मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जॉर्डन दौऱ्याचा आज (दि. १६) दुसरा दिवस असून ते भारत–जॉर्डन बिझनेस फोरमला संबोधित करणार आहेत. याआधी सोमवारी (. १५) अम्मान येथील हुसैनीया पॅलेसमध्ये जॉर्डनचे किंग अब्दुल्ला (King Abdullah II) यांनी पंतप्रधान मोदींचे औपचारिक स्वागत केले. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात भारत आणि जॉर्डनची भूमिका समान असल्याचे स्पष्ट केले. उबदार स्वागताबद्दल त्यांनी किंग अब्दुल्ला यांचे आभार मानले आणि खतनिर्मिती तसेच डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर दिला. किंग अब्दुल्ला यांनी या दौऱ्यात झालेल्या करारांवर आणि सामंजस्य करारांवर समाधान व्यक्त करत, त्यातून दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ होईल आणि नव्या भागीदाऱ्या आकाराला येतील, असे सांगितले. त्यांनी ही भेट दशकानुदशके टिकलेल्या भारत–जॉर्डन मैत्रीचे प्रतीक असल्याचेही नमूद केले.
भारत-जॉर्डनमध्ये ५ करारांवर सहमती
भारत आणि जॉर्डन यांच्यात एकूण पाच करारांवर सहमती झाली आहे. या करारांमध्ये संस्कृती, अक्षय व स्वच्छ ऊर्जा, जलसंपत्ती व्यवस्थापन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि ऐतिहासिक वारसा संरक्षण यांचा समावेश आहे. दोन्ही देशांनी सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये संयुक्त प्रयत्न करणे आणि जलव्यवस्थापन अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ई-गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञानाधारित सार्वजनिक सेवांमध्ये भागीदारी पुढे नेण्यावरही सहमती झाली. याशिवाय, जॉर्डनमधील पेट्रा आणि भारतातील वेरूळ लेणी यांच्यात ‘ट्विनिंग’ करार करण्यात आला असून, यामुळे वारसा संवर्धन, पर्यटन आणि सांस्कृतिक सहकार्याला चालना मिळणार आहे.
भारत-जॉर्डन संबंधांना ७५ वर्षे पूर्ण
भारत आणि जॉर्डन (India–Jordan Relations) यांनी १९५० मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. २०२५ मध्ये या संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) जॉर्डन दौऱ्यावर आहेत. भारत हा जॉर्डनचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. २०२३–२४ मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार २.८७५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला, यापैकी भारताची निर्यात सुमारे १३,२६६ कोटी रुपये होती. आगामी काळात द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज डॉलर (सुमारे ४५,२७५ कोटी रुपये) करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जॉर्डन भारताला मोठ्या प्रमाणावर रॉक फॉस्फेट आणि खतांसाठी आवश्यक कच्चा माल पुरवतो; भारताच्या एकूण रॉक फॉस्फेट आयातीपैकी सुमारे ४० टक्के हिस्सा जॉर्डनकडून येतो. त्याउलट, जॉर्डन भारताकडून यंत्रसामग्री, पेट्रोलियम उत्पादने, धान्य, रसायने, मांस, ऑटो पार्ट्स आणि औद्योगिक वस्तू आयात करतो. भारतीय कंपन्यांनी जॉर्डनमधील फॉस्फेट व वस्त्रोद्योग क्षेत्रात आतापर्यंत १.५ अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे.