‘मैत्रीबोध परिवारा’च्या मार्गदर्शनाने आणि प. पू. दादाश्री यांच्या आशीर्वादाने ‘एक भारत, हम भारत’ या संकल्पनेअंतर्गत अभूतपूर्व कार्य करणार्या अनुराधा गोखले. ‘या देशाचे जे काही चांगले-वाईट होणार आहे, त्याला मी व्यक्तिशः जबाबदार आहे. त्यामुळे देशासाठी, समाजासाठी मला सकारात्मक कार्यविचार करायलाच हवे,’ अशी समाजात जागृती करणारी ही संकल्पना. या लेखामध्ये या संकल्पनेचा आणि त्याद्वारे होणार्या कार्याचा मागोवा घेतला आहे.
ही अंतराहून ते शेकडो लोक त्यांच्या दिशेने येत होते. पाकिस्तानमधले कट्टरपंथी मुसलमान ज्या पद्धतीने केशभूषा-वेशभूषा करतात, तसेच ते होते. ते काहीतरी जोरजोरात बोलत होते. आपण इथे पहलगामध्ये निर्जनस्थळी एकटी हिंदू महिला आहोत, सोबत शेकडो लोक असले, तरीसुद्धा ते काश्मिरी मुसलमान आहेत. हे समोरून येणारे लोक कोण असतील, काय बोलत असतील, हा विचार अनुराधा गोखले यांच्या मनात आला. पण तो विचार भयाचा नव्हता, तर उत्सुकतेचा होता. त्यावेळी त्यांच्या मनात केवळ मी भारतीय आहे आणि ही काश्मीर भूमी भारतीय आहे. त्यामुळे काश्मीरच्या भूमीमध्ये जन्मलेले सोबतचे सगळे भारतीय आहेत, हा विचार त्यांच्या मनात दृढ होता. तो जमाव हळूहळू जवळ येऊ लागला. भारत-पाकिस्तान सीमेवरचा गुज्जर बकरीवाल समाजाचे ते लोक होते. त्यांच्या विशिष्ट लेहज्यात ते बोलत होते, ‘हम भारत के हैं, भारत हमारा हैं|’ ते जोरजोरात जयघोष करत होते. ते एकून अनुराधा यांच्यासोबत असलेले ते शेकडो काश्मिरी मुसलमानही म्हणायला लागले, ‘हम भारत के, हैं भारत हमारा हैैं|’
ही घटना काही काल्पनिक नाही किंवा ‘गंगा-जमना-तेहजीब’चा डोस देणार्या कोणत्याही सिनेमातले कथानक नाही, तर ही सत्य घटना होती. दि. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये धर्म विचारत दहशतवाद्यांनी २६ हिंदूंची क्रूर हत्या केली होती, तर १७ जण जखमी झाले होते. ‘बायकॉट काश्मीर’चा मुद्दा वेगाने उठत होता. सगळे काश्मीर भारताच्या विरोधातच आहेत, असेही माध्यमांवर वातावरण पेरले जात होते. या सगळ्या प्रकरणात काश्मीरमध्ये हकनाक मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप जिवांना घटनास्थळी जाऊन श्रद्धांजली देणे, काश्मीरमध्ये नक्की काय वातावरण आहे, गेल्याच वर्षी ‘मैत्रीबोध परिवारा’ने ‘ट्रान्सफॉर्म जम्मू-काश्मीर’ या कार्यक्रमाअंतर्गत काश्मीरमधील कला-साहित्य-संस्कृतीमध्ये देदीप्यमान यश मिळवणार्या २० काश्मिरींचा सत्कार केला होता. ते मुस्लीम होते, मात्र सर्वार्थाने भारतीय होते. ‘कलम ३७०’ हटवल्यानंतरच्या काश्मीरचे त्यांनी आणि त्यांच्यासोबत हजारो काश्मिरींनी स्वागत केले होते. पाकिस्तानची दुर्दशा वाताहत त्यांना माहीत होती. त्यांना भारतीयत्वाचा अभिमान होता. त्यांची मनस्थिती काय असेल, हा विचार त्यावेळी अनुराधा गोखले यांच्या मनात रूंजी घालत होता.
या सगळ्या अस्वस्थेविषयी कुटुंबाशी आणि ‘मैत्रीबोध परिवारा’च्या दादाश्रींशी चर्चा केल्यानंतर अनुराधा यांनी ठरवले की, काश्मीरला जायचे. तिथे आपल्या मृत पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहायची. काश्मीरच्या सद्यपरिस्थिती काय आहे, हे पाहून यायचेच. काश्मीरच्या लालचौकामध्ये तिरंग्याच्या साक्षीने मृतबांधवांना श्रद्धांजली द्यायची ठरले. पण, काश्मीरला जाण्यासाठी पोलीस परवानगी मिळेल का? देव-देश-समाजाच्या कार्यासाठी निसर्ग पूर्ण ताकदीनिशी सोबत उभा राहतो, हे सत्यच आहे. त्यामुळे केवळ देशप्रेमाच्या निष्ठेला प्रमाण मानत अनुराधा या काश्मीरला जाण्यासाठी निघाल्या.
