संतसंगतीने उमज

14 Dec 2025 12:44:49

Yashwantrao Lele
 
‘जें का रंजलेंगांजले| त्यासि ह्मणे जो आपुलें॥ तोचि साधु ओळखावा| देव तेथेंचि जाणावा॥’ या अभंगाशी ज्यांचे जीवनकार्य तंतोतंत जुळते, अशा ‘ज्ञान प्रबोधिनी’च्या यशवंतराव लेले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे कार्य प्रत्येकाच्या आयुष्यात तिमिरातून तेजाकडे नेणारे ठरले. अनेकांना त्यांनी दाखवलेल्या मार्गामुळे जीवनध्येय मिळाले. संतांच्या अभंगांतून मार्गदर्शन हा यशवंतरावांचा नित्यक्रम. संतशिकवण खर्‍या अर्थाने जगलेल्या यशवंतराव लेले यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
ज्ञान प्रबोधिनीच्या वर्षारंभ उपासनेमध्ये सोहिरोबांचे एक भजन आहे. ‘हरिभजनाविण काळ घालवू नको, रेख ज्ञानार्जनाविण काळ घालवू नको.’ ‘रेख’ अर्थात ‘मानवी जीवनाचे सार्थक करायचे असेल, तर परमेश्वराची उपासना आणि ज्ञानाची साधना हे निरंतर चालूच राहिली पाहिजे.’ त्याच अभंगात पुढे सोहिरोबा म्हणतात, ‘संतसंगतीने उमज, आणुनी मनी पुरते समज अनुभवावीण मान डोलवू नको रेख.’ म्हणजेच, संतांच्या संगतीत राहून ज्ञान आणि अनुभव मिळवणे, हे श्रेयस्कर आहे. खराखुरा अनुभव आल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला उगीचच स्वीकारू नकोस.
 
आदरणीय यशवंतराव लेले हे एक असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांच्या संगतीमुळे शेकडो लोकांची जीवनाविषयीची आणि राष्ट्रकार्याविषयीचीही समज आणि उमज दोन्हीही उजळून निघाले. त्यांच्याविषयी लिहायचे म्हणजे, बिलोरी काचांनी भरलेल्या रंगदर्शकाबद्दल लिहिण्यासारखे आहे. त्यांच्या अत्यंत ऋजू, तरीही अतीव निग्रही वृत्तीबद्दल लिहावे की, त्यांनी असंख्यांमध्ये पेरलेल्या इतिहासाविषयीच्या सार्थ अभिमानाबद्दल लिहावे? कोणत्याही अभिनवेशाशिवाय केवळ तथ्यांना समोर ठेवून स्वतःच्या सखोल अभ्यासातून मांडलेल्या विचारांबद्दल लिहावे की, भेटलेल्या प्रत्येकच व्यक्तीवर तिच्यातील ईश्वरी अंश जाणून घेत केलेल्या स्नेहवर्षावाबाबत लिहावे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-ज्ञान प्रबोधिनी-स्वरूपवर्धिनी या त्यांच्या कार्यतीर्थांमध्ये, अत्यंत शांतपणे सातत्याने त्यांनी केलेल्या मूलभूत कामाबद्दल लिहावे?
 
स्वातंत्र्यपूर्व काळात १९३० मध्ये मिरजेला जन्मलेल्या यशवंतरावांचे माध्यमिक शिक्षण वाईला झाले. तेथेच त्यांच्या मनात स्वयंसेवी कामाची रुजवात झाली. संघशाखेवर नियमितपणे जाण्यातून कौटुंबिक वारशापेक्षा वेगळा, पण मनाला ओढ लावणारा विचार त्यांनी आत्मगत केला. एकीकडे अर्थार्जन करत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. प्रापंचिक जीवनात खडतर दिवस असतानाही, संघबंदी सत्याग्रह सहभागामुळे झालेला तुरुंगवासही सोसला. त्यानंतरही शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू झाल्यावर, वयाच्या पस्तिशीत पुण्यातील सुप्रसिद्ध शाळेतील पूर्ण वेळ कायमस्वरूपी असलेली नोकरी सोडून, आप्पांच्या ‘ज्ञान प्रबोधिनी’च्या आगळ्यावेगळ्या स्वप्नासाठी झोकून देण्याचा अत्यंत धाडसी निर्णय त्यांनी घेतला.
 
