आज देशात वित्तीय समायोजन मोठ्या प्रमाणात होत असून, सहकार क्षेत्रातील बँकांनाही उत्तम दिवस आले आहेत. मात्र, एक काळ असा होता की, सहकार क्षेत्रातील बँकांना प्रचंड कष्ट उपसावे लागत होते. या काळात संस्था आणि कर्मचारी यांच्या हितासाठी जगलेल्या नंदकिशोर देवधर यांचे दि. २७ नोव्हेंबर रोजी वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले. जनता बँकेच्या अडचणीच्या काळात बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी भरीव योगदान देणारे नंदकिशोर देवधर, बँकेतून उपमहाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले. विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष, ज्येष्ठ स्वयंसेवक आणि कट्टर हिंदुत्वनिष्ठ म्हणूनही ते सुपरिचित होते. त्यानिमित्ताने नंदकिशोर देवधर यांच्या कार्यस्मृतींना उजाळा देणारा हा लेख...
नंदकिशोर तथा नंदू देवधर. जन्म पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील पारगाव या गावी दि. १ ऑगस्ट १९५२ रोजीचा. शालेय शिक्षण म्हणजे त्या वेळेचे अकरावीपर्यंत तेथेच झाले. लहानपणापासून शेतीची आवड असल्याने, कष्ट करण्याची सवय व ग्रामीण सहवासात राहण्याचा आग्रह होता. परंतु, नोकरी आणि गावाकडे कोणी भाऊ राहून शेती करण्यास तयार नसल्याने वडिलांनी सर्व जमीन-जुमला विकून, मुलांस-मुलींस त्यांचा त्यांचा वाटा देऊन ते मोकळे झाले. तसे पाहिले तर, नंदकिशोर यांचे लहानपण आईच्या प्रेमळ सहवासात व वडिलांच्या अत्यंत शिस्तीमध्ये गेले. वडिलांचे घराणे हे कट्टर काँग्रेसवादी. पुण्यात पुढील शिक्षणासाठी आल्यावर नंदकिशोर यांचा मुक्काम, त्यांच्या मामांच्याकडे शनिवार पेठेतल्या मोतीबागेजवळ असे. त्याचवेळी त्यांचा संघाशी संबंध आला. नंदकिशोर यांचे मामा हे पक्के सावरकरनिष्ठ व हिंदुत्ववादी विचारसरणीचे. त्यातून पुण्यात आल्यावर नंदकिशोर आम्हा मंडळींबरोबर बरोबर राहून, ते अधिकच कट्टर संघवादी झाले. त्यात भर म्हणून सासूरवाडीही कट्टर संघ-जनसंघाची मिळाली. नंदकिशोर यांच्या घरातील वातावरणामध्ये हे तिन्ही भिन्न विचारसरणीचे लोक हसत खेळत राहात होते. आम्ही दोघे एकाच दिवशी बँकेत नोकरीस सुरुवात केली.
तेव्हापासून नंदकिशोर यांच्याशी मैत्री होत गेली. आम्ही बँकेमध्ये कधीही एकत्र काम केले नाही; परंतु बँकेच्या कर्मचारी संघटनेच्या स्थापनेमध्ये ज्यांचा पुढाकार होता, त्यामध्ये प्रामुख्याने नंदकिशोर देवधर यांचे नाव येतेच! आम्ही जवळजवळ एकूण १४ जण एकाच दिवशी रुजू झालो होतो. १९७४ पूर्वीसुद्धा अनेकजणांनी बँकेत कर्मचारी संघटनेच्या स्थापनेचे प्रयत्न केले होते. आम्हीसुद्धा रुजू झालो, त्यावेळेला बँकेमध्ये ‘भारतीय मजदूर संघा’शी संलग्न अशी आमची कर्मचारी संघटना होती. परंतु, त्यास कायदेशीर मान्यता नसल्याने व्यवस्थापन त्यास दाद देत नसे आणि बँकेमध्ये मी असेपर्यंत संघटना-युनियन नको, असा टोकाचा आग्रह त्या वेळेचे माननीय कार्यकारी संचालक दत्तोपंत जमदग्नी यांचा होता. त्याकाळी त्यांचा दराराही प्रचंड होता. ‘जनता बँक म्हणजे जमदग्नी यांचीच बँक ना?’ असे अनेकजण विचारत. सहकार क्षेत्रात बँकेस दुसर्या-तिसर्या क्रमांकावर नेण्यात, त्यांचा निश्चितच फारच मोठा वाटा.
