साहित्यसम्राट अण्णा भाऊंच्या ‘कृष्णाकाठच्या कथा’ या कथासंग्रहातील ज्वलंत समाजवास्तवाची ऐतिहासिक पार्श्वभूमी घेऊन जन्माला आलेली महत्त्वाची कथा म्हणून ‘सावळा मांग’ या कथेकडे पाहावे लागते. इतिहासकारांनीही जरी इतिहासात ‘सावळ्या मांगा’च्या कर्तृत्वाची दखल घेतली नसली, तरी अण्णा भाऊंनी कोणताही तक्रारीचा सूर न आळवता ‘सावळ्या मांगा’ला आपल्या कथेतून ‘क्रांतिकारी समाजनायक’ म्हणून समाजापुढे उभे केले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून या कथेचा मागोवा या लेखात घेतला आहे.
‘सावळा मांग’ प्रखर समाजवास्तवाशी नाते सांगणारी ही एक सत्यकथा आहे. ‘सावळ्या मांगा’च्या उपेक्षित, दुर्लक्षित जीवनाचे अतिशय भेदक चित्रण अण्णा भाऊंनी या कथेत केले आहे. ‘सावळा मांग’ हा कथानायक फकिराचा साथीदार आहे. तो शोषित, पीडित व सर्वहारा समाजाचा आवाज बुलंद करणारा, पराकोटीच्या अवेहलना सहन करत, जातीयतेचे कडू गरळ प्राशन करत भारतीय स्वातंत्र्याचा जाज्ज्वल्य लढा उभा करणारा आहे. तो वाचकाला चिंतनशील करून मानवतावादाच्या तेजस्वी दिशेने आगेकूच करणारा महानायक आहे. ’जगेन तर देशासाठी, मरेन तर मातृभूमीसाठी,’ हे ध्येय उराशी बांधून जगणार्या क्रांतिकारकांपैकी तो एक क्रांतिकारक आहे.
तत्कालीन इतिहासकारांनी दुर्लक्षित ठेवलेल्या ‘सावळा मांगा’ला अण्णा भाऊंनी मराठी साहित्यशारदेच्या दरबारात स्वातंत्र्योत्तर कालखंडात उभा केला आहे. इंग्रजांच्या सत्तेवर विद्ध्वंसाचा नांगर चालवण्याची आणि इंग्रजी जुलमी सत्तेचे पतन करून, खर्या अर्थाने स्वराज्याचा झेंडा रोवण्याची मोहीम मांगांनी हाती घेतल्याचा संदर्भ ‘सावळा मांग’ या कथेत सुरुवातीलाच अण्णा भाऊंनी सांगितला आहे. ते म्हणतात, "सावळानं इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं. इंग्रजांनी आपली सत्ता दृढ करण्यासाठी गुन्हेगार जातजमातींचा कायदा (क्रिमिनल ट्राईब अॅक्ट) हा स्वातंत्र्यपूर्व काळात केला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व मांगांना तीन वेळ हजेरी लावावी लागे. दोन वेळा मांगांनी स्वतः चावडीवर जाऊन हजेरी द्यायची आणि रात्री गावच्या पोलीस पाटलानं मांग वाड्यात जाऊन एकदा हजेरी घ्यायची, अशी त्या कायद्यात तरतूद होती. जर एखादा मांग गैरहजर झाला, तर त्याला तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा व्हायची. अशा या जुलमी कायद्याला सर्व मांग जमातीनं विरोध केला होता. फकिरा, मुरा, चिंचणीकर, पिरा, घोनेचीकर, बळी साजूरकर, निळू मांग, वारणेत खुजगावचा भिवा या मांगांनी त्या कायद्याविरुद्ध बंडावा केला होता. सावळा त्या बंडात सर्व मांग लोकांचा सेनापती मानला जात होता.