प्रबोधिनीच्या स्थापनासभेपासूनच यशवंतराव प्रबोधिनीची कार्यसंहिता लिहिण्यात नुसते सहभागी नव्हे, तर ते अग्रेसरही होते. संघाने घडवलेल्या त्यांच्या चित्तवृत्तीला, ‘ज्ञान प्रबोधिनी’चे भव्य स्वप्न जणू भावी कर्मभूमी म्हणून स्वीकारावेसे वाटले असणार. त्यानंतर परिवारातील अनेक संस्थांवर सल्लागार-अधिमित्र-पालक अशा भूमिकांमधून त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि स्नेहाचा वर्षाव केला असला, तरी ‘ज्ञान प्रबोधिनी’ हेच त्यांचे मुख्य कार्य माध्यम राहिले. प्रबोध शाळेच्या प्राथमिक चाचपणीनंतर जेव्हा ‘ज्ञान प्रबोधिनी’ची पूर्णवेळ प्रशाला सुरू झाली, तेव्हा यशवंतराव पहिले प्राचार्य बनले. व्यवस्थापन-शिस्त-शिक्षणाचे संतुलन आणि विद्यार्थ्यांचे कल्याण यांच्या पलीकडे जाऊन ते, मुलांचे प्रेरणास्रोत बनले. इतिहासाचे अवजड ओझे पेलत आणि त्यावर स्वार होत भविष्याची स्वप्ने कशी बघावीत, हे त्यांनी मुलांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या मुखातून इतिहास शिकणे, म्हणजे जणू काही कालकूपीतून त्या त्या काळात जाऊन तो प्रत्यक्ष अनुभवण्यासारखेच असे. त्याही पलीकडे त्या इतिहासाचा आजच्या सामाजिक परिस्थितीशी कसा संबंध आहे, यावरील त्यांचे चिंतन विद्यार्थ्यांच्या मनात व्यापक अशी राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणारे असे.
 
प्रबोधिनीच्या प्रार्थनेत म्हटले आहे, ‘अभ्यास देश स्थितीचा समतोल चाललो.’ तो अभ्यास निरंतर आणि प्रत्यक्ष अनुभवावर घेतलेला असावा, यासाठी प्रबोधिनीत अभ्यास दौर्‍यांची जी अखंडित परंपरा सुरू झाली, त्याची मुहूर्तमेढ यशवंतरावांच्या ६०च्या दशकातील ईशान्य भारताच्या दौर्‍याने रोवली गेली, असेच म्हटले पाहिजे. त्यानंतरही विवेकानंद शिला स्मारकाच्या निर्मितीनिमित्ताने, भूकंप-वादळ अशा आपत्तींवेळच्या मदतकार्याच्या निमित्ताने हा समतोल अभ्यास, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी अनुभवला. खेड शिवापूरला युवक-युवतींच्या समवेत केलेले दारूबंदी आंदोलन असेल किंवा ग्रामीण मुलांसाठी उभारलेले कृषितांत्रिक विद्यालय असेल, त्यांच्यामुळे अनेकांच्या मनात कार्यप्रेरणेचे झरे वाहते झाले. १९९० नंतर प्रामुख्याने प्रबोधिनीच्या संस्कृत-संस्कृती संशोधिकेचे विभाग प्रमुख म्हणून आणि नंतर मार्गदर्शक म्हणून त्यांनी, दीर्घकाळ अत्यंत मूलगामी काम केले. हिंदू जीवनपद्धतीतील सर्व संस्कारांचे अर्थपूर्ण विवेचन व कालानुरूप मांडणी करण्यासाठी धर्म निर्णय मंडळाने जे काम सुरू केले होते, त्याला एक आखीव-रेखीव चौकट आणि प्रसाराची गती देण्याचे मोठे काम यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली झाले. ‘ज्ञान प्रबोधिनी’प्रणित संस्कारांच्या पोथ्यांच्या साहाय्याने समाजातील सर्व स्तरांमध्ये व गटांमधील पुरोहित तयार व्हावेत, यावर त्यांचा विशेष कटाक्ष होता.
 
