हे पाच हजार रुपये मला इथे सापडलेत, कुणाचे आहेत?” त्या व्यक्तीने विचारले आणि त्याच वेळी सभागृहात डझनभर लोकांनी एकाच वेळी हात वर केले. "माझेच पैसे पडले आहेत... माझेच पैसे आहेत ते...” असे ते म्हणू लागले. मग, ती व्यक्तीच म्हणाली, "एकाच वेळी इतक्या लोकांचे पैसे या सभागृहात पडले. पण, पैसे त्यामानाने कमीच आहेत.” त्यामुळे त्या महिलेने पैसे स्वतःजवळच ठेवले. याचाच अर्थ, त्या कोणाचेही ते पैसे नव्हते. पण, फुकटचे पैसे भेटतात म्हणून दुसर्याच्या पैशावर कावेबाज लबाडीने त्यांनी हक्क सांगितला होता. हे कुठे घडले, तर अर्थातच पाकिस्तानमध्ये!
पाकिस्तान सरकारची राष्ट्रीय सभा होती. तिथे हे घडले. पाकिस्तानचे भविष्य ठरवणारी नेतेमंडळी तिथे होती. ते काही गरीब, वंचित नव्हते. पण, तरीही त्यांनी दुसर्याचे पैसे हावरटपणाने ‘स्वतःचे’ म्हटले होते. अर्थात, पाकिस्तानमध्ये हे असेच घडणार! तिथे नाही, तर हे कुठे घडणार?
हिंसा, भ्रष्टाचार, सर्वच स्तरावरची अस्थिरता आणि दहशतवाद यामध्ये पाकिस्तानने अव्वल स्थान निर्माण केले. इथल्या लोकांचे जगणेही त्याच कोशात फिरत राहिले. त्यामुळे नीतिमत्ता, सचोटी, प्रामाणिकता यांच्याशी पाकिस्तानचा दुरान्वयेही संबंध नाही. त्यामुळेच तर पाकिस्तान सरकारची राष्ट्रीय सभा सुरू असताना आणि त्याचे प्रदर्शन पाकिस्तानच्या राष्ट्रीय प्रसारणाद्वारे होत असताना नेतेमंडळींनी केवळ पाच हजार रुपयांसाठी अप्रामाणिकता दाखवली. ही अनैतिकता पाकिस्तान्यांमध्ये इतकी भिनली गेली आहे की, आपण कोणत्या पदावर आहोत, काय करत आहोत, याचेही भान त्यांना नसते. त्यामुळेच नुकतीच ती घटना घडली. पाकिस्तानी सेनेच्या माध्यम-जनसंपर्क विभागाची पत्रकार परिषद होती. ‘आयएसपीआर‘चे प्रवक्ता अहमद शरीफ चौधरी यांना पत्रकार प्रश्न विचारत होते. त्यामध्ये अब्सा कोमान नावाची युवा पत्रकारही होती. तिनेही इमरान खान यांच्याबद्दल गंभीर प्रश्न विचारला. यावर चौधरी यांनी इमरान खानवर नेहमीचे आरोप केले. पण, त्यानंतर ब्साला चक्क डोळा मारला. देशाच्या सैन्यातील महत्त्वाच्या पदावर विराजमान व्यक्ती इतके छिचोर वर्तन करते?
असो. तर मुख्य मुद्दा असा की, पाकिस्तानचे लोक आणि पाकिस्तानची गत म्हणजे ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशीच. त्यामुळेच पाकिस्तान सध्या चीन आणि बांगलादेशला सोबत घेऊन नवी परिषद उभी करत आहे. पण, पाकिस्तान ज्या चीनच्या पायाशी सर्व निष्ठा वाहत आहे, तो चीन तर कालपरवाच म्हणाला की, "रशिया, भारत आणि चीन या तीन देशांची एकता म्हणजे वैश्विक शांती, सुरक्षा, स्थिरता आणि समृद्धीसाठी महत्त्वाची आहे.” दुसरीकडे पाकिस्तानला वाटते की, बांगलादेश सोबत असला की, भारताला त्रास देता येईल. पण, पंतप्रधान मोदींनी ‘शेजारी प्रथम’ या संकल्पनेनुसार गेल्या दहा वर्षांत भूतान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव वगैरे देेशांशी अत्यंत सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यातही अफगाणिस्तान देशाशी संबंध तर पाकिस्तानचा पोटशूळ ठरला आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे सीमाभागावरचे युद्ध सुरूच आहे. नुकताच पाकिस्तानमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता, त्यामध्ये पाकिस्तानवर अफगाणिस्तानचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाला आणि अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या त्या भागावर कब्जा केला. या व्हिडिओमुळे पाकिस्तानमध्ये भीती पसरली. पण, काही वेळाने कळले की, अफगाण सैन्याने ‘एआय’च्या मदतीने हा व्हिडिओ बनवला होता. याचप्रमाणे इमरान खानचा तुरुंगात मृत्यू, तसेच पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ झरदारी यांना हृदयविकाराचा झटका आला, असे अनेक खोटे व्हिडिओ अफगाणिस्तानच्या सैन्याने प्रसारित केले. या सगळ्यातून पाकिस्तानी जनतेचे मनोबल ढासळावे, हाच हेतू आहे.पाकिस्तान या सगळ्यामुळे त्रस्त आहे. पण, खड्ड्यात जात असतानाही पाकिस्तान स्वतःची अजिबात शक्तिशाली नसलेली छबी जगासमोर अतिशक्तिशाली मांडण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे सिंधुदेश, पश्तुनिस्तान, बलुचिस्तान असे तीन नवे देश पाकिस्तानमधून निर्माण होण्याच्या वाटेवर आहेत. पाकिस्तानच्या या अभूतपूर्व वाताहतीचे बीज पाकिस्तानच्या निर्मितीतच आहे.