१८५७च्या बंडानंतर ‘ईस्ट इंडिया कंपनी’चे राज्य संपले आणि देशात खर्या अर्थाने राणी व्हिक्टोरियाच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारचे राज्य सुरू झाले. इंग्रजांचे राज्य हे कायद्यावर उभे होते. मात्र, याच कायद्याने भारतातल्या मागास, भटक्या, आदिवासी, जातजमातींना जन्मतःच गुन्हेगार म्हणून घोषित केले. त्यात मांग हीसुद्धा जात होती. इंग्रजांना या जाती-जमातींची भीती होती. त्यामुळे या लोकांच्या मुक्त संचारावर बंदी घालण्यासाठी त्यांनी ‘गुन्हेगारी जमाती कायदा,(क्रिमिनल ट्राईब अॅक्ट) १८७१’ हा लागू केला. ब्रिटिश सरकारने मागास, भटक्या, आदिवासी जाती-जमाती यांतील काही जातींना ‘गुन्हेगारी जमाती’ म्हणून घोषित केले. या जमातीत जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती गुन्हा करत नसली, तरी ती जन्मतःच कायद्याने ‘गुन्हेगार’ ठरवली जाई. मांग जातीलाही ‘गुन्हेगारी जमात’ म्हणून जाहीर केले होते. या कायद्याविरुद्ध ‘सावळा मांग’ आणि त्याच्या साथीदारांनी बंड केल्याचा संदर्भ या कथेत आलेला आहे. तसेच पूर्वीच्या सातारा जिल्ह्यातील वारणा, कृष्ण खोर्याच्या परिसरामध्ये मांगांनी या कायद्याच्या विरोधात सामूहिकपणे बंड केल्याचा उल्लेख या कथेत वाचायला मिळतो. ‘क्रिमिनल ट्राईब अॅक्ट, १८७१’ या कायद्याचे दूरगामी दुष्परिणाम भारतातल्या मागास, भटक्या, आदिवासी जाती-जमातींवर झालेले आहेत, त्याचे आज स्वातंत्र्यकाळातसुद्धा चटके या जाती-जमातींना बसताना दिसतात. इंग्रजांनी ज्या गुन्हेगारी जाती-जमाती जाहीर केल्या, त्या जाती-जमाती या स्वातंत्र्योत्तर काळात सर्वच विकासापासून वंचित आहेत. त्यावर ही कथा आधारित आहे.अण्णा भाऊंची ही कथा आशयदृष्ट्या समृद्ध आणि अभिव्यक्तिदृष्ट्या सकस आहे.
अण्णा भाऊंनी या कथेतून काशी नावाच्या विवाहित स्त्रीच्या मनातील स्पंदने व तिचा छळ अधोरेखित केला आहे. काशीचा बाप दादा पाटील हा काशीचा नवरा राजाराम पाटील याला लग्नात ठरलेला हुंडा न दिल्यानं तिला पतीच्या जाचाला बळी पडावे लागते. तिच्या या अन्याय-अत्याचाराची कहाणी तो सावळ्याला सांगतो, तेव्हा सावळा अस्वस्थ होतो. ‘सावळ्या मांग’ हा पोरीबाळींची अब्रू लुटणारा दरोडेखोर आहे, अशी अफवा होती. या पार्श्वभूमीवर ‘सावळा मांग’ हा दादा पाटलाच्या पोरीला आपली पोरगी मानून राजाराम पाटलाला दम भरत म्हणतो, "ही काशी माझी लेक हाय. हिला दुख देऊ नकं. न्हाय तर मी तुझं डोस्कंच मारीन. तुझ्या घरादारावर दुःखाचा डोंगर रचीन.” "आता अशी आगळीक व्हणार न्हाय,” राजारामानं हात जोडले. सावळा मांगाला जेवण्यासाठीचा आग्रह करतो. पण सावळा नकरा देतो. तो राजारामला म्हणतो ”तू सरळ वाग. काशीला जप. मग मी येऊन तुझं अन्न खाईन,” असं म्हणून तो ताडकन उठून घोड्यावर बसला आणि वार्याच्या वेगानं वाघदर्याकडं गेला.
पुढे ‘सावळा मांग’ इंग्रजांविरुद्ध बंड करतो, देशाच्या स्वातंत्र्याचा लढा उभा करतो, त्याला समाजामध्ये बदलौकिक करून बदनाम केले जात आहे, म्हणून तो अस्वस्थ होतो.परंतु, काशीची कहाणी ऐकून त्याच्या काळजाला जखम होते. काशीला आपल्या घोड्यावर बसवून तो टाळगावच्या राजाराम पाटलाच्या घरी तिला घेऊन जातो. काशीचा विस्कटलेला संसार जाती-पातीच्या पलीकडे जाऊन आणि आपला बदलौकिक झालेला असतानादेखील नीट करून देतो. हे ‘सावळ्या मांगा’चं कृत्य समरसता मूल्यविचारसरणीचं आहे. सावळ्याची ‘डोस्कं मारण्या’ची भाषा ही विद्ध्वंसासाठीची नाही किंवा सूड घेण्यासाठीची नाही, तर ती अन्याय थोपवण्यासाठीची आहे; स्त्रीच्या सन्मानाची आहे; हुंडा-कुप्रथाविरोधाची आहे; समाज सुधारण्याची आहे. अण्णा भाऊ साठे यांची ही कथा विद्रोहाचा वणवा ओलांडून हृदयजोड निर्माण करून मानवतावादाचं अक्षरशिल्प उभी करणारी आहे.