दि. २६ एप्रिल रोजी मुंबईहून काश्मीरला जाण्यासाठीच्या विमानात त्या बसल्या. त्या विमानात केवळ नऊजण होते. आठ आर्मी ऑफिसर आणि अनुराधा. काश्मीरमध्ये गेल्यावर त्यांच्या परिचित व्यक्तींनी चार तरुणांना त्यांच्याशी जोडून दिले. त्यामुळे ते अनुराधा यांच्या सोबतीला आले.
अनुराधा यांनी त्या चार तरुणांशी श्रद्धांजलीसंदर्भात चर्चा केली. चर्चेतून निष्कर्ष निघाला की, लाल चौकात का? पहलगाम येथे घटनास्थळीच आपण दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्यांना श्रद्धांजली द्यायला हवी. हे काश्मीर हे पहलगाम दहशवाद्यांचे नाही, तर भारतीयांचे आहे, हे समाजविघातक देशविरोधी लोकांना कळायलाच हवे. पण पहलगामला जाण्यासाठीही पोलीस परवानगी कशी मिळणार? जिथपर्यंत जाता येईल, तिथपर्यंत जायचे, असे ठरले. तुम्ही वाहनांची व्यवस्था करून या असे अनुराधा यांनी त्या तरुणांना सांगितले. दुसर्या दिवशी पहाटे ते चार तरुण वाहन घेऊन आले. त्यांच्यासोबत इतरही तरुण होते. एकूण संख्या १६ होती. दरम्यान, अनुराधा यांनी श्रद्धांजलीसंदर्भात काही प्लेक्स तयार केले होते. २७ तारखेला पहलगाम येथे आम्ही आपल्या भारतीय बांधवांना श्रद्धांजली देण्यासाठी येत आहोत, हा संदेश व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवर ठेवला होता. तोच संदेश या मुलांना पाठवला होता. या मुलांनीही तो संदेश सोशल मीडियावर टाकला होता.
ठरल्याप्रमाणे दि. २७ एप्रिल रोजी सगळेजण निघाले. काश्मीरहून पहलगामच्या दिशेने जाताना लोकसंख्या विरळ होत गेली. अक्षरशः निर्जन परिसर. इतक्यात अनुराधा यांना फोन आला. "आप कहा हो? हमारे भाईयो को श्रद्धांजली देने के लिये हम यहा आप का वेट कर रहे हैं|” त्यावेळी अनुराधा यांना वाटले की, बरं झालं आपल्यासोबत आणखीन चार-पाच लोक आले. पण जेव्हा त्या पहलगामच्या इच्छितस्थळी पोहोचल्या, तेव्हा जवळजवळ १५० लोक (सगळे मुस्लीम) तिथे उपस्थित होते. त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि दहशतवादाचा निषेधही केला. या लोकांचा भारतीयत्वावर त्यांचा विश्वास होता. त्यांचे म्हणणे होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीमध्ये ‘कलम ३७०’ हटवल्यामुळे काश्मीरचे आर्थिक रूपडे संपन्नतेकडे वाटचाल करत होते. जगभरातले लोक निर्भयपणे काश्मीरमध्ये पर्यटनासाठी येत होते.
