भग्वतगीतेमध्ये चर्चिलेला सत्वगुण

01 Dec 2025 11:05:08


भग्वतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन करताना जे गुप्त ज्ञान सांगीतले आहे त्यात त्रिगुणात्मक प्रकृती आणि आत्मा यांचा परस्पर संबंध मोक्षप्राप्ती म्हणजेच कृष्णप्राप्ती करुन घेण्यासाठी कशा प्रकारे होतो याचे विष्लेषण केलेले आहे. प्रत्येक जीव प्रकृति (शरीर) आणि पुरुष (आत्मा) यांनी बनलेला आहे. प्रकृती म्हणजेच त्याचा स्वभाव आणि पुरुष म्हणजेच आत्मा. प्रकृती सत्व, रज आणि तम या त्रिगुणांनी बनलेली आहे. या त्रिगुणात्मक प्रकृती मुळेच जीव कर्म करतो. कर्मसंस्कारांच्या माध्यमातून प्रकृती पुरुषाशी म्हणजेच शरीर आत्म्याशी जोडलं जातं. यासाठीच कर्मसंस्कार, त्रिगुणात्मक प्रकृती आणि अंत समयी जीवाला मोक्ष मिळेल की मनुष्य योनी किंवा पशु योनी मिळेल याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आपला आत्मा निरीक्षक, संमती देणारा आणि भरणारा आहे. जसजशी आपली साधना वाढते आपला आत्मा त्या संस्कारांना ग्रहण करुन परमात्म्याशी एकरुप होतो. यासाठीच साधना आणि कर्मसंस्कार महत्वाचे आहेत.

आपल्या शरीराचे स्वरुप कार्य आणि कारण याने बनलेलं आहे. कार्य म्हणजे पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) आणि पंचज्ञान (दृष्टी, श्रवण, घ्राण, रसना, स्पर्श) तर कारण म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, पाचज्ञानेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा), पाचकर्मेंद्रिये (दोन हात, दोन पाय, मुख), जननेंद्रिय आणि गुद. हेच वैज्ञानिक अर्थाने असे म्हणता येईल की आपलं शरीर हे मांसल भाग, पाणी, ऊर्जा, वात आणि मोकळी जागा अशा पाच तत्वांनी बनलेलं आहे तसेच आपल्या शरीराचे कार्य हे फाहणे, ऐकणे, वास घेणे, चव आणि स्पर्श या पाच प्रकारचे ज्ञान झाल्याने होत असते. हे कार्य चालण्यासाठी आपण पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, जननेंद्रिय आणि गुद या बाह्येंद्रियांचा तसेच यातून मिळालेले ज्ञान मन, बुद्धी आणि अहंकार या तीन आतील इंद्रियांमुळे आत्म्यापर्यंत पोहोचते.

आपल्याकडे आयुर्वेदात वात पीत्त आणि कफ अशी त्रिगुणात्मक प्रकृती आहे असे सांगीतलेले आहे. आपल्या आहार विहाराचा संबंध हा त्रिगुणात्मक प्रकृतीशी थेट जोडलेला आहे. यातूनच आपल्या शरीरात सुख आणि दु:ख या दोन्हीचेए निर्मिती होते. हे सुख आणि दु:ख जो भोगतो तो पुरुष (ह्याचा लिंग किंवा लिंग भावाशी संबंध नाही) म्हणजेच आत्मा असतो. अशा प्रकारे पंचमहाभूते आणि मन, बुद्धी आणि अहंकार ही आठ तत्वे आत्म्याला चेतनारुपात आणतात. हे कर्मसंस्कार आत्म्याशी सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या स्वरुपात जोडले जातात. मृत्यू झाला की ही चेतना तर नष्ट होते पण त्रिगुणात्मक प्रकृतीने जे कर्मसंस्कार आत्म्यावर झालेले असतात ते मात्र आत्म्याबरोबर राहतात. हे संस्कारच आत्म्याला पुढचा जन्म मिळण्यास कारणीभूत होतात. सत्वगुणामुळे देवयोनी, रजोगुणामुळे मनुष्ययोनी आणि तमोगुणामुळे पशुयोनी मिळते. यासाठीच हिंदू धर्मात कर्मसंस्कारांना महत्व आहे.

