भिगवनमध्ये 'साईक्सच्या रातव्या'चे दुर्मीळ दर्शन

10 Dec 2025 21:30:38
Sykes



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
पुण्यातील भिगवनच्या गवताळ प्रदेशात साईक्स रातव्याचे दुर्मीळ दर्शन झाले आहे (Sykes's nightjar). हिवाळ्यात महाराष्ट्रात स्थलांतर करुन येणारा हा पक्षी मुंबईतील पक्षीनिरीक्षकांनी नोंदवला आहे (Sykes's nightjar). भिगवनच्या परिसरात हा रातवा दिसणे दुर्मीळ आहे. (Sykes's nightjar)
 
 
 
गेल्या आठवड्यामध्ये मुंबईतील करण सोलंकी, शंतनू मजुमदार आणि सिद्धार्थ जैन हे तीन पक्षीनिरीक्षक भिगवनमधील कुंभारगाव येथे पक्षीनिरीक्षणासाठी गेले होते. रात्रीच्या वेळी खडकाळ पठरावर लेपेर्ड गेको ही पाल शोधताना त्यांना गवताच्या एका छोटाश्या कुरणावर शांतपणे बसलेले रातवा दिसला. या रातव्याची ओळख पटवल्यानंतर तो दुर्मीळ साईक्सचा रातवा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भिगवन परिसरात हा पक्षी फार दुर्मीळ असल्याचे येथील स्थानिक पक्षीनिरीक्षक संदीप नगरे यांनी सांगितले.
 
 
 
रातवा हा पक्षी निशाचर असून भारतीय रातवा आणि रान रातवा या दोन प्रजाती महाराष्ट्रात प्रामुख्याने दिसतात. या दोन्ही प्रजाती इथल्या स्थानिक आहेत. मात्र, साईक्सचा रातवा हा महाराष्ट्रात हिवाळी हंगामात स्थलांतर करुन येतो. साईक्सचा रातवा हा कीटकांवर अन्नग्रहण करतो. ब्रिटिश सैन्यदलातील अधिकारी कर्नल साईक्सच्या नावावरुन या प्रजातीला हे नाव देण्यात आले आहे. भारतीय पक्ष्यांवर अभ्यास करणार्‍या कर्नल साईक्स यांनी पक्ष्यांच्या नव्या प्रजातींचा उलगडा करुन त्यांचे नामकरण करताना आवर्जून हिंदू धार्मिक प्रतिमांचे त्यामध्ये कसे प्रतिबिंब उमटेल, याचा प्रकर्षाने विचार केला. पक्ष्याचे शास्त्रीय नाव ठेवताना त्यांनी त्या पक्ष्याच्या कुळाचे नाव हे ग्रीक पौराणिक कथांमधील प्रतिमांच्या आधारे, तर पुढील मूळ नाव हे हिंदू धार्मिक प्रतिमांच्या आधारे ठेवले.
Powered By Sangraha 9.0