जेन-झी : दुधारी अस्त्र

16 Dec 2025 11:07:29
 
Sonam Wangchuk
 
नेपाळमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या ‘जेन झी’ आंदोलनाला अनेक राष्ट्रांमधील नेत्यांनी परिवर्तनाची मोठी चळवळ मानली. भारतातसुद्धा असाच भडका उडवून अनागोंदी माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. लडाखमध्ये सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादेखील ‘जेन झी’ आंदोलन असे नाव देण्याचा प्रयत्न झाला. परंतु, नेपाळमध्ये ज्या पद्धतीचा उद्रेक पाहायला मिळाला, तसा उद्रेक भारत सरकारने आणि लेह पोलिसांनी होऊ दिला नाही. खरंतर तरुणांनी पुकारलेली चळवळ ही सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी महत्त्वाची वाहक मानली जाते. मात्र, हीच ऊर्जा योग्य दिशेने न वळल्यास ती समाजासाठी विध्वंसक ठरू शकते. असेच काही नेपाळ आंदोलनानंतर घडल्याचे पाहायला मिळाले.
 
आंदोलनादरम्यान उसळलेला व्यापक हिंसाचार, तोडफोड आणि अराजकतेमुळे नेपाळला तब्बल ८४.४५ अब्ज नेपाळी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. नेपाळमध्ये सुरू झालेली ‘जेन झी’ चळवळ सुरुवातीला बेरोजगारी, महागाई, राजकीय अस्थिरता आणि भ्रष्टाचाराविरोधातील असंतोषातून जन्माला आली. तरुणांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळावे, अशी या चळवळीची मूळ संकल्पना होती. मात्र, कालांतराने या आंदोलनाला टोकाचे वळण लागले. सोशल मीडियावरील भडकाऊ पोस्ट, अफवा आणि जाहीर आवहानांमुळे मोठ्या प्रमाणावर तरुण रस्त्यावर उतरले. आंदोलन हळूहळू हिंसक बनत गेले. सरकारी कार्यालये, खासगी मालमत्ता, वाहने, दुकानांची तोडफोड झाली. या हिंसाचाराचा फटका थेट नेपाळच्या अर्थव्यवस्थेला बसला. आधीच नाजूक अवस्थेत असलेली नेपाळची अर्थव्यवस्था या अराजकतेमुळे अधिकच खिळखिळी झाली. सध्या आलेल्या आकडेवारीनुसार, ८४.४५ अब्ज नेपाळी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. परंतु, हे केवळ आर्थिक नुकसानीपुरते मर्यादित नाही, तर त्याचबरोबर हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. आंदोलन भ्रष्टाचाराविरोधात केले. मात्र, त्यामुळेच हजारो युवकांना त्यांच्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या. एकूणच, देशाच्या विकासाला खंड पाडणारी खोल जखम झाली. विशेष म्हणजे, या सगळ्या आंदोलनानंतर ज्या तरुण पिढीकडून देशाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा होती, तीच पिढी देशाच्या आर्थिक विध्वंसाचे कारण बनली.
 
आपल्या शेजारी देशात घडणार्‍या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतातील ‘जेन झी’चा विचार केला, तर याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळते. भारतातील ‘जेन झी’देखील प्रश्न विचारतात, व्यवस्थेवर टीका करतात. मात्र, त्याच वेळी ते देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारी यांचे उत्तम संतुलन साधताना दिसतात. नवीन उद्योग, तंत्रज्ञान, संरक्षण, क्रीडा, कला, राजकारण अशा विविध क्षेत्रांत भारताचे ‘जेन झी’ देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावून भारतगौरव वाढवणारी कामगिरी करत आहेत. याचे सर्वात ताजे आणि ठळक उदाहरण म्हणजे, भारतातील सर्वात तरुण आमदार मैथिली ठाकूर. लोकसंगीत, अभंग, भजन आणि शास्त्रीय गायनातून मैथिलीने भारतीय सांस्कृतिक परंपरेचा आवाज भारतातच नव्हे, तर जगापर्यंत पोहोचवला. भारतातील तरुण पिढी तिच्यामुळे देशाच्या पारंपरिक मार्गावर येण्यास मदत झाली.
 
तिच्यातील हेच गुण हेरून भारतीय जनता पक्षाने तिला वयाच्या २५व्या वर्षी बिहार विधानसभेचे तिकीट दिले. तिने तिच्या योग्य नियोजनाच्या आधारे रचनाबद्ध पद्धतीने निवडणूक जिंकूनदेखील दाखवली. तिचा आध्यात्मिक साधनेतून राजकारणी होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. असेच आणखी एक नाव म्हणजे डी. गुकेश. वयाच्या १९व्या वर्षी बौद्धिक क्षेत्रात भारताचा झेंडा उंचावण्याचे काम या ‘जेन झी’ने केले. गुकेशने दाखवून दिले की, भारतीय तरुणांची बौद्धिकक्षमता आजही जगात सर्वोच्च आहे. अशीच एक भारतीय वैदिक परंपरा देवव्रत रेखे याने ‘दण्डक्रम विक्रमादित्य’सारखी उपाधी मिळवून सिद्ध केली. शीतल देवी हिने अपंगत्वावर मात करून ‘पॅराआर्चरी’मध्ये जागतिक स्तरावर यश मिळवले. वेदांत माधवन याने जलतरण क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल केले. ‘जेन झी’ ही कोणत्याही देशाची ताकद असते. तीच ताकद विध्वंसाकडे वळली, तर नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होते आणि तीच ताकद सर्जनशीलतेकडे व राष्ट्रउभारणीकडे वळली, तर भारतासारखी प्रगती साधता येते. म्हणूनच, तरुणांच्या ऊर्जेला योग्य दिशा देणे, हेच आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आणि गरज आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0