माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

लातूरमध्ये शनिवारी अंत्यसंस्कार

    12-Dec-2025   
Total Views |

Shivraj Patil Chakurkar

मुंबई : (Shivraj Patil Chakurkar)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. लातूरच्या राजकारणात केंद्रस्थानी असणाऱ्या चाकूरकर यांनी नगराध्यक्षपदापासून केंद्रीय गृहमंत्रीपदापर्यंतचा दीर्घ आणि उल्लेखनीय प्रवास केला. अभ्यासू, सभ्य आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. मागील काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून निवृत्त होऊन शांत आयुष्य जगत होते.

कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी ते काही दिवसांपूर्वीच दिल्लीहून लातूरला आले होते. मात्र येथे पोहोचल्यावर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. अशक्तपणा वाढत गेल्याने त्यांच्यावर देवघर येथील त्यांच्या निवासस्थानीच फॅमिली डॉक्टरांसह वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांची विशेष टीमदेखील सातत्याने त्यांच्या देखरेखीसाठी उपस्थित होती. ५ डिसेंबरपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. अन्न-पाणी घेण्यास नकार दिल्याने परिस्थिती गंभीर होत गेली. गरज असल्यास दिल्लीला एअर रुग्णवाहिकेतून हलवण्याचा विचार झाला होता; मात्र डॉक्टरांनी त्यांच्या स्थिती पाहता हलवणे धोकादायक असल्याचे सांगितले. परिणामी त्यांच्यावर लातूरमध्येच उपचार सुरू ठेवण्यात आले. शुक्रवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर शनिवारी, १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बोरवटी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणातील एक संयमी, तत्वनिष्ठ आणि सज्जन नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\