मुंबई : (Bondi Beach shooting) ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यातील सिडनी येथील बाँडी बीचवर दोन हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या चकमकीत यापैकी एकजण ठार झाला असून तिथल्या स्थानिक फळविक्रेत्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दुसऱ्या हल्लेखोराला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे अनेक जीव वाचल्याचे समोर आले आहे.
फळविक्रेत्याची हिंमत आणि मोठी जीवितहानी टळली!
रविवारी संध्याकाळी बाँडी बीचजवळच्या पार्कमध्ये ज्यू समुदायासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'हनुका'चा पहिला दिवस साजरा करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने ज्यू नागरिक एकत्र आले होते. संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास नवीद अक्रम व साजिद अक्रम हे दोन हल्लोखोर पिता-पुत्र बीच परिसरात दाखल झाले. एका छोट्या पुलावर चढून दोघांनी समोर जमलेल्या ज्यू समुदायावर अंदाधुंद गोळीबार सुरू केल्यानंतर अहमद अल अहमद नावाच्या एका फळविक्रेत्याने नवीदवर पाठीमागून झडप घातली आणि त्याला जमिनीवर पाडले, त्याच्या हातातून बंदुक हिसकावून घेतली आणि त्याला आणखी गोळीबार करण्यापासून रोखले.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी हल्ल्यासाठी तब्बल ६ बंदुका बरोबर आणल्या होत्या. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १० मिनिटे हा गोळीबार सुरू होता. कदाचित आणखी लोकांचे प्राण जाऊ शकते असते, मात्र अहमद यांच्या प्रसंगावधानामुळे ते टळल्याचं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे. यासंदर्भातला व्हिडीओदेखील व्हायरल होऊ लागला आहे. तो तेथील स्थानिक रहिवासी असून त्याचे फळांचे दुकान आहे. दहशतवाद्याला पकडताना त्याला २ गोळ्या लागल्या. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.