दत्तोपंत जमदग्नी यांचा कालावधी संपल्यावर माननीय काकतकर हे कार्यकारी संचालक झाले, त्यावेळी संचालक मंडळावरही प्रामुख्याने माननीय वसंतराव आपटे व माननीय भानुदास किराड निवडून आले. यांच्या कालावधीत पुन्हा एकदा कर्मचारी संघटनेच्या स्थापनेचा विचार सुरू झाला. त्यात प्रामुख्याने विजय देवळकर मी स्वतः, रवींद्र घाटपांडे आणि देवधर डोंगरे, सुहास जोशी, उल्हास जोशी, सुंदर गायकवाड इ. यांनी एकत्र विचार-विनिमय करून, बँकेच्या कर्मचार्यांचेच संघटनेवर नियंत्रण राहील, अशी रचना असणारी ‘स्टाफ वेल्फेअर असोसिएशन’ या संघटनेची स्थापना केली. यात नंदकिशोर देवधर यांची, अध्यक्ष म्हणून बहुमताने निवड करण्यात आली. त्यानंतर झालेल्या जवळजवळ सर्वच निवडणुकांमध्ये, नंदकिशोर यांना कायम सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे नंदकिशोर हे कायमसाठीच अध्यक्ष म्हणून राहावे, असाच सर्वांचा आग्रह असे. त्यांचा कालावधी ही अत्यंत स्फूर्तिदायक व सर्व कर्मचार्यांना आत्मीयतेने बांधून ठेवणारा असा राहिला.
एकीकडे कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी, तर दुसरीकडे बँकेत मॅनेजर व विविध अधिकार पदे भूषवून काम करण्याची जबाबदारी, ही अत्यंत कुशलतेने देवघर यांनी शेवटपर्यंत निभावली. संपूर्ण कार्यकालामध्ये संघटनेमध्ये व व्यवस्थापनामध्ये कधीही मनोभेद निर्माण झाले नाहीत; झाले तर ते जागच्या जागी सोडवण्यास त्यांनी प्राधान्य दिले. कायमच बँकेच्या स्थैर्याला व सुरक्षिततेला त्यांचे प्राधान्य असे ते सर्व कर्मचार्यांच्या मनामध्येही हाच विचार ते बिंबवीत. त्यामुळे पगारवाढ करताना, कधीही कर्मचारीवर्ग नाराज झाला नाही. सर्वच बँकांमध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात व आपली बँक सर्वांच्या पुढे कसे जाईल, यासाठीच सर्वांची धडपड सुरु असते.
विविध लोकांकडून ठेवी गोळा करणे व त्या ठेवींचे योग्य नियोजन, कर्जवाटप करणे हे फार मोठे कौशल्याचे काम. ते काम अनेकजण अत्यंत चोखपणे पार पाडतात. यात देवधर यांचे नाव प्रामुख्याने गणले जात असे. ते ज्या ज्या शाखांमध्ये व्यवस्थापक म्हणून गेले, त्या शाखेच्या एकूण आर्थिक उलाढालीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येई. मुंबईतील फोर्ट सारख्या शाखेस बुडीत गणल्या गेलेल्या कर्जखात्यातून बाहेर काढण्यासाठी, मोठ्याप्रमाणात नंदकिशोर यांनी प्रयत्न केले. प्रसंगी मुंबईबाहेर गुजरात-चेन्नईसारख्या भागात जाऊन, वसुली करण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. त्यावेळी त्यांच्याबरोबर काम केलेले कर्मचारी, आजही त्यांचे कौतुक सांगत असतात. पण, संस्थेने याची फारशी दाखल घेतली नाही. विविध शाखांमधून कनिष्ठ अधिकारी ते उपमहाव्यवस्थापकासारख्या उच्च पदावर काम करत असता, त्यांचे पाय कायम जमिनीवरच राहिले.
