निष्ठा, समर्पण आणि कार्यशीलतेचा ‘अनंत’ प्रवास

14 Dec 2025 13:26:32
Anant Rao Deshpande
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गंध ज्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात दाटलेला होता, अशा कै. अनंतराव देशपांडे यांचे जीवन म्हणजे निष्ठा, समर्पण आणि कार्यशीलतेचा एक आदर्श प्रवास होय. बालवयात रोवले गेलेले संघ संस्कार, त्यांचे सार्वजनिक, सामाजिक, नैतिक आणि व्यावसायिक जगणे घडवत गेले. अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील भव्य कामगिरी असो, अथवा संघाच्या संघटनात्मक कार्यातील योगदान; अनंतरावांनी प्रत्येक भूमिका अत्यंत कौशल्य, विनम्रता आणि राष्ट्रभक्तीने निभावली.
 
संघाभिमुख जीवनशैली स्वीकारून आपले आणि आपल्या समाजाचेही जीवन समृद्ध करणार्‍या संघ कार्यकर्त्यांच्या मांदियाळीत, कै. अनंतराव देशपांडे यांचे नाव नेहमीच अग्रेसर राहिले. अनंतरावांचा जन्म १९२७ साली पुण्यात झाला. पुण्याजवळच्या अंबरवेठ या गावी एकूण तीन भाऊ आणि सहा बहिणी असलेल्या मोठ्या कुटुंबात, त्यांचे लहानपण अतिशय आनंदात गेले. वडिलांच्या बदलीमुळे हे सारे कुटुंब १९३५ साली, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे येऊन स्थायिक झाले आणि तेथूनच अनंतरावांच्या पुढील शालेय शिक्षणास सुरुवात झाली. संस्कारक्षम वयात त्यांच्या बालमनावर छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचा ठसा उमटला होताच. अशातच, त्यांचे चुलत भाऊ तात्यासाहेब देशपांडे यांच्या पुढाकाराने, गावात पहिली संघशाखा लागली आणि १९३७ साली वयाच्या दहाव्या वर्षीच मनात संघसंस्काराचे बीज रोवले गेले.
 
शाखेत येणारे आपण सर्वच स्वयंसेवक, कोणी बाल, तर कोणी तरुण. स्वयंसेवक म्हणजे स्वतःहून सेवा करणारा. अशा लोकांचा संघ म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शाखेचे हे पहिले बाळकडू, एकनाथराव कुलकर्णी या तत्कालीन संघ प्रचारकांकडून त्यांना मिळाले. शाखा, शिस्त, गणवेश, संचलन, गीते, देशभक्ती, धर्मप्रेम यांची साथ जी बालपणी मिळाली, ती कायमचीच. तळेगाव शाखेवर प. पू. डॉ. हेडगेवार यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. या दर्शनाचा अनंतरावांच्या बालमनावर सखोल परिणाम झाला. मूळचीच उत्तम शरीरप्रकृती आणि तीव्र बुद्धिमत्ता लाभलेल्या अनंतरावांचे व्यक्तिमत्त्व, संघ संस्कारांमुळे घडत गेले.
 
१९४० साली पुढील शिक्षणासाठी अनंतराव पुण्यात आले आणि मॉडर्न हायस्कूलच्या मागील शाखेत जाण्यास सुरुवात झाली. इथेच त्यांना प. पू. गुरुजींचा अल्प सहवास, काही काळासाठी मिळाला. वयाच्या १३व्या वर्षापासूनच त्यांनी, आजूबाजूच्या गावांमध्ये संघकार्यासाठी जाण्यास सुरुवात केली. कित्येक वेळा यासाठी घरातूनही विरोध होत असे, पण त्यांनी निष्ठेने आपले काम सुरूच ठेवले. वडिलांच्या बदलीमुळे पुन्हा एकदा अनंतरावांच्या कुटुंबास आपला मुक्काम, लोणावळ्यास हलवावा लागला आणि त्यांच्या तेथील संघजीवनाची सुरुवात झाली. त्याचवेळेस देशात स्वांतत्र्याचे वारे वाहू लागले होते. १५-१६ वर्षांच्या कुमारवयीन अनंतरावांवर, लोणावळ्याचे शाखा कार्यवाह आणि नंतर शहर कार्यवाह अशी जबाबदारी सोपवण्यात आली.
 
याचदरम्यान त्यांना प्रचंड मोठा मित्रपरिवार लाभला आणि हे सगेसोयरे अखेरपर्यंत त्यांच्याबरोबर होते. या परिवाराने जातीपातीच्या सर्व सीमारेषा ओलांडलेल्या होत्या. लोणावळ्यात त्यांचे संघकार्य आणि त्याचबरोबर शिक्षणही जोमाने सुरू होते. परंतु त्याचवेळेस संपूर्ण कुटुंबाला पुन्हा एकदा स्थलांतरित व्हावे लागले. यावेळेस हे सर्व कुटुंब मुंबईस येऊन स्थिरावले, पण इथेही शाळा आणि शाखा दोन्ही त्यांना मिळालेच. घरोघरी भेटी देणे, वस्त्यांमधून फिरणे, माणसे जोडणे हे सुरूच राहिले. इथेच शहरी भागातील आखीव संघ कार्यपद्धतीशी त्यांचा परिचय झाला.
 