या कथानिर्मितीच्या मुळाशी माणूसपणाच्या आड येणार्या सर्व गोष्टींचा विरोध दिसतो. तसेच तिच्या मुळाशी मातृभूमीप्रेम, मानवतावाद आणि बंधुत्वाचे तत्त्वज्ञान हेही दिसते. म्हणून ही कथा समरसतेच्या मूल्यांची पायाभरणी करणारी आहे. कथेच्या शेवटी मात्र सावळ्याच्या मानवतावादी भूमिकेमुळं काशीचं नांदणं तिला लाभलेलं असतं. गावोगावीच्या लेकींचे बाप हे सावळ्याला भेटून आपापल्या जावयांच्या कुकर्माचा पाढा त्याच्यापुढे वाचत होते. सावळा त्या गावाला जाऊन त्या त्या जावयाची रग जिरवत होता. त्यामुळं कित्येक लेकींचे मोडलेले संसार पुन्हा नव्यानं थाटले गेलेले होते. त्यामुळं या लेकी सावळ्याला दुवा देत होत्या. काशी तर सकाळ-संध्याकाळ देवाला हात जोडून "सावळ्याला उदंड आयुष्य लाभू दे; त्याला अपार बळ मिळू दे; त्याच्या सुखाची खबर रोज मला रोज कळू दे,” अशी सतत प्रार्थना करत होती. ती सवर्ण जातीत जन्मलेली असतानाही तिला ‘सावळ्या मांगाची लेक’ असं म्हणवून घेण्यात धन्यता वाटत होती. मात्र, मथाजी दाभाडे याला आपला भाचा राजाराम पाटील यानं ‘सावळ्या मांगा’पुढे हात टेकवून काशीला घरात घेतलेलं पटलेलं नसतं. थोडक्यात, मथाजी दाभाडे याच्या माध्यमातून बेगडी पाटीलकी प्रवृत्तीचं समाजवास्तव या कथेतून अण्णा भाऊंनी मांडलं आहे.
एका मांगानं राजाराम पाटलाच्या बायकोला म्हणजे काशीला राजाराम पाटलाच्या घरात आणून सोडलं, ही जातीयतेची सल मथाजी दाभाडे याला सतत सतावत असते. त्यासाठी तो ‘सावळ्या मांगा’चा सूड घेण्याचे ठरवतो. राजाराम पाटील हा आपला मामा मथाजी दाभाडे याचं ऐकून आपल्या पत्नीला म्हणजे काशीला घराबाहेर काढतो. तो काशीला दम देतो की, तू हुंड्याचे पैसे घेऊन आलीस, तरच तुला घरात घेईन. अशा संकटकाळी काशीला आपल्या माहेरापेक्षाही जास्त सुरक्षित जागा ही सावळ्याची वाघदरा वाटते. मथाजी काशीला म्हणतो, "मुली, माहेरी जा. जर तुला सासर पायजी असंल, तर १५ हजार घेऊन ये. न्हाय तर ‘सावळा मांगा’ला आण. मला त्येचं बळ बघायचं हाय.” सावळा मांग आपलं बळ मथाजीला दाखवून त्याच्या वाड्यातली ५० हजार रुपायांची लूट करून येतो. ही बातमी ऐकताच राजाराम आपल्या पत्नीला घ्यायला वाघदर्यात येतो. पण सावळ्या राजारामला म्हणतो, "तुझं मुंडक मारून माझ्या लेकीला विधवा करायचं नाही. त्यामुळं गुमान नीट संसार कर.” कथेतील हा संघर्ष मथाजी दाभाडेच्या अहंकारी वृत्तीनं व जातीय मानसिकतेनं निर्माण झालेला असला, तरीही दुसरीकडे समंजस असणारा ‘सावळा मांग’ हा त्याच्या समजूतदार वृत्तीनं इतका तणाव निर्माण होऊनही सामंजस्यानं काशीचा मोडलेला संसार उभा करतो.
या कथेत ‘सावळ्या मांग’ म्हणतो, "तरवार ही नेक कामासाठीच उगारली पाहिजे आणि मारली पाहिजे.” अण्णा भाऊ साठे यांचं हे विधान उच्च विचारांचं दर्शन घडवणारं आहे. हे विधान शक्तीच्या नैतिक आणि मर्यादित वापराचा संदेश तर देतंच; शिवाय शस्त्रांचा उपयोग केवळ योग्य कारणांसाठीच करावा. अन्यथा त्याचा वापर हा अन्यायकारक असू शकतो, याचंही शहाणपण शिकवणारं आहे. अण्णा भाऊंच्या साहित्याचं अधिष्ठान मानवतावाद हेच आहे, हे आपल्या मनावर या कथेमुळं ठसतं. फकिरा, ‘सावळा मांग’ यांच्यासारख्या पहिल्या फळीतल्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आणि संस्कृतिरक्षणासाठी स्वतःच्या जीवनाची आहुती दिलेली असतानादेखील त्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा स्वातंत्र्योत्तर काळातल्या भारतीय समाजाला विसर पडलेला आहे. म्हणून अण्णा भाऊ ‘सावळा मांगा’ची कथा लिहून मराठी साहित्यशारदेच्या दरबारात उपेक्षित सावळ्याचं कर्तृत्व उभं करतात. ही कथा विद्रोहाचा वणवा ओलांडून हृदयजोड निर्माण करून मानवतावादाचं अक्षरशिल्प उभी करणारी आहे, असे म्हटले, तर वावगं ठरणार नाही. म्हणून ही कथा समरसतेच्या मूल्यांची पायाभरणी करणारी आहे, असे निश्चितपणे म्हणता येते.