भोपाळ : ( Table-Top Red Markings for Wildlife Safety ) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भोपाळ–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग (NH-45) वरील दोन किलोमीटर लांबीच्या वन्यजीव क्षेत्रातून जाणाऱ्या उच्च-जोखम भागात ५ मिमी जाडीचे “टेबल-टॉप रेड मार्किंग” लागू केले आहे. हे अनोखे तंत्र वापरण्याची भारतात ही पहिलीच वेळ आहे. हे अभिनव तंत्र वाहनांचा वेग प्रत्यक्षरित्या कमी करण्यासाठी आणि वन्यजीवांसाठी रस्ता सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी राबवण्यात आले असल्याची माहिती एनएचएआयने दिली आहे.
एनएचएआयच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, भारतीय महामार्गांवर प्रथमच अशा प्रकारचे रोड मार्किंग करण्यात आले असून, हा उपक्रम १२२.२५ कोटींच्या एका मोठ्या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पांतर्गत ११.९ किमी लांबीच्या महामार्गाचा विस्तार, अंडरपासेसची उभारणी आणि कुंपण बसविणे याचा या प्रकल्पात समावेश आहे.
हेही वाचा : Ram Mandir : राम मंदिर परिसरातील सात मंदिरांवर होणार ध्वजारोहन
वन्यजीव मृत्यूमुळे तातडीची कारवाई
वन्यजीवांसाठी महामार्गांमुळे वाढणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ही नवी सुरक्षा उपाययोजना तात्काळ राबवण्यात आली. कुन्हो राष्ट्रीय उद्यानातून भरकटलेले चित्त्याचे पिल्लू आग्रा–मुंबई महामार्गावर वेगवान वाहनांच्या धडकेत मृत्युमुखी पडले होते. या घटनेने प्राण्यांच्या मार्गिकांमधून जाणाऱ्या महामार्गांवरील धोके अधोरेखित झाले. मध्य प्रदेशात गेल्या दोन वर्षांत २३७ प्राणी–वाहन अपघात आणि ९४ वन्यजीव मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्पासारख्या संरक्षित क्षेत्रांतून जाणाऱ्या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण जास्त असल्याने, प्राण्यांना त्यांच्या अधिवासात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग देणे अत्यावश्यक बनले होते.
हे वाचलत का? - Orange Line Mumbai Metro Line : ऑरेंज लाईन मुंबई मेट्रो लाईन १२ने गाठला 'शतकाचा टप्पा'
टेबल-टॉप रेड मार्किंग म्हणजे काय?
या अभिनव उपाययोजनेत व्याघ्र प्रकल्पातील धोकादायक भागात रस्त्यावर ५ मिमी जाडीचा लाल रंगाचा उंचावलेला (टेबल-टॉप) थर लावण्यात आला आहे. एनएचएआयच्या मते, हा तेजस्वी लाल रंग वाहनचालकांना तात्काळ इशारा देतो की, ते वन्यजीव क्षेत्रात प्रवेश करत आहेत. त्याचबरोबर किंचित उंच व खडबडीत पृष्ठभागामुळे वाहनांचा वेगही आपोआप कमी होतो, ज्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. याचसोबत या महामार्गावर ११.९ किमी लांबीच्या मार्गावर प्राण्यांच्या हालचालींच्या अभ्यासानुसार सुमारे २५ अंडरपासेस बांधण्यात येणार आहेत. याशिवाय पांढऱ्या शोल्डर लाईन्स, प्राण्यांचा रस्त्यावर प्रवेश रोखण्यासाठी चेन-लिंक कुंपण, तसेच वाहनचालकांचा वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीड डिटेक्टर अशी उपकरणे बसवण्यात येत आहेत.