भग्वतगीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात जो माणूस मृत्यू समयी सगळ्यांत परमात्मा पहातो म्हणजेच माणसं, प्राणी, पक्षी, वनस्पती अशा सगळ्यांमध्येच परमेश्वर आहे हे जाणून वागतो तो सत्वगुणी असतो. सत्वगुण आपल्याला अज्ञानाच्या अंधकारापासून दूर करुन आत्म्याच्या खर्या स्वरुपाशी आपली ओळख करुन देतो. सत्वगुण हा जीवाला पाप कर्मांपासून मुक्ती मिळवुन देऊ शकतो. म्हणूनच आपल्याकडे चांगल्या कर्मांना खूप महत्व आहे. रजोगुणामध्ये व्यक्ती जे काही कर्म करतो त्या कर्मफळाशी बांधला जातो. म्हणजेच ते कर्म वाईट असेल की चांगले जो माणूस त्या त्या कर्माच्या फळामुळे दु:खी किंवा सुखी होतो तो त्या दु:खामुळे किंवा सुखामुळे त्या कर्माच्या फळाशी बांधला जातो. निष्काळजीपणा, आळस, आसक्ती, अज्ञान, विचार न करता केलेल्या कर्मामुळे तमोगुणाची निर्मिती होते. सत्वगुण समजण्यासाठी रजोगुण आणि तमोगुण हे देखील समजणे गरजेचे आहे.

माणसांत रजोगुण आणि तमोगुण कमी झाला की सत्वगुण वाढतो. म्हणजेच आपण आळस न करता, आसक्ती न ठेवता विचारपूर्वक कृती केली आणि जे काही त्या कृतीचे फळ मिळेल त्याने दु:खी अथवा सुखी न होता आपले कार्य करीत राहीलो तर आपल्यात सत्वगुण नक्कीच वाढेल. आपल्या शरीरात २ डोळे, २ कान, २ नाकपुड्या, मुख, जननेंद्रिय आणि गुदा असे नऊ दरवाजे असतात. या नऊ दरवाज्यांतून ज्ञानाचा प्रकाश आत आला की सत्वगुण वाढतो. म्हणजेच जर आपण डोळ्यांनी चांगलं पाहिलं, कानांनी चांगलं ऐकलं, नाकपुड्यांतून सुगंध घेतला, मुखावाटे चांगले सात्विक अन्न ग्रहण केले, तसेच धर्माने कामक्रिडा केली की म्हणजेच सत्कर्मे केली की सत्वगुण वाढून ज्ञानाचा प्रकाश आपल्या शरीरात येतो. सत्वगुणात कर्मफळ हे शुद्ध आणि सात्विक ज्ञानाने भरलेलं असतं.

उदाहरणार्थ आपण एखाद्याला निस्वार्थीपणाने मदत केली तर आपल्यालाच खूप समाधान आणि छान वाटतं. यातून आपल्यात शुद्ध, सात्विक ज्ञान मिळतं. हेच जर आपण एखाद्याला काही अपेक्षा ठेवून मदत केली आणि आपल्या अपेक्षे प्रमाणे आपल्याला परतावा मिळाला नाही तर आपण दु:खी होतो. म्हणजेच आपण जरी सत्कर्म केलेलं असलं तरी आपण त्यातून अपेक्षा ठेवल्याने आपला अपेक्षा भंग होऊन आपल्या मनात म्हणजेच शरीरात दु:खाची निर्मिती होते. आपण जर आळस करुन अभ्यास केला नाही किंवा अविचाराने एखादी कृती केली तर आपली अपेक्षा असो वा नसो आपल्याला फारसं यश मिळणारच नाही. आपण आळसामुळे अज्ञानीच राहू.

पण याचा अर्थ तमोगुण आणि रजोगुण असला तर मुक्ती पासून आपण काही कोस दूरच असतो. पण सत्वगुण जरी असेल तरी आपण शुद्ध सात्विक ज्ञानामध्ये अडकतो आणि आपण मुक्ती पासून वंचितच राहतो. मग असं काय केलं म्हणजे या तिनही गुणांपासून मुक्ती लाभेल? कोणत्याही परिस्थितीत डगमगुन न जाता त्या परिस्थितीला तोंड देऊन आणि मिळालेल्या यशाचा अहंकार न बाळगल्याने आपल्याला या तिनही गुणांपासून मुक्ती मिळते.

