॥सौंदर्यलहरी भाष्य भाग ७॥

11 Dec 2025 10:43:41
Spiritual
 
धनुः पौष्पं मौर्वी मधुकरमयी पञ्च विशिखाः
वसन्तः सामन्तो मलयमरु-दायोधन-रथः|
तथाप्येकः सर्वं हिमगिरिसुते कामपि कृपां
अपाङ्गात्ते लब्ध्वा जगदिद-मनङ्गो विजयते॥६॥
 
शब्दार्थ
 
ज्याचे धनुष्य पौण्ड्र जातीच्या उसापासून बनले असून पुष्पांनी सुशोभित आहे, त्या धनुष्याची प्रत्यंचा भुंगा या किटकाची बनली आहे, त्याच्या भात्यातील पंच बाण म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे आहेत, ज्याचा प्रधान किंवा मुख्य अनुचर/सेवक म्हणजे वसंत ऋतू आहे आणि मलय पर्वतावरून प्रवाहित होणार्‍या वार्‍याच्या रूपातील रथावर जो स्वार होऊन येतो, असा अनंग अर्थात देहहीन असणारा कामदेव हा केवळ श्री ललिता त्रिपुरसुंदरीच्या एका कृपाकटाक्षाने इतका सामर्थ्यवान होतो की, तो संपूर्ण जगतातील प्रत्येक जिवाच्या मनावर राज्य करतो. जगन्माते, हे सामर्थ्य त्याचे नसून हे हिमगिरीसुता, अर्थात हिमालयाची कन्या असणार्‍या तुझेच आहे. तुझ्या चरणी मी नतमस्तक आहे.
 
या नामात ‘लीं’ हे कामबीज गुंफले आहे. कामदेवाच्या उल्लेखातील ‘क’कार , मलय पर्वताच्या उल्लेखातील ‘ल’कार, मौर्वीमधील ‘ई’कार आणि ‘पौष्पं’मधील अनुस्वार मिळून, ‘लीं’ बीज तयार होते आणि हे बीज कामभावना सकारात्मक पद्धतीने जागृत करण्याचे कार्य करते. या श्लोकाच्या पठणाचे फळ म्हणजे, षांढ्य निवृत्ती अर्थात षंढ प्रवृत्तीचा नाश होतो आणि अपत्यप्राप्तीसाठी हा श्लोक फलदायी आहे.
 
भावार्थ
 
कामदेव अर्थात मन्मथ हा श्री ललिता देवीचा सेवक आहे. जगत चलित ठेवण्यासाठी मैथुनी सृष्टी कार्यान्वित ठेवण्यासाठी, तो देवीने दिलेले कार्य पार पाडत समस्त जगताला कामवश ठेवण्याचे कार्य करतो. त्यांनी आपल्या याच सामर्थ्याचा प्रयोग इंद्र आणि अन्य देवांच्या आग्रहाने, साक्षात शंकरावर केला आणि त्याची त्याला जी शिक्षा मिळाली, तिचे वर्णन या श्लोकात आहे.
 