यशवंतरावांचा आणि माझा जवळून परिचय ८०च्या दशकात, मी शिवापूरला पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून रुजू झाले, तेव्हा झाला. यशवंतराव आमचे केवळ वरिष्ठ नव्हते, तर खर्‍या अर्थाने पालकच होते. रोज सकाळच्या ६.१५च्या उपासनेपासून ते कामासाठी बाहेर पडण्यापूर्वी प्रत्येकाने दूध-न्याहारी घेतली आहे ना, सर्वांचे दैनंदिन व साप्ताहिक निवेदन नियमितपणे होते आहे ना, याकडेही त्यांचे बारकाईने लक्ष असे. मी व माझी सहकारी मैत्रीण संगीता रानडे गावोगावी कीर्तनाच्या माध्यमातून, काही विषयांवर प्रबोधनात्मक मांडणी करत असू. त्यासाठी लागणारे संदर्भ मिळवण्याची हक्काची जागा म्हणजे यशवंतरावांबरोबरच्या गप्पा. आज मी जे व्यसन परावृत्तीसाठीचे काम ‘ज्ञान प्रबोधिनी’च्या माध्यमातून करू शकते, त्याचे मूळ त्यावेळी त्यांनी मला करायला सांगितलेल्या ‘पापाची वासना नको दावू डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी’ या अभंगावरील कीर्तनामध्ये व त्यासाठी योजलेल्या कच-देवयानीच्या आख्यानामध्ये आहे, असे मला वाटते.
 
आसपासच्या निसर्गातीलच साहित्याच्या मदतीने शुभेच्छापत्रे बनवणे, ही त्यांची खासियत. शिवापूरच्या परिसरामध्ये हिरवाईला काही तोटा नव्हता. छोटी छोटी रानफुले, वेगवेगळ्या आकाराची पाने पुस्तकांमध्ये दाबून ठेवली की, त्यातूनच सुरेख शुभेच्छापत्र करता येते, हे यशवंतरावांकडूनच छोट्या छोट्या निमित्ताने मिळालेल्या त्यांच्या रेखीव अक्षरांत लिहिलेल्या आत्मीय शुभेच्छापत्रांमुळे समजले. हिंदुत्वाइतकाच स्त्रीशक्ती प्रबोधन हा देखील यशवंतरावांच्या जिव्हाळ्याचा विषय. युवती विभागातील प्रत्येकीच्या मनात त्यांनी व्यक्त केलेल्या स्त्रीशक्तीबद्दलच्या कल्पना आणि स्वप्ने खोलवर ठसली आहेत.
 
‘समतोल’ हे नियतकालिक जेव्हा ‘स्त्रीशक्ती प्रबोधन’ दिशेचे प्रकाशन म्हणून करायचे ठरवले, तेव्हा त्याचे सूत्र वाय काय असावे, हे विचारण्यासाठी यशवंतरावांसमोरच बसलो. काही क्षणांतच त्यांच्या हस्ताक्षरातील अत्यंत अर्थपूर्ण सूत्र वाय, सहजपणे आमच्यासमोर आले. स्त्रीशक्तीच्या प्रबोधनाचे ‘ध्येय आपुले संतुलनाचे, समन्वयाचे, सहभागाचे, समुन्नतीचे सुखवृद्धीचे’ या चार ओळींमधून, स्त्रीशक्ती प्रबोधनाचे केवढे व्यापक दिशादर्शन यशवंतरावांनी आमच्यासमोर ठेवले. समतोलच्या एका दिवाळी विशेषांकामध्ये विदेशातून भारतात येऊन संपूर्णपणे भारतीय झालेल्या आठ विदुषी तथा साधिकांवर त्यांनी लिहिलेला लेख, एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून गणता येईल, इतका सुरेख आहे.
 
त्यापलीकडे वेळोवेळी स्त्रीशक्ती प्रबोधनाच्या कामात, रचनात्मक कामाइतकाच अन्यायाचा प्रतिकारही कसा आला पाहिजे, हे पण तितकेच आग्रहाने मांडले. ‘मुलींवर अत्याचार होतात म्हणजे काय? असे घडतेच कसे? मुलींच्या मनगटांमध्ये ताकद आणण्यासाठी आपण काही करणार की नाही?’ असे त्यांनी तळमळून विचारलेले प्रश्न, आजही मनात गुंजत आहेत. युवती विभागाने एका उपक्रमात चालवलेल्या कराटे प्रशिक्षणाबद्दल त्यांना जेव्हा कळले, तेव्हा त्यांनी व्यक्त केलेला आनंद स्मरणात आहे.
 
