गजेंद्र अहिरेंचा नवा चित्रपट; ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’

16 Dec 2025 18:32:18

मुंबई :  लेखक-दिग्दर्शक-गीतकार गजेंद्र अहिरे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी नवी कलाकृती घेऊन आले आहेत. नाविन्यपूर्ण विषय संवेदनशीलतेने आणि मनोरंजनाच्या चौकटीत मांडण्याची खास ओळख असलेल्या अहिरे यांचा नवा चित्रपट ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’ या वेगळ्या आणि लक्षवेधी शीर्षकासह येत आहे. शीर्षकावरून ही एक प्रेमकथा असल्याचं स्पष्ट होत असलं, तरी या कथेतली नाट्यमय वळणं प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी असतील, असा अंदाज बांधला जात आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढली आहे.

'नीळकंठ मास्तर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अक्षर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्मात्या पायल पठारे आणि मेघमाला पठारे यांनी 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गजेंद्र अहिरेंसारख्या सर्जनशील दिग्दर्शकाच्या हाती या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपविण्यात आली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'चे पहिले पोस्टर नुकतेच एनसीपीएमध्ये प्रदर्शित करण्यात आले. पोस्टर प्रकाशन सोहळ्याला अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याखेरीज दिग्दर्शक, निर्माते व कलाकार-तंत्रज्ञांची संपूर्ण टिम उपस्थित होती.

प्रेम, मैत्री, गुन्हा आणि त्यागाची आगळीवेगळी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळेल. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन गजेंद्र अहिरे यांनीच केले असून, चित्रपटातील गीतांना संगीतसाजही त्यांनीच चढवला आहे. गजेंद्र अहिरे यांनी नेहमीच आपल्या चित्रपटांद्वारे नवनवीन विषय प्रेक्षकांसमोर आणले आहेत. 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'च्या माध्यमातून ते एक अनोखी प्रेमकथा घेऊन आले आहेत. प्रेमकथेला सुमधूर गीत-संगीताची किनारही जोडली आहे. या चित्रपटाद्वारे एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यांची केमिस्ट्री लक्ष वेधणार आहे.

ऋषिकेश वांबूरकर, कश्मिरा, अमित रेखी, रिषी आणि अभिजीत दळवी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. पं. शौनक अभिषेकी, आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांनी 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'मधील गाणी गायली आहेत. डिओपी कृष्णा सोरेन यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून, ओमकार आर. परदेशी यांनी संकलन केले आहे. प्रशांत जठार आणि मंगेश जोंधळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, लाइन प्रोड्युसर सूर्यकांत वड्डेपेल्ली आहेत. दिप्ती जोशी आणि कश्मिरा यांनी नृत्य दिग्दर्शन, तर नाना मोरे आणि राजू येमूल यांनी कला दिग्दर्शन केले आहे. रंगभूषा निकिता निमसे यांनी केली असून, पार्श्वसंगीत चैतन्य आडकर यांनी दिले आहे.

Powered By Sangraha 9.0