाईच्या कोंडिबा सरवदे आणि सोजरबाई यांना पाच मुले, त्यांपैकी एक विमल. राबायचे तेव्हा खायचे, असे दिवस. विमल यांना शाळा शिकायची होती. मात्र, आई-बाबांना घर चालवण्यासाठी हातभार लागावा म्हणून त्यांना शाळा शिकता आली नाही. गावखेड्याचे आणि त्यातही समाजाचे वातावरण असेच की, मुलीने काय शिकायचे? त्यामुळे वयाच्या १४व्या वर्षी त्यांचा विवाह लिंबराज कसबे यांच्याशी झाला. सासरी पतीसोबत सासरा आणि दीर होते. त्यांची सर्वार्थाने जबाबदारी विमल यांच्यावरच होती. वय लहान होते, पण, घरीदारी कष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता. अशातच गावात रोजगारही व्यवस्थित नव्हता. मग, कसबे कुटुंब लातूरला आले.
 
इथे लिंबराज वीटभट्टीवर जाऊ लागले. दरम्यान, कसबे दाम्पत्याला पाच मुले झाली. विमल या घरी बसल्या-बसल्या छोटी-मोठी कामे करू लागल्या. साचलेल्या पैशातून त्यांनी एक म्हैस विकत घेतली. पुढे आणखी दोन म्हशी विकत घेतल्या. दूध, ताक, लोणी विकता-विकता त्यांनी बांगड्यांचा आणि साडी विक्रीचाही व्यवसाय सुरू केला. त्यांनी पैसे साठवून गावातच हक्काचे घरही घेतले. पुढे बचतगटाबद्दल माहिती मिळाली. त्यांनी मेहनतीने २० बचतगट बनवले. यातूनच महिलांचे स्वयंरोजगार गट बनवले. गावात महिला सक्षमीकरणाचे काम सुरू झाले. बचतगटाबद्दल माहिती घ्यायची असेल किंवा महिला सक्षमीकरणाच्या योजनांबद्दल माहिती हवी असेल, तर विमल यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला हमखास लोक येतात. मी दुःख भोगले, मला कष्टच करावे लागले, असे विमल कधीच म्हणत नाहीत. भोगलेल्या दुःखाचा, कष्टाचा त्या बाऊ करत नाहीत, तर समर्थपणे सगळ्या परिस्थितीला त्या सामोर्‍या जातात. त्या म्हणतात, "मी आयुष्यात थोडेसे काही करू शकले. कारण, डॉ. बाबासाहेबांचे विचार रक्तात आहेत. तसेच, नरेंद्र महाराजांच्या विचारांनी प्रेरणा मिळाली. यापुढेही आयाबायांच्या भल्यासाठी आणि समाजात चांगलेच घडावे यासाठी काम करायचे आहे.” बाईपण भारी असतेच. पण, विमल यांचे कार्य, विचार माणूसपण भारी करण्यासाठीचे आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0