इतिहासाइतकाच भाषाशुद्धी हाही त्यांचा जिव्हाळ्याचा आणि आग्रहाचा विषय. मराठी बोलत असाल, तर शुद्ध मराठीत बोला-इंग्रजीत बोलायचं असेल, तर शुद्ध इंग्रजीत बोला आणि जिथे जे आवश्यक आहे, तीच भाषा वापरा, असा त्यांचा आग्रह असे आणि तो ते स्वतः तंतोतंत पाळत. एका आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संदर्भातील माझे अनुभवकथन प्रबोधिनीमध्ये योजले होते, त्याला यशवंतरावही उपस्थित होते. अर्थातच एरव्ही अफाट वेगाने धावणारी माझी बोलण्याची गाडी, खूपच मंदावली होती. यशवंतराव समोर असल्यामुळे डोयात येणार्‍या एकेका इंग्रजी शब्दाला खड्यासारखे मनातच वेचून, त्याच्यासाठी मराठी प्रतिशब्द योजणे आणि मगच बोलणे, असा एक समांतर प्रवाह चालू होता. सादरीकरण संपल्यावर यशवंतरावांना भेटले तेव्हा ते म्हणाले, "आज खूपच शुद्ध बोललात; तरीसुद्धा अमूक अमूक शब्दांना तुम्हाला मराठी प्रतिशब्द सूचायला हवे होते. काय ते मी सांगतो,” असे म्हणून त्यांनी माझ्या भाषणाचे शुद्धीकरण पूर्ण केले. अर्थातच, त्यांचे हे सांगणेसुद्धा इतके आर्जवाचे असायचे की, त्याप्रमाणे न वागलो तर आपणच उद्धट ठरू, अशी मनामध्ये खात्री असायची.
 
ज्या ज्या संघटनांशी त्यांचे संबंध होते, तेथील कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक स्वास्थ्याबद्दल त्यांना अतिशय आस्था असायची. अनेकदा विविध कारणांमुळे अशा कार्यकर्त्यांच्या कुटुंबात जर काही अधिक-उणे घडले, तर त्या सदस्यांपेक्षा यशवंतरावांना झालेला लेश अधिक असायचा. "कार्यकर्त्यांनी आपली कुटुंबेपण अतिशय काळजीने जपायला हवीत. काय बरं करता येईल? तुम्ही समुपदेशनाचे काम करता ना? मग प्रबोधिनीमध्ये अशी एखादी वेगळी समुपदेशनाची जागा तुम्हाला काढता येईल का, की जिथे अशा सदस्यांना येऊन मोकळेपणाने बोलता येईल?” ते मला सांगत. आपल्या पुढच्या पिढीला सामाजिक काम करत असताना, मानसिक शांतीपण मिळाली पाहिजे आणि त्यासाठी स्वभावातले अधिक-उणेपण ओलांडता आले पाहिजे, याबद्दलची त्यांची सजगता आणि पुढाकार मला विलक्षण वाटतो.
 