यज्ञस्थळी अपमानित झालेल्या सतीने अग्निकाष्ठे भक्षण केली आणि ही वार्ता कळताच शिव तिथे प्रकट झाले. त्यांच्या अनुयायांनी दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केला. दक्षाचा संहार केला. नंतर शिवाने दक्षाला बोकडाचे मुख लावून पुन्हा जिवंत केले. सतीचे कलेवर घेऊन विमनस्क अवस्थेत शिव संपूर्ण जगत् भ्रमण करत होते, त्या कलेवराचे विष्णूने सुदर्शन चक्र वापरून १०८ तुकडे केले. त्या १०८ स्थानी शक्तिपीठे निर्माण झाली. (सामान्य संकेतानुसार ५१ शक्तिपीठे मानली जातात.) शिवाने कैलासावर जाऊन तपस्या सुरू केली. इकडे तारकासुराने प्रचंड उच्छाद सुरू केला होता आणि त्याचा वध केवळ शिवाचा पुत्रच करू शकेल, असा त्याला ब्रह्मदेवांनीच आशीर्वाद दिला होता. त्यामुळे शिवाची तपस्या भंग करण्यासाठी, इंद्राने कामदेवाला शिवाची समाधी भंग करण्याचे कार्य सोपवले. तोवर सतीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला होता आणि ती शिवावर मोहित झाली होती. इंद्राच्या आग्रहाने कामदेव शिवाच्या सन्मुख पोहोचला. तिथे उमा या अवतारात शक्तीसुद्धा प्रकट झाली होती. कामदेवाने मलय पर्वतावरील सुगंधित वायूला आपला रथ बनवले आणि वसंत ऋतूच्या आगमनासह, तो आपले पंच बाण घेऊन शिवाच्या सन्मुख गेला. कामदेवाने आपले पंच पुष्पबाण वापरले आणि शिवाची तपस्या भंग झाली. शिवाने तृतीय नेत्र उघडून कामदेवाला भस्म केले.
 
त्यानंतर कामदेवाची पत्नी रतीने शक्तीची आराधना केली आणि तिच्याकडे आपल्या पतीला पुनर्जीवित करण्याची मागणी केली. देवीने प्रसन्न होऊन, देहहीन कामदेवाला पुन्हा चैतन्यस्वरूप प्रदान करण्याचे कार्य केले आणि इतकेच नाही, तर "देहहीन असलास, तरीही तू जगतातील प्रत्येक जिवाच्या मनावर राज्य करशील,” असा आशीर्वादसुद्धा प्रदान केला. सौंदर्यलहरीमधील या श्लोकाचा हाच संदर्भ आहे.
 
श्री ललिता देवीकडे आणि कामदेवाकडेसुद्धा पौंड्र जातीच्या उसाचे धनुष्य आहे, त्याची प्रत्यंचा भुंग्यांची आहे आणि त्याच्याकडेही पाच पुष्पबाण आहेत. ही फुले आहेत अरविंद, अशोक, कुट, नवमालिका आणि नीलोत्पल. अर्थात अनुक्रमाने त्यांचे परिचित नाव म्हणजे श्वेतकमल, अशोकपुष्प, आम्रपुष्प, मोगरा आणि नीलकमल. हे पंच बाण मानवाच्या पाच स्वरूपांतील ज्या कामना असतात, त्यांचे प्रतीक आहेत. या कामना म्हणजे मोह, चंचलपणा, असूया, संशय आणि विनाशक प्रवृत्ती. या सर्व कामना या कामभावनेशी निगडित आहेत. कामदेव आपल्या याच बाणांना चालवून, कामभावना जागृत आणि प्रज्वलित करत असतो. हे पंच बाण मानवाला कामातुर करतात, त्यांच्यात बाह्य सौंदर्याचे आकर्षण निर्माण करतात. हेच पाच बाण आणि तेच धनुष्य श्री ललिता त्रिपुरसुंदरीने धारण केले आहेत. परंतु, आता त्याचा साधकावर होणारा परिणाम काय आहे?
 
या बाणांमुळे साधकाला श्री ललिता त्रिपुरसुंदरीचे रूप पाहण्याची, तिच्यासाठी रचलेली सुमधुर काव्ये ऐकण्याची, तिच्या कृपादृष्टीने सुस्नात होण्याची, तिच्या आवडत्या पुष्पांना तिच्या चरणी अर्पण करण्याची आणि तिच्याच उपासनेत लीन राहण्याची प्रेरणा प्राप्त होते. साधक अंतर्मुख होतो. या कामनांचा परिणाम असा होतो की, साधकाची चेतना ऊर्ध्वगामी प्रवासास उद्युक्त होते आणि साधकाची कुंडलिनी जागृत होण्यास प्रारंभ होतो. अर्थात, वस्तू तीच आहे, परंतु तिला धारण करणारा बदलल्याने त्याचा मानवावर होणारा परिणाम पूर्णतः भिन्न आहे.
 