मोठ्या अधिकारपदावर जबाबदारीच्या ठिकाणी काम करताना प्रत्येकजण धुतल्या तांदळासारखा असतो, असे नाही. त्यामुळे देवधरांकडेसुद्धा अनेकजण अंगुलीनिर्देश करीत. व्यक्तिशः मला तसा अनुभव कधी आला नाही, अजूनही या गोष्टीवर माझा चटकन विश्वास बसत नाही. बँकेतील व्यावसायिक-खातेदार, दिवाळीनिमित्त वा त्यांच्या व्यवसायात काही विशेष घटना झाल्यास, बँक व्यवस्थापकास भेटवस्तू देतात क्वचित पार्टीलाही घेऊन जातात, असे मी ऐकून आहे. अन्य बँकांमध्ये जशी सर्रास व्यवसायिक खातेदाराकडून मागणी केली जाते, तशी जनता बँकेत कधी केली गेली आहे, असे मला ऐकीवात नाही. बँकेतील कर्मचार्यांसाठी गृहकर्ज योजना व तीसुद्धा केवळ तीन टक्क्यांमध्ये किमान दोन वेळेला घेता येईल, अशी पद्धत मान्य करून घेण्यामध्ये संघटनेचा मोठा वाटा आहे. अर्थात व्यवस्थापनावर बरोबर वाटाघाटी करण्यात. देवधर व वाणी यांचा नेहमीच मोठा सहभाग व मार्गदर्शन लाभले आहे. पगारवाढीची मागणी करतानासुद्धा त्यात केवळ कर्मचार्यांचे हितच पाहिले जात नसे, तर संस्थेसही वाढीव वेतनाचे ओझे त्रासदायक होणार नाही असा दृष्टिकोन ठेवूनच वाटाघाटी केल्या जात. त्यातूनही बँकेच्या वृद्धीचा दृष्टिकोन जपला जात असे. याचे अन्य बँकासुद्धा अप्रुप वाटे.
एक काळ असा होता की, बँकेचा कर्मचारी हा वेतन मिळवण्यात अत्यंत इतर बँकांच्या मानाने खूपच मागे होता. परंतु बहुदा १९८१च्या वेतन करारानंतर, कर्मचार्यांस भरघोस पगारवाढ मिळत गेली. या,उळे बँकही सहकारी बँकांमध्ये क्रमांक दुसर्या व तिसर्या स्थानावर होती.आम्ही जेव्हा संघटनेमध्ये कार्यरत होतो, तेव्हा कधीही कर्मचार्यांना संप करावा लागला नाही व सर्व प्रश्न सामोपचाराने सुटले. गृहकर्जाबरोबरच कर्मचार्यांसाठी लिव्ह बँकसारख्या, नवीन संकल्पना आणण्यामध्ये देवधर यांचा वाटा फार मोठा आहे. याचा हा परिणाम म्हणजे, आज अनेक कर्मचार्यांना याचा फायदा झाला असून, यापुढेही होत राहील. कर्मचार्यांचे हित बघतानाच, सामाजिक हिताची जाणीवही कर्मचार्यांमध्ये निर्माण करण्याचे मोठे काम संघटनेने केले. एकदा दुष्काळाच्यावेळी, एका जिल्ह्यातील चारा छावणीसाठी संघटनेमार्फत सढळहस्ते मदत करण्यात आली.
कोकणामधील संगमेश्वर तालुयातील माखजन येथील एका वाडीमध्ये, पाण्याची फार मोठी अडचण होती. लोकांना डोंगर उतरून, लांबवरून पाणी आणावे लागत होते. त्यासाठी नंदकिशोर यांनी गावात पाणीपुरवठ्याचे काम सार्वजनिकरित्या करण्याचे ठरविले. गावकर्यांच्या सहकार्याने डोंगरउतारावर पाणी अडवून, एक टाकी बांधून त्यात पाणी साठवण्याची योजना आखण्यात आली. त्यातूनच गावात सार्वजनिक ठिकाणी एक नळ बसवून, पाणी सर्वांना मिळण्याची सोय करण्यात आली. त्यासाठी गावकर्यांनी ही मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले.
एखादा कर्मचारी अकाली मृत्यू पावल्यास त्याच्या कुटुंबावर जो दुर्धर प्रसंग उडवतो; त्यातून त्या कुटुंबास बाहेर काढण्यासाठी कुटुंबातीलच एखाद्या योग्य मुलास-मुलीस बँकेत समाविष्ट करून घेणेबाबतसुद्धा, नंदकिशोर यांनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला व त्यास चांगल्या प्रमाणात यशही आले. आम्ही निवृत्त झाल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की, आपण बँकेच्या कर्मचार्यांसाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या; पण निवृत्तीनंतर त्यास निवृत्तिवेतन मिळेल, अशी काही व्यवस्था उभी करू शकलो नाही. ही खंत नंदकिशोर कायम बोलवून दाखवत. त्यावेळी कार्यरत असतानाच जर ‘एलआयसी’बरोबर जोडले जाऊन निवृत्तीवेतन योजना चालू केली असती, तर आज चांगल्यापैकी सर्वांनाच त्याचा फायदा झाला असता, असो.