विजया लवाटे या पुण्याच्या बुधवार पेठेत नर्सिंगचं काम करणार्‍या कार्यकर्त्या. तेथील देहविक्रय करणार्‍या महिलांसाठी विजया यांनी खूप काम केले. त्यांच्या मुलांना उजळ भविष्य मिळावे, यासाठी त्यांनी ‘नीहार’ या संस्थेची स्थापना केली. ‘ज्ञान प्रबोधिनी’च्या युवती विभागाने विजया यांना या कामात काही ना काही साहाय्य करावे, असे यशवंतरावांनी सूचविले. त्याला प्रतिसाद म्हणून दोन कार्यकर्त्यांनी, तेथील महिलांच्या मुलींसाठी ‘पालवी’ नावाने गोष्टी, गप्पा, गाणी, खेळ आणि कौशल्य यांचा समावेश असलेले छोटेसे शिबीर घेतले. काही काळ चालल्यावर तो उपक्रम वेगवेगळ्या कारणांनी खंडित झाला, याची यशवंतरावांना खंत वाटे. स्त्रीशक्ती प्रबोधनाचा ‘संवादिनी’ हा शहरी महिलांचा स्वयंसेवी गट २००० मध्ये सुरू झाल्यावर कोणते उपक्रम करावेत, अशी चर्चा झाली. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा या कामाचा क्रम वर असला पाहिजे, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद म्हणून संवादिनीने ‘पालवी’ उपक्रम, पुण्याच्या त्याच भागातील शाळेत थोड्या वेगळ्या रुपात सुरू केला. यशवंतरावांनी आग्रह धरला नसता, तर कदाचित असा उपक्रम आम्ही कदाचित केला नसता.
 
भगिनी निवेदितांची स्मृतिशताब्दी पुण्यामध्ये २०११ मध्ये घडवून आणण्यासाठी, यशवंतरावांनी अफाट परिश्रम केले. त्यांचा स्वतःचा निवेदिता-साहित्याचा अभ्यास तर सखोल होताच, पण यानिमित्ताने अनेकांना अभ्यासाला प्रवृत्त करून त्यातून चार उत्कृष्ट पुस्तिकांची निर्मिती करण्यामागचे प्रेरक हात यशवंतरावांचे होते, हे कोण विसरेल? त्याच सुमाराला काही कौटुंबिक सहलीसाठी पश्चिम बंगालमध्ये आम्ही कुटुंबीय जाणार होतो, हे कळल्यावर ‘रामकृष्ण मिशन’च्या संस्कृती अभ्यास केंद्रामध्ये एका नियतकालिकात अप्पांनी निवेदितांवर लिहिलेला एक लेख आहे त्याची प्रत मिळवून आणा, असा प्रेमळ आदेश त्यांनी मला केला. चिकाटीमध्ये यथा-तथा असणार्‍या माझ्याकडून केवळ यशवंतरावांचा शब्द आपण नाही मोडला पाहिजे, या भावनेतून ते काम घडून गेले.
 
प्रबोधिनीच्या विवाह संस्कारामध्ये कालोचितता आली पाहिजे, त्यामुळे कन्यादानाऐवजी आपल्याला दुसरे काही करता येईल का? असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर अतिशय सहजपणे "काहीच हरकत नाही. नवीन पिढीने उलट यावर विचार करून जे जे कालबाह्य वाटते, ते बदलायलाच हवे. तुम्ही सांगा, काय बदल करायला हवेत? पण जे बदल करू त्याला काहीतरी विचारांचे अधिष्ठान असले पाहिजे, याची खातरजमा करा,” इतक्या साध्या सोप्या सूत्राने त्यांनी संस्कार पुनर्रचनेबाबतीतला त्यांचा दृष्टिकोन माझ्यापर्यंत पोहोचवला. इतकेच नाही, तर त्या विवाह संस्काराच्या पोथीत कुठे काय कथा यायला पाहिजेत, सहजीवनाचा कर्मकांडापल्याडचा दृष्टिकोन वधू-वरांमध्ये निर्माण होईल, यासाठी पुरोहितांनी कुठे आग्रहाने काय म्हटले पाहिजे, असे अनेक पैलू त्यांनी सांगितले.
 
इतरांचे भरभरून कौतुक करणारे यशवंतराव, त्यांच्याबद्दल कोणी काही जिव्हाळ्याने आणि आदराने व्यक्त होऊ लागले की अत्यंत संकोचून जात. त्यांच्या एक्काहत्तरीचा कार्यक्रम त्यांना न सांगता गुपचूपच ठरवला. त्यांना अनेकजणांनी लिहिलेले एकसारख्या कागदावरचे स्वहस्ताक्षरातील स्नेहपत्राचे बाड दिले. ते घेतानासुद्धा त्यांना खूपच कठीण गेले असणार. त्यासाठी त्यांनी आम्हा कुणाला रागे भरले नाही, यातच आम्ही धन्यता मानली. त्यावेळी त्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये मी, त्यांच्याबद्दलच्या माझ्या निरीक्षणांना एका कवितेत गुंफले होते. काही दिवसांनी त्या सर्व निरीक्षणांबद्दल तितक्यात सुंदर काव्यमय शब्दांत मला, यशवंतरावांचे उत्तर मिळाले. अशी त्यांनी अनेकांना लिहिलेली अनेक पत्रे, त्या त्या व्यक्तींच्या व्यक्तीविकासाच्या वाटेवरचे प्रकाशपुंज ठरले असतील, असेच मला वाटते.
 