कामवासना ही प्रत्येक जिवाची मूलभूत वासना असून, संपूर्ण जगताचे चलित, विस्तारित राहणे काम या भावनेवर अवलंबून आहे. मैथुनिक सृष्टीशिवाय जगत चलित राहूच शकत नाही. कोणत्याही जिवांचे वंशसातत्य राखण्यासाठी कामभाव आवश्यक आहे. ज्यांना जगताच्या जन्ममृत्यू चक्रातून बाहेर पडायचे आहे, अशा तपस्वींसाठी कामभावना हा सर्वांत मोठा शत्रू आहे; कारण तो त्यांना तपस्या मार्गावरून भरकटवू शकतो. त्यामुळे तपस्येच्या मार्गावरील ऋषी, आपल्या तपस्येला आरंभ करण्यापूर्वी जगन्मातेची मनःपूर्वक आळवणी करतात आणि कामदेवाने आमचा मार्ग अवरुद्ध करू नये, आमची तपस्या भंग करू नये, म्हणून तुझी कृपादृष्टी ठेव अशी आळवणी करतात.
 
कामदेवाचे केवळ नेत्र कटाक्ष टाकून कल्याण देवीने केले आहे. अक्षी म्हणजे नेत्र, म्हणूनच देवीच्या त्या स्वरूपाचे वर्णन कामाक्षी असे केले जाते. या कामाक्षी स्वरूपाचे मंदिर तामिळनाडूमध्ये मदुराई इथे आहे. देवीच्या या मंदिरात एक मूक असणारा तिचा भक्त जाऊन बसत असे. देवीचे स्वरूप सातत्याने न्याहाळत असे. या भक्तावर देवीने कृपा केली आणि त्याला कवित्व प्राप्त झाले. त्याने देवीच्या स्वरूपाचे वर्णन करणारे पंचशती अर्थात ५०० श्लोकांचे काव्य रचले. ते काव्य मूकपंचशती म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात देवीच्या नुसत्या नेत्र कटाक्षाचे सामर्थ्य वर्णन करणारे १०० श्लोक आहेत.
 
भगवती ललिता देवी ही आदिमायासुद्धा आहे आणि संपूर्ण जगताचा सातत्याने विस्तार व्हावा, हीच तिची इच्छा आहे. संपूर्ण जगतातील प्रत्येक जीव हा या माया पटलात बद्ध राहावा आणि त्याच्या या बद्ध अवस्थेतील लीला आपण पाहाव्यात, ही तिची कामना आहे. परंतु, ज्यावेळी तिच्याच कृपेने आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर मुमुक्षू साधक येऊ लागतात, त्यावेळी ती त्यांना विचलित करण्यासाठी त्यांच्या कामवासना उद्दिपित करते. ही तिने घेतलेली परीक्षाच असते. जर साधक याला बळी पडला, तर त्याचे परत अधःपतन होते. परंतु, जर तो या परीक्षेत उत्तीर्ण झाला, तर त्याची आत्मज्ञान प्राप्तीच्या दिशेने वेगवान वाटचाल सुरू होते. भगवतीचा हा सकारात्मक कृपाकटाक्ष प्राप्त व्हावा आणि कामदेवाच्या सापळ्यात आपण अडकू नये, म्हणूनच साधक भगवतीची आळवणी करूनच साधना मार्गावर अग्रेसर होत असतात. कामदेवाचे सामर्थ्य हे भगवतीच्या एका कृपाकटाक्षाचे फळ आहे, त्यामुळे मुमुक्षू साधक या अजेय अशा कामदेवरूपी शत्रूपासून संरक्षण व्हावे, म्हणून भगवतीचे ध्यान करतात. तो ध्यानविधीविषयी पुढील लेखात जाणून घेऊया.
 
- सुजीत भोगले
 
 
Powered By Sangraha 9.0