१९४६ साली त्यांनी पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात, शिक्षणासाठी प्रवेश घेतला. संघकार्यकर्त्यांनी शक्य होईल तितके उच्च शिक्षण घेतलेच पाहिजे, हीदेखील संघश्रेष्ठींचीच शिकवण! अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाही, दुसरीकडे संघकार्यही सुरूच होते. परीक्षेनंतरच्या सुटीत नागपूरच्या संघशिक्षावर्गात त्यांचे तृतीय वर्ष पूर्ण झाले. परंतु, पुढील काळात संघावर बंदी आली. संघबंदीविरोधातील सत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे, अनंतरावांना येरवडा कारागृहात साडेचार महिन्यांचा कारावास भोगावा लागला.
 
१९४९ साली अभियांत्रिकीची पदवी प्राप्त झाल्यावर, अनंतराव दोन वर्षांसाठी प्रचारक म्हणून निघाले. त्यांच्यावर बारामती व दौंड या दोन तालुक्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर १९५१ मध्ये त्यांच्याकडे, मावळ व मुळशी या दोन तालुक्यांचे काम देण्यात आले. १९५२ मध्ये मा. बाबाराव भिडे यांच्या आग्रहास्तव त्यांनी, मावळ व मुळशी तालुयातील विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज भरला. पण उमेदवाराचे वय अर्ज भरतेवेळी २५ वर्षे पूर्ण असले पाहिजे, या नियमाअंतर्गत त्यांचा अर्जछाननीच्या वेळेसच अस्वीकृत केला गेला. नियतीनेच जणू काही अनंतरावांनी संघकार्यच करावे, असा संकेत दिला. यानंतर संघकार्यास मध्यवर्ती ठेवूनच अनंतरावांनी आपल्या आयुष्याचे पूर्ण नियोजन केले.
 
१९५२ साली अभियांत्रिकीमधील प्रगत तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी, अनंतराव इंग्लंडला गेले. तिथून परतल्यानंतर ‘गॅमन इंडिया’ या प्रख्यात कंपनीत, प्रोजेक्ट डायरेक्टर या पदावर त्यांची नियुक्ती झाली. आपल्या या कार्यकाळात त्यांनी कोरबा येथील पॉवर प्लांट, चंदीगढमधील विधानभवन, ओझर येथील ‘मिग’ विमान कारखाना, वाशी खाडीवरील पूल, अप्सरा अणूभट्टी असे अनेक अत्यंत आव्हानात्मक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. हे प्रकल्प कार्यान्वित होत असताना, त्यांच्या गावोगावी बदल्या होत असत. पण त्या त्या गावी अनंतराव संघकार्याशी जोडलेलेच असत. या सर्व ठिकाणी त्यांच्या घरी मा. मोरोपंत पिंगळे, मा. माधवराव मुळे, मा. दादासाहेब आपटे असे संघातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते वेळोवेळी मुक्कामास येत.
 
एकनाथजी रानडे यांच्याशी अनंतरावांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कन्याकुमारी येथे विवेकानंद शिलास्मारक बांधण्याचे निश्चित होताच, स्मारकशिलेचे सर्वेक्षण करणे, तेथील सर्व रचनांची आखणी करणे आणि तेथील कामाची नियमित पहाणी करणे अशी जबाबदारी, अनंतरावांवर सोपवण्यात आली. नोकरीच्या जबाबदारीतून वेळ काढून, सुमारे चार वर्षे अनंतराव या कामासाठी नियमित कन्याकुमारीला ये-जा करत असत. आपल्या नोकरीतील अत्यंत आव्हानात्मक जबाबदारीची कामे पार पाडत असतानाच, विवेकानंद शिलेचे कामकाज हाताळणे म्हणजे, त्यांच्याप्रति आपल्या श्रद्धास्थानाला स्वामी विवेकानंदांना वाहिलेली एक आदरांजलीच होती. मा. अनंतरावांना विवेकानंदांची भाषणे मुखोद्गत होती.
 