अनेकदा आजूबाजूला बदलत चालणार्‍या सांस्कृतिक वातावरणाविषयी विमनस्क होऊन ते म्हणत, जुने सगळे सोडून देता आणि पुढचे काही घडवत नाही, असे कसे चालेल? जे जुने नको आहे, ते का नको आहे, हे नक्की सांगा; पण त्याऐवजी काय हवे आहे आणि ते का योग्य आहे, याबद्दलची तर्कशुद्ध मांडणी करा ना! नाहीतर, ही सगळी पिढी अशीच त्रिशंकू अवस्थेत जगणार.
वयाच्या उत्तरार्धामध्ये ८०च्या घरात असताना त्यांना कर्करोगाने गाठले; पण तेव्हाही ‘विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी’ या समर्थ रामदासांच्या उक्तीला जागून त्यांनी, सर्व उपचार अत्यंत सहजभावाने स्वीकारले. इतकेच नाही, तर त्यातून यशस्वी पुनरागमन केल्यानंतर एकदाही त्या सगळ्या काळातील लेशांचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात कधीच आला नाही.
 
संघ परिवारातील एका रुग्णालयाच्या विश्वस्तांशी बोलताना संपूर्ण समर्पण म्हणजे काय, यासाठी मिशनरी वृत्तीचे त्यांनी उदाहरण दिले होते. नव्याने जात असणार्‍या मिशनर्‍याने ज्येष्ठ व्यक्तीला विचारले, "मी ज्या निबीड अरण्यात जात आहे, तिथे माझ्या सुरक्षेचे काय?” ज्येष्ठाने उत्तर दिले, "तुला सुरक्षा हवी असेल, तर शवपेटीत जाऊन निज. सर्वोत्तम सुरक्षा तेथेच आहे.” कार्यकर्त्यांनी इतक्या टोकाचे समर्पण व्रत घेतल्याशिवाय हवा तो बदल कसा घडेल, हा त्यांचा मुद्दा होता, जे त्यांनी स्वतः जागून दाखविले. खरोखरच पसायदानामध्ये म्हटल्याप्रमाणे ‘मार्तंड जे तापहीन’ असे तळपणे म्हणजे काय, ते यशवंतरावांसारख्या व्यक्तींच्या रूपाने सामोरे येते, तेव्हा केवळ भाग्याने अशा संतसंगतीने आपल्याला काहीतरी उमज पडली असेल, याची जाणीव होऊन मन कृतज्ञतेने भरून जाते.
 
यशवंतरावांना चाफ्याची फुले अतिशय आवडत. त्यांच्या अनेक कार्यालयांपैकी एका ठिकाणी त्यांच्या मेजाशेजारीच चाफ्याच्या झाडाची फांदी खिडकीतून आत येत असे. त्यावरची सोनेरी दळदार फुले त्यांच्यासमोर एका तांब्याच्या छोट्या वाटीमध्ये पाण्यात घालून ठेवलेली असत. त्यांना भेटायला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्या चाफ्याचा आणि यशवंतरावांसमवेतच्या संवादाचा सुगंध एकदमच लाभत असे. चाफ्याच्या फुलांना जसे काही द्रावणात घालून दीर्घ काळ टिकण्यासाठी बंदिस्त करून ठेवतात, तसेच यशवंतरावांच्या तेजाळ स्मृती आपल्या सर्वांच्या मनाच्या कुप्यांमध्ये सदैव ताज्या राहतील. त्यांच्या निरभिमानी अभिनवेशमुक्त आणि तरीही अत्यंत प्रेरक-प्रभावी व्यक्तिमत्त्वाला शतशः प्रणाम!
 
- अनघा लवळेकर
 
 
Powered By Sangraha 9.0