काश्मिरी तरुणांना रोजगार मिळू लागला होता. पर्यटन क्षेत्रात भरभराट झाली होती. त्यांच्या कलेला त्यांच्या गुणांना संस्कृतीला राज्य, नव्हे नव्हे अंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत होती. पण दि. २२ एप्रिलच्या त्या भयंकर घटनेने हे विश्वासाचे वातावरणाला कुठेतरी सुरुंग लागला होता. याचा फटका काश्मिरी पर्यटन व्यावसायिकांना आणि सामान्य काश्मिरींच्या दैनंदिन जीवनाला बसला होता. सगळा काश्मीर दहशतवादाचे समर्थन करत नाही, हे त्यांना जगाला सांगायचे होते. ‘एक भारत, हम भारत’ या संकल्पनेशी ते जोडले गेले होते. पुढे अनुराधा यांनी ‘एक भारत, हम भारत’ या संकल्पनेचा जागर करण्यासाठी देशातील १७ राज्यांमध्ये प्रवास केला. १७ राज्यांमध्ये ५७ शहरांमध्ये त्यांनी ‘एक भारत, हम भारत’ या संकल्पनेवर आधारित ‘टुगेदर फॉर टुमारो’ उद्यासाठी आजच एकत्र येऊ, या विषयासाठी ३६६ सत्रे घेतली. २३५ संस्था यामध्ये सहभागी झाल्या. प्रत्येक महिन्यात एक तास तरी आम्ही देशासाठी कार्य करू, अशी प्रतिज्ञा या सत्रातून घेण्यात आली. २ लाख, ३५ हजार लोकांनी ही प्रतिज्ञा घेतली आहे. संकल्प केला आहे की, आम्ही देशासाठी आमचा एक तास निष्ठेने कार्य करू.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, ते सहज मिळाले नाही, तर अगणित स्वातंत्र्यवीरांनी आयुष्याचे बलिदान दिले, सर्वस्वाची होळी केली. हे स्वातंत्र्य अनमोल आहे. ते टिकवणे त्याला समृद्ध करणे, त्याचे संरक्षण करणे, हे केवळ भारतीयांच्याच हातात आहे. त्यामुळे भारतीयांना या स्वातंत्र्यामागची प्रेरणा लढा पुन्हा पुन्हा समाजावा, यासाठीही ‘एक भारत, हम भारत’ संकल्पनेअंतर्गत अनुराधा समाज जागृती करतात. तसेच महिला बाल सक्षमीकरण शिक्षण पर्यावरण, युवक, साहित्य संस्कृती सामाजिक क्षेत्र या विविध क्षेत्रांत अमूल्य कार्य करणार्या लोकांशी संपर्क साधणे. त्यांना त्यांच्या माध्यमातून ‘एक भारत, हम भारत’चा संकल्प समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देणे. उल्लेखनीय व्यक्तींचा सत्कार सन्मान करणे, अशी अनेक कामे यातून केली जातात. देश-समाज यासाठी विशेष नियोजन करून पद्धतशीरपणे कार्य करणार्या अनुराधा गोखले आणि ‘एक भारत, हम भारत’ संकल्पना आजच्या परिस्थितीमध्ये खूपच महत्त्वाची आहे. कारण,
हम मेहनत के दीप जलाकर,
नया उजाला करना सीखें
देश हमे देता है सब कुछ,
हम भी तो कुछ देना सीखें
‘एक भारत, हम भारत’चे कार्य १२ संकल्पनांवर आधारित आहे-
नशामुक्त भारत
वॉक फॉर भारत : एकता की पहल (एकता और राष्ट्रीय चेतना को बढ़ावा देना)
स्वस्थ मैं, स्वस्थ भारत
स्वच्छ संकल्प : स्वच्छ मन, स्वच्छ भारत
ग्रीन वॉरियर्स ऑफ भारत / भारत के हरित प्रहरी
युवा-धरोहर संरक्षक (भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलेचे रक्षण)
करुणा अभियान : मैत्री भारत (दयाळूपणा, सहानुभूति आणि सामुदायिक सहयोग)
भविष्याचा भारत-नेतृत्व निर्माता (विद्यार्थी नेतृत्व आणि मूल्याधारित निर्णय क्षमता)
टेक फॉर गुड : स्मार्ट भारत, सुरक्षित भारत (डिजिटल जागरुकता, सायबर सुरक्षा, नवाचार)
फिट भारत अभियान (योग, क्रीडा, अनुशासन आणि समग्र फिटनेस)
शक्ति फॉर शी : बालिका सशक्तिकरण (सम्मान, समानता आणि संधी)
एक भारत-एक परिवार (भेदभावरहित एकता आणि राष्ट्रीय बंधुत्व)
तर अशा १२ संकल्पनांबाबत अनुराधा समाजात जागृत करत असतात.
दि. ४ डिसेंबर २०१९ रोजी मैत्री दादाश्री यांनी ‘एक भारत, हम भारत’चा संदेश दिला होता. या संदेशाचा अर्थ आहे, मी जो घडवतो, तोच भारत आहे. भारत हा सदैव एकच होता आहे आणि राहील. या देशाला अजून उन्नतीपर्यंत नेण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे. एक भारतीय म्हणून माझीसुद्धा ही जबाबदारी आहे. या संदेशानुसार मी कार्य करते. माझे गुरू मैत्रेय दादाश्री आणि माझं संपुर्ण कुटुंब नवरा, मुलगी, सासू, सासरे, आई-वडील, बहीण आणि मैत्रीण यांचे खूप योगदान आहे. कारण महिन्याचा २२ दिवस प्रवास असतानादेखील तक्रार न करता सहयोग करतात.
- अनुराधा गोखले