आहार आणि विहार यांनी म्हणजेच श्रद्धा, यज्ञ, तप आणि दान यातून आपली प्रवृत्ती म्हणजेच कर्मसंस्कार बनतात. हे आहार आणि विहार देखील त्रिगुणात्मक असतात. यामुळेच आपली त्रिगुणात्मक प्रकृती बनते. सात्विक आहार हा रसाने भरपूर, गुळगुळीत आणि स्थिर (असे अन्न ज्याचा परिणाम शरीरात जास्त काळ टिकून राहतो) असतो ज्यामुळे आपल्याला आरोग्य लाभतं. आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या तीन गुणांनी आपली प्रकृती बनलेली असते. या तीन गुणांत असमतोल झाला की आपले आरोग्य बिघडते. यासाठीच आयुर्वेदात या तीन गुणांचा समतोल राखण्याच्या दृष्टिने आहार सांगीतलेला आहे. ताजं शिजवलेलं सुगंधी अन्न ज्यात अधिक तिखट, खारट, तेलकट, शिळं, दुर्गंधी नाही असं अन्न सात्विक आहारात मोडतं. सात्विक आहारअमुळे सत्वगुण वाढतो आणि आपल्याला आरोग्य लाभतं. सात्विक विहारात शुद्ध हवेत फिरणं, चांगल्या संगतीत रहाणं, चांगल्या ठिकाणी जाणं, चंगलं ऐकणं, चांगलं पहाणं इत्यादी गोष्टी येतात. याच्या विपरित आहार आणि विहार असेल तर रजोगुण आणि तमोगुणच वाढतात.

आता आपण श्रद्धा, यज्ञ, तप आणि दान यांतील सात्विक गुणाची चर्चा करुयात. देवांची पूजा करणार्यांची श्रद्धा सात्विक असते. याच्या विपरित म्हणजे राक्षसाची पूजा करणार्याची श्रद्धा राजसिक असते तर भूत-पिशाच्चांची पूजा करणार्याची श्रद्धा तामसिक असते. शास्त्रोक्ततित्या विहीत, मनावर नियंत्रण ठेवून फळाची अपेक्षा न ठेवता आणि प्राणायाम करुन केलेल्या यज्ञाला सात्विक यज्ञ असे म्हणतात. स्वत:चा मोठेपणा मिरविण्यासाठी फळाच्या लोभापायी केलेला यज्ञ हा राजसी यज्ञ असतो. श्रद्धेशिवाय, शास्त्रांनुसार, मंत्रांचा योग्य जप न करता आणि दक्षिणा म्हणून दान न देता केलेला यज्ञ तामसी यज्ञ असतो.

आपल्यापेक्षा मोठ्यांचा सन्मान करुन त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वागणे, शरीरात साधेपणा, पवित्रता, अहिंसा आणि ब्रह्मचर्य यांचे पालन करणे म्हणजे शरीराशी संबंधित तप आहे. मधुरवाणीने सत्य आणि सर्वांच्या हिताच्या गोष्टी बोलणे हे वाणीशी संबंधीत तप आहे. प्रसन्न मनाने आणि शांत भाव ठेवून मनावर नियंत्रण ठेवून अंत:करणात देवाचे स्मरण ठेवणे हेच मानसिक तप आहे. शरीरा संबंधी, वाणी संबंधी आणि मानसिक तप करणे यालाच सात्विक तप म्हणतात. ज्याची कमतरता आहे ते देऊन सेवा करणे, गरजूंच्या गरजा पूर्ण करणे आणि दान करताना कर्तव्याची भावना न बाळगणे याला सात्विक दान म्हणतात.

जेव्हा एखादी व्यक्ती सात्विक यज्ञ, सात्विक तपस्या आणि सात्विक दान इत्यादी करते आणि त्यांच्या कर्मांच्या फळाचा त्याग करते तेव्हा त्याला सात्विक त्याग म्हणतात. सात्विक त्यागाने माणसाची चित्तशुद्धी होते. जो व्यक्ती कोणतेही अकुशल कृत्य करत नाही पण अकुशल कृत्य किंवा अकुशल कृत्ये करणाऱ्यांचा द्वेष करत नाही तो सात्विक व्यक्ती आहे. जो कर्माच्या बंधनात अडकत नाही तोच खरा त्यागी आहे. ज्या व्यक्तीने पूर्ण त्याग केला आहे, म्हणजेच तो सर्व कर्मफळांचा त्याग करतो आणि सर्व मानवांमध्ये, प्राण्यांमध्ये आणि निर्जीव वस्तूंमध्ये समता पाहतो, तो खरा संन्यासी आहे. भगवे कपडे घालून गृहस्थ जीवन सोडून जंगलात राहतो त्याला संन्यासी म्हणत नाही.