संघशरण वृत्तीमुळे निवृत्तीनंतरही देवधर सार्वजनिक कामात रस घेत होते. बँकेतीलच निवृत्त अधिकारी करमरकर यांबरोबर ‘विश्व हिंदू परिषदे’चे प्रांताचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी, बराच काळ काम पाहिले. त्याचवेळी पुणे मुंबई रस्त्यावरील कामशेत या गावी ‘विश्व हिंदू परिषदे’ला, दोन एकर जागा एकावृद्ध दाम्पत्याने बक्षीसपत्राद्वारे दिली होती. त्या ठिकाणी खेडेगावातील वनवासी भागातील मुलांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले व एक तंत्र ज्ञानशिक्षण केंद्र उभे केले. ते उभारताना त्याला विद्युत जोडणीच्या कामाच्या शासकीय परवानगीसाठी, तालुयातील कर्मचारी ते आमदार-खासदार-मंत्री यांच्याशी संपर्क साधत त्याची मान्यता मिळवली.
कार्यशाळेत मुलांना प्रवेश देण्यासाठी गावोगावी जाऊन पालकांच्या व तसेच हुशार विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी घेऊन, त्यांना कामशेत येथे घेऊन येण्याचे मोठे काम त्यांनी अनेक वर्षे चालू ठेवले; परंतु हे चालू ठेवण्यासाठी अपेक्षित निधीसाठीही तेच प्रयत्न करत. मात्र, यासाठी त्यांस अपेक्षित सहकार्य नसल्यामुळे ते थोडी वर्षे चालवून, नंतर ते दुसर्या संस्थेकडे सुपूर्द करावे लागले. याचा खूप मोठा धक्का त्यांस सहन करावा लागला. सन १९८३ साली सोलापूर येथे झालेल्या संघशिक्षावर्गात नंदकिशोर यांनी, प्रथम वर्षाचे शिक्षण घेतले होते. त्यावेळी मी त्यांना शिक्षक म्हणून होतो. त्यानंतर बरेचदा तो विषय निघाला की मुद्दामहून मला म्हणत, ‘या अप्पाने मला खूप छळले त्यावेळेला.’ गप्पा मारताना, अशी मजाही होत असे.
एकीकडे बँकेचे काम, तर एकीकडे संघटनेचे काम करताना घरात आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नसे. त्यामुळे घरच्यांचीही तक्रार सतत होत असे. त्यासाठी आम्ही एक शक्कल काढली. वर्षातून एकदा तरी कौटुंबिक सहल काढायचे ठरवले गेले. त्यानुसार पहिली सहल वाणी यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील ठिकाणी काढली. तेथून अजंठा-वेरूळ व पैठण या ठिकाणचाही दौरा केला. एक वर्ष रत्नागिरीमधील कर्मचारी यांनी, त्यांचे एक जिल्हा संमेलन गणपतीपुळे येथे आयोजित केले होते. तेथेही आम्ही सहकुटुंब गेलो होतो. नंतरची सहल ही कोकणात शिवथर घळ, हरिहरेश्वर, वेळणेश्वर गुहागर अशी केली. त्यामुळे अशा सहलींमुळे कुटुंबातील वातावरण छान राहण्यास मदतच झाल्याचे म्हणावे लागेल. देवधरांच्या कार्यकाळामध्ये वर्षातून एकदा बँकेच्या सर्व शाखांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कर्मचार्यांची भेट घेणे, सभा घेणे व काही अडचणी असल्यास त्याचे निवारण जागच्या जागी होईल असा प्रयत्न करणे, असे अनेक वर्षे चालू होते. त्याचबरोबर जे विभाग पाडलेले होते, त्या विभागातील प्रतिनिधीसुद्धा आपापल्या विभागातील शाखांमध्ये किमान वर्षातून एकदा जाऊन येत असत.
प्रारंभीच्या काळात संघटनेकडे मोठ्या प्रमाणावर निधी नसल्यामुळे, बरेचसे दौरे हे आम्ही मोटरसायकलवर करीत असो व राहण्याची व्यवस्था ही स्थानिक एखाद्या प्रतिनिधीच्या कर्मचार्यांच्या घरी होत असे. त्यावेळी हॉटेल खर्च हा परवडणारा नव्हता; बरेचदा वाटेमध्ये होणारा नाश्त्याचा, जेवणाचा खर्च हा सुद्धा सर्वजण मिळून करत होतो. नंतर जसा वर्गणीमधून निधी वाढला, तसा त्यामधून खर्च करीत असू. या सर्वांचा हिशोब, प्रतिवर्षी होणार्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिला जात असे. त्याचजोडीला सर्वांचे एकत्रित जेवण व एकत्रित कर्मचार्यांचे विविध गुणदर्शन, गाणे-वाद्यांचे सोलो वादन, नकला, नाट्यछटा असे कार्यक्रमही होत असत.
