राधानगरीत देवरायांचा संच पाहावयास मिळतो. याच संचामधील एक असणाऱ्या हसणेच्या गाव देवराईविषयी...
राधानगरीमधील उगवाईच्या देवराईवरून निघालो की अलीकडे राधानगरीकडे येतानाच हसणे फाट्याजवळून एक रस्ता हसण्याच्या देवराईकडे जातो. मुख्य रस्त्याला एक बसथांबा आहे. त्याच्या बाजूला लागून एक चामरवेलीचे भरगच्च झाड आहे. वेलीचे झाड कसे काय, असा तुम्हाला प्रश्न पडेल. पण ही महावेल वर्गातील असल्याने (Liana) आता झाडात रुपांतरित झाली आहे. चामरवेलीच्या बाजूला धामणाच्या कुळातलीच असळी किंवा चिवर्याचे एक वेगळे झाड दिसते.
फुलांनी गच्च झाडांवर सकाळच्या ऊन्हात मधमाशा तुटून पडलेल्या दिसतात. त्या बाजूला वन भागातला नैसर्गिक सातवीण आहे. रस्ता रुंदीकरणात शिल्लक राहिलेली झाड आहेत. या झाडांच्या व बसस्टॉपच्या मधून वळलो की ऐसपैस मैदान लागत आणि लांब दिसू लागते हसण्याची गाव देवराई.
जसे जवळ जाऊ, तसे ओढ्याची वघळ लागते. त्यात बरीच झाडे आहेत. विशेषतः पिवळ्या पाडळ वृक्षाची एक रांग यात दिसते. मध्येमध्ये वेलवेटसारख्या आवरणाची फळे दिसतात. रिठ्याच्या कुळातल्या या झाडाचे नाव आहे कुरपा (Lepisanthes tetraphylla.) याच वघळीत बोखाड्याची झाडे डवरलेली होती. उन्हाळ्याच्या दिवसांत ओढ्याला पाणी नसते. वघळ मात्र झाडांनी गच्च भरलेली असते. गेल्या वष एकांडा नर दुसऱ्या हत्तीशी झालेल्या भांडणातून याच देवराईत येऊन राहिलेला. चांगला सहा महिने इथेच होता. हे सांगण्याचा हेतू हाच की काहीतरी सुरक्षित असे देवराईत वाटावे, असा प्राण्यांचा विश्वास असतो. दुसरे असे, ही देवराई मैदानी भागातली देवराई आहे. हिचा दक्षिणेचा भाग डोंगराशी जोडलेला आहे. हाच भाग पुढे आजरा, चंदगड भागाकडे जातो.
देवराईच्या मुख्य देवालय परिसरात आलो की भेरले माडाचे तुरे दिसायला लागतात. देऊळ नवकोरे केलेले आहे. दरवाजात भले अजस्र असे दोन केळवड उभे आहेत. गगनभेदी, डेरेदार असलेले केळवड म्हणजे Ficus tsjahela. बाजूला तेवढेच उंच, गोडचवीचे रायवळ जंगली आंबे. देवाचे नाव श्री गांगोलिंग. देवराया मातृसत्ताकच असतात, म्हणजे देवीचेच मंदिर असे असे नाही, तर देवही कोल्हापूरच्या देवरायात पहायला मिळतात.
देवळाच्या बाजूला परत एक अजस्र अशा चामरवेल (Schefflera elliptica)चा महावेल दिसतो. मागेच मोठे जांभळाचे झाड. देवराई तशी लहान, पण घनदाट जंगलाला जोडलेली असल्याने गवे, साळी, कोल्हे यांच्या पाऊलखुणांनी भरलेली दिसते. गव्यांच्या कळपांचे ट्राझिटचे रस्ते दिसतात. वळसा घालून मागे गेलो, तिथे गेळाची भरपूर झाडे होती. त्यातच चिमट किंवा मसारी म्हणजे Scutia myrtina फळांनी भरलेले. मधल्या पायवाटेवर रानबिब्बाच्या झाडांमध्ये निलगिरी टेंभुणची झाडं म्हणजे Diospyros neilgerrensis पण बघायला मिळतात. मुख्य मंदिराच्या मागे एक छोटेखानी मंदिर आहे. तिथे समोरच कडुलिंब कुळातले तेलीचे झाड दिसते. इतर असंख्य झाडे, वेली, दिंड्याच्या जाती, रानगवतं, रानमिऱ्याचे वेल, गारंब्या, अंजनीची झाडे अशा सामान्यपणे दिसणाऱ्या सर्व झाडांची सरमिसळ याही देवराईत दिसते. लोकरितीप्रमाणे दरवष श्रावणात जत्रा भरते. एकही झाड तोडलं जात नाही. वृक्षारोपण होत नसलं, तरी लांबून येणाऱ्या लोकांची पूर्वापार नाळ इथल्या झाडांशी नेमाने जोडली गेली आहे. अध्यात्म म्हणजे आणखी काय असते! जिथे देवरायांची स्मृती संवर्धन तेच अध्यात्म! झाडे लावली नाहीत, तरी चालतील पण ती तोडू नयेत, याच धार्मिक बाबीवर तर देवराया उभ्या राहिल्या, उभ्या केल्या. तीच आत्मीयता जोपासली, तर जंगले तुटणार नाहीत, तर त्यांच्यासोबत राहण्याची सवय दृढ होऊन जाईल.
- रोहन पाटील
(लेखक वनस्पतीअभ्यासक आहेत.)
7387641201