मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या रोजगारासाठी सहा सुत्री कार्यक्रम जाहीर; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

14 Dec 2025 18:48:26

Mangalprabhat Lodha

नागपूर : ( Mangalprabhat Lodha ) राज्याच्या कौशल्य विभागाअंतर्गत राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींच्या रोजगारासाठी सहा सुत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याबद्दलची घोषणा केली.
 
विधानसभा आ. डॉ. राहुल पाटील आणि आ. अमीत साटम यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. यावर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "२००७ नंतर बेरोजगारांसाठी एकही योजना नव्हती. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कधीही फसवणूक करणारी नव्हती. सुरुवापासूनच ही योजना प्रशिक्षणासाठी आहे रोजगारासाठी नाही. निवडणुकीपूर्वी ६ महिन्यासाठी ही योजना सुरू केली आणि निवडणुकीनंतर पुन्हा ५ महिने मुदत वाढवण्यात आली."
 
योजनेसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद
 
"यावेळीच्या पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी सरकारने ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील लोकांना आयटीआयमध्ये केलेल्या सर्व कोर्सेसचा उपयोग आहे. महाराष्ट्रातील सर्व आयटीआयमध्ये आपण एक शॉर्ट टर्म कोर्स सुरू केला आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले असून पहिल्या बॅचमध्ये ५५ हजार विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. मुख्यमंत्री स्व रोजगार योजनेअंतर्गत पहिल्या वर्षात ५ लाख बेरोजगारांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे विरोधकांसाठी या योजनेचा उपयोग नाही, असे वाटत असले तरी महाराष्ट्रातील लोकांना त्याचा लाभ आहे," असे ते म्हणाले.
 
राज्यातील तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना आहे. त्यानुसार सहा सुत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्दिष्ट साध्य करणार असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात सांगितले.
 
असा असेल सहा सुत्री कार्यक्रम
 
१) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत (आयटीआय) राबविण्यात येणाऱ्या अल्पकालीन अभ्यासक्रमांमध्ये १० टक्के प्राधान्य आरक्षण ठेवण्यात येईल. लाभार्थी विद्यार्थ्यांना सदर अल्पकालीन अभ्यासक्रमांमध्ये (एकदाच, कोणत्याही एका अभ्यासक्रमासाठी) मोफत प्रवेश देण्यात येईल. २) मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये लाभार्थ्यांसाठी १० टक्के प्राधान्य आरक्षण ठेवण्यात येईल. ३) मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेत प्रशिक्षित झालेल्या युवांची अद्ययावत यादी, रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उद्योग विभागास नियमितपणे उपलब्ध करून देण्यात येईल. या संबंधित महामंडळांना रोजगार/स्वयंरोजगाराकरिता लाभार्थ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात येईल. ४) योजनेतील लाभार्थी यांना एमएसएमई यांचेसाठी महास्वयं पोर्टल मध्ये सुविधा कार्यान्वित करून संयुक्त स्वरूपाचा ‘Match Making Portal’ अप्लिकेशन द्वारे देखील उपलब्ध करून देण्यात येईल, ज्याद्वारे उद्योग, उद्योजक व लाभार्थी यांच्यात थेट संपर्क व रोजगार-संधी निर्माण होतील. ५) विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांमध्ये या योजनेतील लाभार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था तसेच प्राधान्य देण्यात येईल. ६) खाजगी कंपन्यांना आवश्यक असलेल्या तात्पुरत्या मनुष्यबळासाठी आयटीआयमार्फत आवश्यकतेनुसार विशेष प्रशिक्षण देऊन, अशा रोजगारामध्ये मुख्यमंत्री युवा करू प्रशिक्षण योजनेतील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल.
 
१ जानेवारीपासून दुसरी बॅच सुरु होणार
 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सद्य स्थितीत १ लाख १६ हजार ३८४ प्रशिक्षणार्थी आहेत. तर १ लाख १० हजार ११२ युवांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. येत्या १ जानेवारीपासून प्रशिक्षणाची दुसरी बॅच सुरू होणार आहे, अशी माहितीही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0