कर्माची प्रेरणा ज्ञाता (जाणणारा), ज्ञान (ज्याद्वारे ते ज्ञात होते), जाणण्यायोग्य (जे ज्ञात आहे) पासून उद्भवते. कर्ता (कर्म करणारा), करण (कर्माचे साधन) आणि कर्म हे कर्मसंचयाला कारणीभूत ठरतात. जे ज्ञान सर्वात परिपक्व असते, सर्व गुणांना संपवते आणि प्रत्येक गोष्टीत शाश्वत परमेश्वर पाहते त्याला सात्विक ज्ञान म्हणतात. कर्मशास्त्रानुसार, अहंकार आणि आसक्तीशिवाय केलेली कर्मे सात्विक कर्मे आहेत. कर्म मनुष्यातील गुण करतात. जो कर्ता आसक्तीमुक्त आहे, ज्याच्याकडे संयम आहे, उत्साह आहे पण अहंकार नाही, जो कोणतेही काम पूर्ण झाल्यावर आनंदी होत नाही आणि काम पूर्ण झाले नाही तरी दुःखी होत नाही, त्याला सात्विक कर्ता म्हणतात.

माणसाची बुद्धी (म्हणजे विचार करणे, समजणे) आणि संयम (म्हणजे धरून ठेवण्याची किंवा नियंत्रण ठेवण्याची क्षमता) यांचा कर्माशी खोलवर संबंध आहे. कर्ममार्ग (सांसारिक कर्तव्ये पार पाडणे आणि त्यांचा लोककल्याणासाठी वापर करणे) आणि निवृत्तीचा मार्ग (त्याग) यातील फरक जाणणारी बुद्धी म्हणजे सात्विक बुद्धी. सात्विक धृती म्हणजे आपले लक्ष आपल्या ध्येयापासून हतू न देण्याची वृत्ती, तिच्यात शुद्ध धारणा असते आणि जी ध्यानाद्वारे मन आणि इंद्रियांच्या कृती नियंत्रित करते. दुःखाचा अंत करणाऱ्या आनंदाला परम आनंद म्हणतात. ज्या सुखात साधक सुरुवातीला दुःख असले तरी शेवटी दुःखांचा नाश होतो, त्याला सात्विक सुख म्हणतात.

भगवान श्रीकृष्णाने माणसाच्या स्वभावावर (त्रिगुण प्रकृतीवर) आणि त्याच्या कर्मांवर आधारित त्याच्या जातीचे वर्णन केले आहे. तप, क्षमा, अभ्यास, आत्मसंयम, धर्मासाठी दुःख सहन करणे, अंतर्बाह्य शुद्धता, मन आणि इंद्रियांचा संयम, साधेपणा, वेद आणि शास्त्रांवर श्रद्धा ही ब्रह्मण असण्याची लक्षणे आहेत. युद्ध, दान, शौर्य, तीक्ष्णता, संयम, हुशारी, मुत्सद्दीपणा, रणनीती, युद्धापासून न पळणे, स्वाभिमान, दान देणे इत्यादी क्षत्रियाची लक्ष्णे आहेत. शेती, गोरक्षण, व्यापार, प्रामाणिक व्यवसाय करणे इत्यादी वैश्यांची लक्षणे आहेत. ज्ञानाच्या अभावामुळे इतरांची सेवा करणे, कलांमध्ये प्राविण्य मिळवणे इत्यादी शूद्राची लक्षणे आहेत. प्रत्येकाला स्वतःचे कर्म करूनच यश मिळते. जे स्वतःचे कर्म करतात, इतरांचा हेवा करत नाहीत आणि सर्व परिस्थितीत आपले धर्म (कर्तव्य) पार पाडतात ते सात्विक पुरुष असतात.

ज्याचे मन आसक्तीपासून मुक्त आहे, ज्याची तृष्णा संपली आहे, ज्याचा विवेक जिंकला गेला आहे, ज्याची बुद्धी आणि शक्ती शुद्ध आहे, जो सात्विक अन्न खातो, वासना, क्रोध, आसक्ती, मत्सर इत्यादी दुर्गुणांचा त्याग करतो आणि सतत ध्यानात मग्न राहतो, त्यालाच ब्रह्मप्राप्ती होते. यालाच सांख्ययोगी म्हणतात. जो कृष्णाला मनात ठेवून आपले कार्य करतो, जो आपले कर्मफळ कृष्णाला अर्पण करतो तोच कृष्णाला प्राप्त करतो आणि त्यालाच कर्मयोगी म्हणतात. परमेश्वर प्राप्तीसाठी सात्विक होणे ही पहिली आवश्यकता आहे. म्हणूनच सत्वगुण समजून घेणे आणि सात्विक बनणे खूप महत्वाचे आहे.

- डॉ. अपर्णा लळिंगकर 
(लेखिका अभ्यासक, विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्या आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य आहेत.)

(टीप: हा लेख भग्वत्गीतेच्या १७ आणि १८ या दोन अध्यायांतील श्लोकांवर आधारित आहे. जागे अभावी त्या त्या ठिकाणी मूळ श्लोक दिलेला नाही.)
Powered By Sangraha 9.0