सार्वजनिक कार्यक्रमात ज्याप्रमाणे निवेदक निवेदन करून मग गाणे सादर करतात, तसे करण्याचाही आमचा प्रयत्न असे. यात प्रामुख्याने रवींद्र घाटपांडे यांचा फार मोठा सहभाग असे. त्यांचा तो हातखंड्याच विषय आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यावेळी बँकेचे कार्याध्यक्ष असलेले विनायकराव साठे यांनी बँकेच्या संचालक मंडळातून निवृत्ती घेण्याचे ठरविल्यावर, त्यांच्या घरी त्यांनी सर्व संचालक व असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठरविला होता. त्यावेळी बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी आम्हा सर्वांना असे सूचविले की, तुमची संघटना अशीच चांगली चालू राहू दे. ज्यावेळी संघटनेमध्ये फूट पडेल, त्यावेळी बँकेच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होऊ शकतो, इतका विश्वास एखाद्या संचालकाने कर्मचार्यांवर दाखविल्याचे उदाहरण मला तरी आढळत नाही. याचे सर्व श्रेय नंदकिशोर देवधर व वाणी यांस जाते. असे बरेच प्रसंग आज आता आठवत जातात.
अजूनही देवधर आपला सोडून गेले, हे मनास पटत नाही. गेली दोन-तीन वर्षे त्यांची प्रकृती अत्यंत कृश होत गेली. आमचे एकमेकांच्या घरी नेहमी जाणे-येणे होत असे. प्रत्येक वेळी तब्येत अधिकच खालावलेली दिसत असे. मी नेहमी विचारत असे, "काय काय कुठल्या कुठल्या डॉटरांना दाखवतोयस, घरातले सर्वजणच म्हणत असतात की त्यांचे रिपोर्ट सर्व नॉर्मल आहेत.” सहा महिन्यांनी तरी त्यांचे सर्व रिपोर्ट काढले जात असत आणि सर्व रिपोर्ट नॉर्मल असत. तरीसुद्धा तब्येत का बारीक होत आहे, हे शेवटपर्यंत समजले नाही. शेवटच्या तपासणीमध्ये न्यूमोनियामुळे पाठीमध्ये पाणी झाल्याचे लक्षात आले, ते काढल्यानंतरसुद्धा काही दिवस ‘आयसीयू’मध्ये राहून नंतर चार दिवस बाहेर खोलीमध्ये हलवल्यानंतर तब्येत सुधारली, म्हणून डॉक्टरांनी घरीसुद्धा सोडले. त्या वेळेला थोडेसे मन शांत झाले. परंतु, दोन-तीन दिवसांमध्येच पुन्हा अॅडमिट केल्याची बातमी आली. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला पुन्हा भेटण्यास जाता आले नाही. पण त्यावेळी हृदयविकाराचा झटका येऊन, त्यांनी आपला सर्वांचा निरोप घेतला. अनेकांसाठी नंदकिशोर यांचे जाणे ही धक्कादायक बातमी होती.
नंदकिशोर यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केले आहे, त्या सर्वांना तर विश्वास बसणे शक्यच नव्हते. शेवटी वैकुंठामध्ये सर्व जुने सहकारी भेटले. प्रत्येकाच्या तोंडी हाच विषय होता की, एवढा आजार लक्षात कसा काय आला नाही? आमचा अजून ते गेले आहेत, यावरच विश्वास बसत नाही. पण शेवटी नियतीने जे ठरविले असते, तेच घडते. आपण सर्व नियतीपुढे निष्प्रभ आहोत, हेच खरे! सध्याचे माणसाचे एकंदरीत आयुष्यमान पाहता, नंदकिशोर देवधर वयाच्या अवघ्या ७३व्या वर्षी आपणातून निघून जावे, याचे फार दुःख आहे. आपण सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होऊया. परमेश्वराने देवधरांच्या आत्म्यास सद्गती द्यावी, अशी प्रार्थना करून थांबतो.
- श्रीराम कुलकर्णी