१९७० साली ‘गॅमन इंडिया’ सोडून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला व चेंबूर, मुंबई येथे ते आपल्या कुटुंबासहित स्थायिक झाले. आता त्यांनी नित्य संघकार्यातील जबाबदार्‍या घेण्यास सुरुवात केली. चेंबूर नगर कार्यवाह, पूर्व उपनगर कार्यवाह, मुंबई महानगर कार्यवाह आणि त्यानंतर महाराष्ट्र प्रांत कार्यवाह अशा जबाबदार्‍या त्यांनी क्रमवार पार पाडल्या. महानगर कार्यवाह असताना सुरेंद्र थत्ते, वसंतराव तांबे, बिमल केडिया, काका दामले, विनायकराव वालावलकर, मा. भासाहेब खोना असे अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक त्यांना सहकारी रुपात लाभले. १९७५च्या आणीबाणीच्या काळात त्यांना १३ महिन्यांचा कारावास झाला. त्यावेळेस त्यांना नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचे, जिव्हाळ्याचे संबंध जुळले. आणीबाणी संपल्यानंतर अनंतरावांवर महाराष्ट्र प्रांत कार्यवाह, अशी जबाबदारी सोपवण्यात आली. या काळात ते महिन्यातील २० दिवस प्रांतभर प्रवास करत. सर्व कार्यकर्त्यांना बोलते करणे आणि आपल्या मिष्किल बोलण्याने आणि सर्वांच्या अनुमतीने, सर्वांना बरोबर घेत अनेक अवघड निर्णय घेणे अशी त्यांची कार्यपद्धती होती. अवघड विषय हलकाफुलका करून सांगण्याच्या त्यांच्या शैलीमुळे, त्यांचे बौद्धिक वर्ग खूपच परिणामकारक होत.
 
अनंतरावांचा अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी अगदी निकटचा संबंध होता. मोरोपंत पिंगळे, बाबा भिडे, एकनाथजी रानडे, आबाजी थत्ते ही सर्व मंडळी अनेकदा त्यांच्या घरी मुक्कामास असत. प. पू. गुरुजी, पू. बाळासाहेब देवरस, पू. रज्जूभैय्या, पू. सुदर्शनजी अशा सर्व सरसंघचालकांचेही त्यांच्या घरी राहणे झाले होते. १९७२च्या दिवाळीत प. पू. गुरुजींचा अनंतरावांच्या घरी दहा दिवस मुक्काम होता. याबद्दल अंतरावांना कायमच कृतार्थतेची भावना होती. अनंतरावांना त्यांच्या संघकार्यात, पत्नी कुमुदताई यांची मोलाची साथ लाभली. अनंतराव संघकार्यात व्यस्त असताना, कुमुदताई समर्थपणे घराची जबाबदारी पार पाडत होत्या. सतत हसतमुख राहून कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी त्या सदैव तत्पर असत. आणीबाणीच्या बिकट काळातही त्यांनी घर व मुले सांभाळत असतानाच, अनेक भूमिगत कार्यकर्त्यांनाही आधार दिला.
 
१९९१ मध्ये एका बैठकीसाठी मुलुंडला जात असताना, अनंतरावांच्या मोटारीला गंभीर अपघात झाला. त्यात त्यांचा एक पाय कायमचा अधू झाला. यामुळे त्यांना प्रवास करणे अशक्य झाले. यानंतर त्यांनी लेखनाकडे आपले लक्ष वळवले. ‘माझे संघजीवन’ असे त्यांनी, आपल्या संपूर्ण संघजीवनाचे विस्तृत वर्णन करणारे लेख लिहून ठेवले आहेत. ’सप्तर्षीच्या सहवासात’ या त्यांच्या लेखमालेत, आपल्या सहवासात आलेल्या ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांविषयींचे आपले विचार त्यांनी मांडले आहेत. संस्कृत आणि गीता हे त्यांच्या विलक्षण आवडीचे विषय. त्यांनी गीतेचे भाषांतरसमश्लोकी प्रचलित मराठी भाषेत केले. मोरोपंत पिंगळे यांच्या आग्रहावरून याचे पुस्तकात रुपांतर केले आणि स्वतःच त्याचे प्रकाशनही केले. या पुस्तकाच्या दोन हजार प्रती हातोहात संपल्या. ज्ञानेश्वरी या आपल्या अत्यंत आवडत्या ग्रंथाचेही त्यांनी, समश्लोकी सुबोध मराठीत रुपांतर केले. याच्याही एक हजार प्रती दोन महिन्यांतच संपल्या.
 
इंग्रजी भाषेवरही अनंतरावांचे विलक्षण प्रभुत्व होते. विल्यम वर्ड्सवर्थ, टी. एस. इलियेट, जॉन कीट्स यांच्या कविता त्यांना तोंडपाठ असत. अपघातानंतर त्यांनी ऑईल पेंटिंग्स करण्याचा आपला छंदही जोपासला. या कामात चेंबूरचे ज्येष्ठ स्वयंसेवक शांतिदेव हे त्यांना मोलाचे मार्गदर्शन करत. वयाच्या ७५व्या वर्षी ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनानंतर आता आपले इथले कार्य संपले, असे त्यांनी आपल्या जीवलग मित्रास सांगितले आणि त्यानंतर खरोखरच दहा दिवसांतच दि. २४ मे २००२ रोजी त्यांचे देहावसान झाले. एका पर्वाचा, एका कृतार्थ जीवनाचा अंत झाला.
 
आज अनंतरावांचा सुपुत्र गिरीश हाही नित्य संघ कार्यात, विविध जबाबदार्‍या पार पाडत आहे. कुटुंबातील अन्य सदस्यांनाही अनंतरावांच्या कार्याची पुरेपूर जाणीव आहे आणि प्रत्येकजण आपआपल्या परीने संघकार्याचा हा वसा पुढे नेत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0