मुंबई : ( Sanjay Shirsat ) उच्च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून त्यांचे भविष्य अधिक सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहांसाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. नागपूर येथील सेंटर पाईंट हॉटेलमध्ये सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित ‘संवाद – देशाच्या भविष्याशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यातील वसतिगृहांमध्ये नव्याने २५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देता यावा यासाठी स्वतंत्र योजना आणण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थी घडविणे हे सामाजिक न्याय विभागाचे मुख्य कार्य असून, सर्व धोरणे व उपक्रमांच्या केंद्रस्थानी विद्यार्थी राहील, याकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या.
या कार्यक्रमात मंत्री शिरसाट यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा तसेच इतर पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली. वसतिगृहातील सुविधा, शिक्षणासाठी लागणारे वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना याबाबतही चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.